पुणे, ता. १७ : ‘‘देशाच्या इंटरनेट आणि माहिती सुरक्षेसाठी समुद्राखालील डेटा केबलचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी भारताने तातडीने समुद्रतळावरील युद्धतंत्र क्षमता विकसित करावी,’’ असे आवाहन माजी नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यांनी सोमवारी येथे केले.
पुण्यातील मेरिटाइम रिसर्च सेंटर आणि नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेयर्स यांच्यातर्फे आयोजित ‘भारताच्या महासागर दृष्टिकोनाच्या पूर्ततेसाठी पाण्याखालील क्षेत्राविषयी जागरूकता सक्षमीकरण’ कार्यक्रमात ते बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या वेळी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी, मेरिटाइम रिसर्च सेंटरचे संस्थापक (कमांडर) डॉ. अर्णब दास आणि इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेयर्सचे अरुद्र सिंह व्यासपीठावर उपस्थित होते.
सिंह म्हणाले, ‘‘समुद्रातून जाणाऱ्या केबलचा वापर सध्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत होत असून, भविष्यात त्याच्या मागणीत सातत्याने वाढ होणार आहे. त्यामुळे एखादी केबल जरी तुटली किंवा निष्क्रिय झाली तरी त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. पाण्याखालील केबलचे संरक्षण हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोरणात्मक प्राधान्याचा विषय असला पाहिजे. फ्रान्स आणि ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या अनुभवातून धडे घेत भारताने समुद्रतळावरील युद्धतंत्र विकसित करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करावेत.’’
जग्गी यांनी भारताची सागरी दृष्टी सागर धोरणापासून विस्तारित महासागर चौकटीकडे विकसित होत असताना जागृतीची गरज असल्याचे सांगितले. समुद्राखालील जग भविष्यातील सुरक्षा आणि समृद्धी निश्चित करेल. जगातील एकूण व्यापारी मालवाहतुकीपैकी सुमारे ८० टक्के माल समुद्रमार्गे वाहून नेला जातो, तर इंटरनेट वाहतुकीसह जगातील जवळपास ९९ टक्के माहिती पाण्याखालील नेटवर्कद्वारे पाठवली जाते, असे जग्गी यांनी नमूद केले. दास यांनी भारताच्या अंडरवॉटर डोमेन अवेअरनेसच्या चौकटीत सर्व संबंधित घटकांचा सहभाग असलेला प्रादेशिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.
‘जय’ त्रिसूत्रीची अंमलबजावणी :
पाण्याखालील धोके ओळखून त्यांचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी ‘एनडीए’चे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी ‘जय’ त्रिसूत्रीची मांडणी केली. ‘जे’ म्हणजे जॉइंटनेस अर्थात तिन्ही संरक्षण दल, विविध सरकारी संस्था आणि भागीदारांमधील समन्वय, ‘ए’ म्हणजे तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्मच्या बाबतीत आत्मनिर्भरता, तर ‘आय’ म्हणजे नवोन्मेष होय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.