वाघोली, ता. २ : वाघोली-डोमखेल रस्त्यावरील जी. एच. रायसोनी महाविद्यालयामुळे होणारी गर्दी आणि सीमा भिंतीमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानने महाविद्यालय प्रशासनाला लेखी निवेदन देऊन रस्ता रुंदीकरणासाठी सीमा भिंत मागे घेण्याची मागणी केली आहे.
वाघोली-डोमखेल रस्त्यावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या वाहनांची दिवसभर मोठी वर्दळ असते. महाविद्यालयाच्या आवारात पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने ही वाहने मुख्य रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असून दररोज कोंडी होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच महाविद्यालयाची सीमा भिंत रस्त्याला लागून असल्याने रस्ता अरुंद झाला असून वळणावर अडथळा निर्माण होत आहे.
सार्वजनिक हितासाठी महाविद्यालय प्रशासनाने आपली सीमा भिंत रस्त्यापासून साधारण पाच ते सात फूट आत घ्यावी, जेणेकरून रस्ता रुंद होऊन वाहतूक सुरळीत होईल, असे प्रतिष्ठानने म्हटले आहे. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी व पालकांसाठी तातडीने स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याची मागणीही केली आहे. सामाजिक जबाबदारीतून महाविद्यालय प्रशासन यावर सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा प्रतिष्ठानचे कल्पेश जाचक व शिवदास पवार यांनी व्यक्त केली आहे.