Pune-Vidhansabha 
पुणे

Vidhansabha 2019 : जागावाटपातील समन्वय हाच कळीचा मुद्दा

संभाजी पाटील

भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील जागावाटप, आघाडीला लोकसभेत मदत करणाऱ्या ‘मनसे’ची भूमिका आणि लोकसभेचा २३ मे रोजी जाहीर होणारा निकाल, यावर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे चित्र अवलंबून असेल. लोकसभेसाठी नाइलाजाने का असेना, झालेली युती आणि आघाडी विधानसभेच्या जागावाटपाचा समन्वय कसा साधणार, हाच कळीचा मुद्दा आहे. 

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा पुणे लोकसभा मतदारसंघात येतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीतही भाजपनेच एकहाती सत्ता संपादली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबरची युती पुण्यात विधानसभेसाठी मात्र भाजपच्या दृष्टीने डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत. विद्यमान आमदारांच्या जागांबाबत अदलाबदल होणार का, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी पुण्यातील विधानसभेची कोणतीही जागा घटक पक्षांना द्यावी, अशी मानसिकता भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाही. त्यामुळे युतीत जागावाटपावरूनच ठिणगी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

२०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध लढले. त्या वेळी वडगाव शेरी, कोथरूड आणि पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघांत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. वडगाव शेरीत अवघ्या पाच हजार मतांनी शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. स्वबळावर भाजपला ‘काँटे की टक्कर’ देणाऱ्या शिवसेनेला या वेळी पुण्यात किमान दोन ते तीन जागांची अपेक्षा स्वाभाविकपणे आहे. किंबहुना याच हेतूने शिवसेनेने लोकसभेत भाजपचे काम केले. अर्थात या मनसुब्यांना भाजप कितपत साथ देईल, याविषयी साशंकता आहे. 

जागांची निम्मी-निम्मी वाटणी
दुसऱ्या बाजूला विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित मानली जाते. ही आघाडी झाली तर शहरातील जागांची वाटणी निम्मी-निम्मी होईल. काँग्रेसने लोकसभेच्या निकालाची वाट न पाहता शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय मेळाव्यांचे नियोजन केलंय. सध्या भाजपचा बालेकिल्ला बनलेला कोथरूड मतदारसंघ २०१४ पूर्वी शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ होता. त्यामुळे साहजिकच शिवसेनेचे शहरप्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हा मतदारसंघ पक्षाला मिळावा, यासाठी प्रयत्नशील असतील. राष्ट्रवादी येथे कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजपमध्ये रस्सीखेच राहणार आहे. 

शिवाजीनगरात गर्दी
शिवाजीनगर मतदारसंघातही भाजपची ताकद वाढली आहे. या मतदारसंघात आमदार विजय काळे यांच्यासोबत नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हेदेखील प्रमुख इच्छुक आहेत. लोकसभेत अनिल शिरोळे यांना न मिळालेल्या संधीची विधानसभेत भरपाई होणार काय, याबाबत चर्चा आहे. माजी आमदार विनायक निम्हण कोणत्या पक्षाकडून लढणार याचीही उत्सुकता आहे. जागावाटपात या जागेसाठी काँग्रेस आग्रही राहील, अशीच चिन्हे आहेत.

वडगाव शेरीसाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. आमदार जगदीश मुळीक यांच्या बंधूंना स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन या मतदारसंघात मोठा निधी वळवला आहे. शिवसेनेचे संजय भोसले, रघुनाथ कुचिक हेही येथून आग्रही राहतील. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून बापू पठारेंसह इच्छुकांची संख्या मोठी आहे. पर्वतीमध्ये आमदार माधुरी मिसाळ ‘हॅटट्रिक’च्या तयारीत आहेत. या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सचिन तावरे पुन्हा काँग्रेसमध्ये गेल्याने काँग्रेसकडून या जागेची मागणी होईल.

पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना सध्यातरी भाजपमधून इतर कोणताही समर्थ पर्याय नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत येथून भाजपला मिळणारे मताधिक्‍य यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे या वेळीही येथून इच्छुक आहेत. युतीचा घटक पक्ष असणारा रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) ही जागा लढविण्यास इच्छुक असेल. 

कसब्यात उत्तराधिकारी कोण?
गिरीश बापट खासदार झाल्यास, कसबा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? हा सध्या चर्चेचा विषय आहे. महापौर मुक्ता टिळक, धीरज घाटे, गणेश बीडकर, हेमंत रासने अशी इच्छुकांची भलीमोठी यादी आहे. बापट यांच्या सूनबाई स्वरदा याही उत्तराधिकारी म्हणून मैदानात उतरतील. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचीच कसोटी लागणार आहे. ‘मनसे’तून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नगरसेवक रवींद्र धंगेकर हे या वेळीही इच्छुकांमध्ये आघाडीवर आहेत. 

पुण्यात ‘मनसे’ची ताकद असून, ‘मनसे’ला आघाडीत घेतले तर कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबाबत सध्या चर्चा आहे. त्यामुळे पुण्यात सध्या तरी जागा मर्यादित आणि इच्छुकांची मोठी गर्दी, यामुळे सर्वच पक्षांना उमेदवारी देताना कसरत करावी लागेल, हे निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT