परवाना नसतानाही कृषी निविष्ठांची विक्री
--
उरुळी कांचन, शिंदवणेत दोन विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन आणि शिंदवणे परिसरात कृषी निविष्ठा विक्रीतील कथित अनियमिततांप्रकरणी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने कारवाई केली आहे. परवाना निलंबित असतानाही बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी उरुळी कांचन येथील ‘साई शेती भांडार’, तर मुदत संपलेल्या परवान्यावर आणि अनधिकृत ठिकाणी खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी शिंदवणे येथील ‘कौशल्या शेती भांडार’ या दोन विक्रेत्यांविरुद्ध उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ जुलै रोजी ‘साई शेती भांडार’ची तपासणी करण्यात आली होती. त्या वेळी साठा नोंदवही न ठेवणे, परवान्यात उत्पादक कंपनीचा समावेश नसणे आदी त्रुटी आढळून आल्या होत्या. या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी सुनावणी घेऊन संबंधित दुकानाचा बियाणे विक्री परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला होता.
निलंबनाचा आदेश लागू असतानाच दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी भरारी पथकाने अचानक तपासणी केली. त्या वेळी दुकान सुरू असल्याचे आढळले. तसेच २८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत पालक, मका, काकडी आणि शेपूच्या बियाण्यांची विक्री झाल्याचे बिल पुस्तकाच्या तपासणीत आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दुकानमालक बाळासाहेब उल्हास साळुंखे यांच्याविरुद्ध ‘बियाणे (नियंत्रण) आदेश, १९८३’ आणि ‘अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात शिंदवणे येथील ‘कौशल्या शेती भांडार’ची तपासणी करण्यात आली. मोहीम अधिकारी विनय दिलीपराव कदम यांच्या फिर्यादीनुसार, दुकानचालक पोपट तुकाराम महाडीक यांच्या बियाणे व खत विक्री परवान्याची मुदत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संपली होती. परवान्याचे नूतनीकरण न करता खते व बियाण्यांची विक्री सुरू असल्याचे तपासणीत आढळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच कीटकनाशक विक्रीचा परवाना उरुळी कांचन-जेजुरी मार्गावरील एका ठिकाणासाठी असताना वळती फाटा येथील अन्य ठिकाणी साठवणूक व विक्री सुरू असल्याचेही तपासणीत आढळले. या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखणे, बनावट व निकृष्ट कृषी निविष्ठांचा पुरवठा थांबविणे आणि कृषी क्षेत्राचे नुकसान टाळण्याच्या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार ही कारवाई केल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
--
चौकट : तपासण्या सुरूच राहणार
या कारवाईत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील, कृषी अधिकारी अशोक वेताळ आणि मोहीम अधिकारी विनय कदम सहभागी झाले होते. कृषी निविष्ठांच्या विक्रीतील अनियमितता रोखण्यासाठी अशा तपासण्या यापुढेही सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.