KTR26B09225
फ्लेमिंगो पक्ष्यांचे संग्रहित छायाचित्र
---
स्थलांतरित रोहित पक्ष्यांनी फिरवली ‘उजनी’कडे पाठ
प्रदूषित पाण्यामुळे अन् अन्नसाखळी बाधित होण्याने आगमन रखडल्याची शक्यता
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. २५ : उजनी धरण क्षेत्रातील प्रमुख आकर्षण असलेले रोहित (फ्लेमिंगो) हे मनमोहक स्थलांतरित पक्षी यंदा उजनी जलाशयाकडे फिरकलेच नसल्याचे चित्र दिसत आहे. थंडीची चाहूल लागताच हजारो मैलांचा प्रवास करून दरवर्षी मोठ्या संख्येने येथे येणारे हे हिवाळी पाहुणे यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंतही दाखल झाले नाहीत. पांढऱ्या शरीरावर गुलाबी छटा असलेल्या या मनमोहक हिवाळी पाहुण्यांचे आगमन धूसर झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी ‘सकाळ’ला दिली. नुकताच धरणातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग केल्यानंतर डॉ. कुंभार यांनी धरण परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून ही माहिती दिली.
यावर्षी अतिवृष्टीमुळे उजनी जलाशय जुलै महिन्यातच पूर्ण भरला होता. नंतर कालवे, सीना-माढा बोगदा व भीमा नदीमार्गे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, जलाशय काठावरील भाग दीर्घकाळ पाण्याखाली गेल्याने त्यांच्या आगमनाला विलंब होईल, असेही पक्षी अभ्यासकांनी नमूद केले होते. गेल्या दीड महिन्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने काठावरील दलदली व जलावृत्त बेटे उघडी पडली असली, तरी फ्लेमिंगोंनी अद्याप येथे हजेरी लावलेली नाही.
---
तांबड्या शेवाळांच्या वाढीवर परिणाम
स्थलांतरित पक्ष्यांसाठी केवळ पाण्याची पातळी नव्हे, तर पाण्याची गुणवत्ता अधिक महत्त्वाची असते. धरणाच्या वरच्या भागातील शहरांमधून येणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी व शेतीतील रासायनिक घटक मोठ्या प्रमाणात जलाशयात मिसळत असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे पोषकद्रव्यांचे संतुलन बिघडून फ्लेमिंगोंचे प्रमुख खाद्य असलेल्या तांबड्या शेवाळांच्या वाढीवर परिणाम होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
---
अन्य स्थलांतरित पक्ष्यांचीही घटली उपस्थिती
यंदा धरणात मुबलक पाणीसाठा असूनही अन्य स्थलांतरित पक्ष्यांची उपस्थितीही तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे. काठावरील चराऊ भाग दीर्घकाळ पाण्याखाली राहिल्याने अनेक पक्ष्यांनी आपले स्थलांतराचे वेळापत्रक बदलल्याचा अंदाज पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
---
कोट
यावर्षी धरणातील पाण्याची पातळी व थंडीचे अनुकूल वातावरण असतानाही रोहित पक्ष्यांचे आगमन झालेले नाही. कदाचित पाण्याची गुणवत्ता बिघडून अन्नसाखळी बाधित झाली असावी, असा अंदाज आहे. प्रदूषित पाण्यामुळे रोहित पक्ष्यांचे खाद्य असलेल्या तांबड्या शेवाळांची वाढ खुंटते व त्यांना आवश्यक खाद्य मिळत नाही. उजनी धरण हे एक परिपूर्ण जलीय परिसंस्था असून, ते प्रदूषणमुक्त करण्याची गरज आहे.
- डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक
---
कोट
यावर्षी उजनी जलाशयात मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे पक्ष्यांनी उजनीकडे पाठ फिरवली आहे, असेच सध्यातरी दिसून येत आहे. उजनीचे मुख्य आकर्षण असणारे फ्लेमिंगो मात्र यावर्षी अत्यल्प प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.
- कल्याणराव साळुंके, पक्षीमित्र, करमाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.