वडगाव निंबाळकर, ता. १० : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय संघर्षाबरोबरच नात्यांची लढाईही रंगतदार ठरत आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून मामा आणि भाचे परस्परविरोधी पॅनेलकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासोबत तिसऱ्या पॅनेलचे उमेदवारही मैदानात असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता सभासदांमध्ये निर्माण झाली आहे.
पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलतर्फे होळ येथील मिलिंद बळवंत कांबळे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर येथील त्यांचे मामा द्वारकोजी गुलाब साळवे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलतर्फे रिंगणात आहेत. तर, युगेंद्र पवार यांच्या श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलतर्फे कोऱ्हाळे खुर्द येथील गोविंद कृष्णा पवार उमेदवारी करीत आहेत.
मामा-भाचे वेगवेगळ्या पॅनेलकडून आमनेसामने आल्याने या लढतीची चर्चा कार्यक्षेत्रात सुरू आहे. मात्र, तिसऱ्या उमेदवारामुळे ही लढत केवळ कौटुंबिक प्रतिष्ठेपुरती मर्यादित न राहता तिरंगी झाली आहे. त्यामुळे नात्यांचे समीकरण, उमेदवारांचा वैयक्तिक संपर्क आणि पॅनेलची ताकद यांपैकी कोणता घटक निर्णायक ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मिलिंद कांबळे यांना यापूर्वी कारखान्याचे संचालक, तसेच उपाध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे कारखान्याच्या कामकाजातील त्यांचा परिचय सभासदांना आहे. त्यांचे मामा द्वारकोजी साळवे यांनी सोमेश्वर कारखान्याजवळील एका बँकेत पदाधिकारी म्हणून काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतरही ते परिसरातील सामाजिक कार्यात सक्रिय असून सभासदांशी त्यांचा संपर्क राहिला आहे. गोविंद पवार यांचाही कारखान्याशी सातत्याने समन्वय असून ते ऊसतोडणी-वाहतूक संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे तिन्ही उमेदवारांची आपापल्या पातळीवर ओळख आणि संपर्क असल्याने मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे लक्ष लागले आहे.
मामा-भाचे या नात्यापलीकडे जाऊन कारखान्यातील कामाचा अनुभव, सभासदांशी असलेला संपर्क आणि पॅनेलची ताकद यांची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत भाचा बाजी मारणार, मामा सरस ठरणार की तिसरा उमेदवार आघाडी घेणार, याची उत्कंठा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.