लोकप्रतिनिधींच्या अंगरक्षकाकडून मारहाण
कंत्राटी वीज कामगाराचा आरोप ः अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घटनेचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
श्रीरामपूर, ता. १५ ः हरेगाव येथील मतमाऊली यात्रेदरम्यान खंडित झालेला वीजपुरवठा आणि सोशल मीडिया ग्रुपवरील मेसेजवरून झालेल्या वादातून महावितरणचे कंत्राटी वायरमन पंकज खरात यांना लोकप्रतिनिधींच्या अंगरक्षकाकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध करत कारवाईची मागणी केली. मात्र, आमदार हेमंत ओगले यांनी अंगरक्षकाकडून मारहाण झाल्याचा आरोप फेटाळून लावला.
वीज प्रश्नी आमदार ओगले यांच्या उपस्थितीत नगरपालिकेत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार, नागरिकांची बैठक झाली. यावेळी हरेगाव यात्रेदरम्यान दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला. या प्रकरणात वायरमन खरात यांच्या कामाबाबत तसेच यात्रेच्या काळात सोशल मीडिया ग्रुपवर एका खासगी कंपनीच्या बल्बसंदर्भातील मेसेज फॉरवर्ड केल्याबाबत बैठकीत जाब विचारण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावरून खरात यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद वाढला. त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पालिका परिसरात खरात व अंगरक्षक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी पालिकेत एकत्र आले व निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली.
दरम्यान, खरात यांनी कोणतीही शिवीगाळ केली नसल्याचे सांगत, घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती.
-------
कोट
माझ्या अंगरक्षकाने संबंधित कर्मचाऱ्याला कोणतीही मारहाण किंवा धक्काबुक्की केलेली नाही. सभागृहातील वातावरण शांत करण्यासाठी त्याने हस्तक्षेप केला. गर्दीत त्यांच्यात काही झटापट झाली असेल. स्वतःची चूक लपविण्यासाठी मारहाण केल्याचा कांगावा करत रस्त्यावरही सदर कर्मचारी गोंधळ घालत होता. सदर व्यक्ती हंगामी कामगार असल्याने त्याने सरकारी बैठकीत येणे अपेक्षित नाही. त्याची पूर्ण चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- हेमंत ओगले, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.