आजच्या तारखेत Ujani नावाने ‘एआय’ इमेज सेव्ह आहे.
---
उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!
पूर्वी २५-३० किलो, आता चार-पाच किलोच जाळ्यात; मत्स्यबीज सोडूनही मासे गायब
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. ३ : सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या उजनी जलाशयात यंदा मुबलक पाणीसाठा असतानाही मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला असताना अपेक्षित प्रमाणात मासे मिळत नसल्याने मच्छीमार चिंतेत आहेत. आवक घटल्याने बाजारात विविध प्रकारच्या माशांचे दर वाढले आहेत; मात्र मासेमारीतून मिळणारे उत्पन्न कमी झाल्याने मच्छीमारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
उजनीच्या लाभक्षेत्रातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पारंपरिक मासेमारीवर अवलंबून आहे. मात्र जाळी टाकल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत अत्यल्प मासे मिळत असल्याचे मच्छीमार सांगतात. दिवसभर जलाशयात राहूनही जाळ्यात चार-पाच किलो मासे मिळत असल्याने इंधन, मजुरी व जाळ्यांच्या देखभालीचा खर्चही भरून निघत नसल्याची स्थिती आहे.
---
मत्स्यबीज सोडूनही उत्पादन घटले
मत्स्य विभागाकडून जलाशयात वेळोवेळी मत्स्यबीज सोडले जाते. त्यानंतरही अपेक्षित मत्स्य उत्पादन मिळत नसल्याने मच्छीमारांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. जलाशयात सोडलेल्या मत्स्यबीजाचे अस्तित्व, त्यांची वाढ, नैसर्गिक खाद्याची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता, प्रजनन क्षेत्रे तसेच मासेमारीचा वाढता दबाव यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची गरज आहे.
---
पाण्यातील प्राणवायूची कमतरता कारणीभूत
यंदाच्या वातावरणातील बदलांचा मत्स्यबीजाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. पाणलोट क्षेत्रात यावर्षी पाऊस झाला नाही. उन्हाची तीव्रताही वाढली आहे. पाऊस नसल्यामुळे पाण्यातील प्राणवायूची कमतरता निर्माण होऊ शकते. तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे माशांचे प्रमुख खाद्य असलेल्या प्लँक्टन व शैवाळ या हरितजीवांची वाढ खुंटते. त्यामुळे माशांना पुरेसे खाद्य मिळत नसल्याने यंदा माशांचा दुष्काळ जाणवत आहे, असे प्राणिशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले.
---
माशांची आवक घटली, दर वाढले
उजनीतून माशांची आवक कमी झाल्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठांवर झाला आहे. मागणी कायम असताना आवक घटल्याने दर वाढले आहेत. मात्र माशांचे प्रमाणच कमी मिळत असल्याने वाढलेल्या दराचा अपेक्षित फायदा मच्छीमारांना मिळत नसल्याचे चित्र आहे.
---
वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी
उजनी जलाशयातील मत्स्यसंपत्तीची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी मच्छीमारांकडून होत आहे. जलाशयातील विविध भागांत नमुना पद्धतीने सर्वेक्षण करून माशांच्या प्रजाती, संख्या, आकार, प्रजननक्षमता आणि नैसर्गिक खाद्याची उपलब्धता तपासण्याची गरज आहे. तसेच मत्स्यबीज सोडण्यापूर्वी व त्यानंतर त्याचा परिणाम मोजण्यासाठी नियमित मॉनिटरिंग व्यवस्था उभारण्याची मागणी होत आहे. मासेमारीतील घट लक्षात घेऊन मत्स्य विभागाने मत्स्यबीज संवर्धन, प्रजनन क्षेत्रांचे संरक्षण, अवैध मासेमारीवर नियंत्रण, जलगुणवत्ता तपासणी आणि मच्छीमारांना आर्थिक व तांत्रिक मदत याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.
---
सध्याचे माशांचे दर
इंदापूर येथील आडतदार संजय दरदरे यांच्या माहितीनुसार, लिलाव काट्यावर चिलापी १२० ते १५०, रोहू १५० ते २००, कटला १५० ते २५०, मरळ ३०० ते ४००, घुगळी २५० ते ३५०, शिंगटा २५० ते २८०, वाम ३५० ते ५०० आणि चालट १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. स्थानिक बाजारात लहान चिलापी १२० ते १३० रुपये किलो दराने विकली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.