कारकीर्द अध्यक्षांची सदरासाठी -
विजयसिंह मोहिते-पाटील यांचा फोटो
रोजगार हमी योजनेत समान मजुरीच्या माध्यमातून साधली सामाजिक समता
बिनविरोध झाली निवड; दुष्काळात ५० हजारांच्या हाताला दिले काम
सकाळ वृत्तसेवा
अकलूज ता. २३ : देशभर दुष्काळाची तीव्र झळ असताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या कार्यकाळात दुष्काळग्रस्त जनतेसाठी प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श उभा केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीची कामे हाती घेत, त्यांनी सुमारे ५० हजार मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले. जिल्हाध्यक्षांना मिळणाऱ्या गाडीसारख्या सुविधांचाही त्यांनी वापर केला नाही. रोजगार हमी योजनेत स्त्री-पुरुष समान मजुरी देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी सामाजिक समतेचे उदाहरण घालून दिले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी १२ ऑगस्ट १९७२ ते १९ जून १९७९ या काळात भूषविले. सन १९७९ मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. तत्कालीन ज्येष्ठ नेते शिवदारे, गणपतराव देशमुख, ॲड. मर्दा, एस. एम. पाटील, विठ्ठलराव शिंदे, नामदेवराव जगताप, आ. शैलजा शितोळे यांनी शंकरराव मोहिते-पाटील यांची अनुमती नसतानाही त्यांची अध्यक्षपदी निवड केली. या निवडीवर मुंबईत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुंदरराव सोळंके व तत्कालीन प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वसंतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब केले गेले.
त्यांच्या कार्यकाळात दुष्काळावर मात करण्यासाठी ५६ गावतळी, ७१० सार्वजनिक विहिरी, बांधबंदिस्तीची कामे, तसेच कालव्यांच्या वितरिकांद्वारे सुमारे ३० हजार हेक्टर जिरायती क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळवून देण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके व पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासह एकूण १२ तालुक्यांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. जनावरांसाठी चारा छावण्या व मोफत चारा वाटपाची योजनाही राबविण्यात आली.
‘एक गाव, एक पाणवठा’ योजना, ९० टक्क्यांहून अधिक विद्युतीकरण, नेत्रदान-रक्तदान शिबिरे, बेघरांसाठी घरकुले, विद्यार्थ्यांसाठी नेहरू वसतिगृह, मागासवर्गीयांना जमिनीचे वाटप अशी अनेक कामे त्यांनी मार्गी लावली.
दूरदृष्टी, प्रशासनावरील पकड आणि लोककल्याणाची तळमळ यामुळे जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, शेती व व्यापार क्षेत्रात भरीव प्रगती घडवून आणणारे नेतृत्व म्हणून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कार्य आजही स्मरणात राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.