नियोजित उर्दू शाळेचा सुरक्षा अहवाल द्या
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; कऱ्हाडला बांधकाम आले धोक्यात
कऱ्हाड, ता. ८ ः येथील मुजावर कॉलनी परिसरातील कचरा डेपो व जलशुद्धीकरण केंद्राजवळील नियोजित उर्दू शाळेच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय प्रत्यक्ष बांधकाम सुरू करू नये, अन्यथा त्या कामाची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयातील पालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त अभिजित बापट यांनी येथील पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिला आहे. त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल १२ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.
भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी नियोजित बांधकामाविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केला होता. नियोजित उर्दू शाळेच्या इमारतीशेजारीच कचरा डेपो, एसटीपी प्लांट, वैद्यकीय कचरा विल्हेवाट केंद्र आहे. कचरा डेपोला लागणाऱ्या आगीमुळे पसरणारा धूर, दुर्गंधी, भटक्या श्वानांचा वावर आणि विषारी प्राण्यांच्या वावरामुळे लहान मुलांच्या आरोग्यासह जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला होता. या तक्रारीनंतर पालिकेने १३ ऑगस्टला त्यांचा अहवाल सादर करून सद्यःस्थितीत उर्दू शाळेचे कोणतेही बांधकाम सुरू नसल्याचे स्पष्ट केले होते. सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगी प्राप्त झाल्यानंतरच पुढील काम हाती घेतले जाईल, असेही पालिकेने नमूद केले होते. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा सहआयुक्त श्री. बापट यांनी पालिकेचे मुख्याधिकारी श्री. व्हटकर यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून महत्त्वाच्या मुद्द्यांवर १२ ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. आवश्यक त्या सर्व कायदेशीर व तांत्रिक परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम सुरू करू नये, अन्यथा त्या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यताच रद्द केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
..............
चौकट
.........
याचा मागितला अहवाल
- अद्ययावत डीपी प्लॅनमध्ये उर्दू शाळेसाठी आरक्षण मंजूर आहे का?
- उचित प्राधिकरणाची बांधकाम परवानगी प्राप्त झाली का?
- नियोजित जागेजवळ कचरा डेपो, एसटीपी प्लांट आहे का? असल्यास त्याचे निश्चित अंतर किती?
- डीपी प्लॅननुसार किती मीटरचा रस्ता मंजूर आहे. त्याच्या दुरुस्तीची तरतूद आहे का?
- संबंधित ठिकाण विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे का? त्याच्या काय उपाययोजना केल्या आहेत?
- आवश्यक सर्व परवानगी व प्रमाणपत्रे आहेत का?
.............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.