Pune News : किरकटवाडी- नांदोशी रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाला पुन्हा हरताळ फासण्यात येत असून सर्रासपणे अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात येत आहे.
हवेली पोलिसांकडून सदर आदेशाच्या अंमलबजावणीकडे सोईस्कर दुर्लक्ष होत असून याबाबत पोलिस निरिक्षक सचिन वांगडे यांनीही 'मौन' बाळगल्याने नागरिकांना मात्र गैरसोय सहन करावी लागत आहे.
किरकटवाडी गावातील सुमारे पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या व पुढील नांदोशी आणि सणसनगर या गावांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी किरकटवाडी-नांदोशी रस्ता हा एकमेव पर्याय आहे. वाहनांच्या संख्येच्या तुलनेत हा रस्ता अपुरा पडत असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होते.
सकाळी व संध्याकाळी नोकरदार, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची वाहतूक कोंडीमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी 2018 साली किरकटवाडी नांदोशी रस्त्यावर सकाळी साडेआठ ते अकरा व सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या हवेली पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून काही दिवस कारवाईचा दिखावा करण्यात आला व सध्या पुन्हा कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांना सातत्याने विचारणा करण्यात आली परंतु त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हवेली पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार किरकटवाडी फाट्याजवळ येऊन बसतात व काही ठराविक डंपरवरच कारवाई करुन इतरांना मात्र जाऊ देतात असा आरोप करण्यात येत आहे. नियम मोडून ये-जा करणाऱ्या सर्व अवजड वाहनांवर भेदभाव न करता कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
"सकाळी कामावर जाताना अवजड डंपरमुळे दररोज त्रास होत आहे. कधीकधी पोलिस बसलेले दिसतात परंतु त्यांची कोणाला भीती राहिली नाही. नियमांचे पालन व्हायला हवे."
- योगिता बागणीकर, रहिवासी किरकटवाडी
" अवजड वाहतुकीचा अनेक वर्षांपासून त्रास सहन करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना त्याचे पालन होत नाही. याबाबत कायमस्वरूपी तोडगा निघायला हवा."
- रमेश करंजावणे, नागरिक किरकटवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.