पुणे- पतीच्या निधनानंतर तीन लहान मुलांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर आली. मात्र, संकटांना धैर्याने तोंड देत तिने दुचाकींना सीट कव्हर बसविण्याचे काम स्वीकारले आणि गेल्या दहा वर्षांत या व्यवसायात तिने चांगलाच जम बसवला. या व्यवसायाच्या जोरावर तिने मुलांना उच्चशिक्षितही केले.
वंदना बळवंत पवार यांच्या जिद्द, कष्ट आणि प्रयत्नांची ही यशोगाथा. सातारा रस्त्यावरील धनकवडी कॉर्नरला नीलम सीट कव्हर नावाचे त्यांचे दुकान आहे. दुचाकींना सीट बसविण्याचे काम हे पुरुष मंडळीच करतात. मात्र, वंदना या कामात एकदम पारंगत आहेत.
एखादा ग्राहक दुकानात आल्यानंतर सीट कव्हरची मागणी करतो, त्या वेळी त्या त्याच्याकडे दुचाकीची चावी मागतात व स्वतः ते सीट काढून दुकानात आणतात. त्यानंतर ग्राहकाने पसंत केलेल्या कव्हरवर पुढील पंधरा-वीस मिनिटे त्या शिलाई व स्टेपलचे काम करतात. सीट फाटले असल्यास त्यावर त्या रफूही करून देतात. हे काम झाल्यानंतर दोन-तीन मिनिटांत गाडीला सीटही बसवितात. हे काम करीत असताना त्यांच्यातील उत्साहाचा झरा अखंड वाहत असल्याचे जाणवते. ग्राहकांचे समाधान होईल, याकडे त्या कटाक्षाने लक्ष पुरवतात.
वंदना यांचे पती बळवंत पवार यांचे २०१० मध्ये निधन झाले, त्या वेळी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. जवळच्या लोकांनीही जबाबदारी झटकली, त्यामुळे त्या एकट्या पडल्या. त्या वेळी त्यांची तीनही मुले लहान होती. धाकटा मुलगा तर पहिलीत होता. आता पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मात्र, थोड्याच दिवसांत त्यांनी स्वतःला सावरले. मुलांकडे बघून त्यांनी स्वतःचे अश्रू पुसले. ‘या मुलांसाठी मीच आता आई आणि वडील. त्यांना उच्चशिक्षण देणारच,’ असा निर्धार करून, त्या घराबाहेर पडल्या. धनकवडी कॉर्नरला त्यांच्या पतीचे सीट कव्हरचे दुकान होते, तेच त्यांनी पुढे चालवायचे ठरविले. सुरुवातीला हे काम करताना त्यांना संकोच वाटायचा. ग्राहक आल्यानंतर महिलेला बघून परत जायचे. बाईमाणसाला हे काम काय जमणार, असा विचार करून, अनेक जण माघारी फिरायचे. त्या वेळी वंदना यांना दुःख व्हायचे. मात्र, त्यांनी हार मानली नाही. नेटाने त्या काम करीत राहिल्या आणि वर्षभरातच त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. आता धनकवडी परिसरातीलच काय; पण शहरातील इतर ठिकाणांवरील ग्राहकही त्यांच्या दुकानात येत असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
दोन्ही मुलींना उच्चशिक्षण
या दुकानाच्या जोरावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर चालतोच, शिवाय मुलांचेही शिक्षण उत्तमरीत्या सुरू आहे. त्यांची थोरली मुलगी सोनल ही संगणक अभियंता बनली आहे, तर दुसरी सलोनी बीबीएच्या शेवटच्या वर्षाला आहे. मुलगा ओम दहावीत आहे. मुलांना खूप शिकवायचे असा त्यांचा निर्धार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.