पुणे

कविता दुसरा पार्ट

CD

कविता दुसरा पार्ट

विठूराया

बाप माझा विठूराया, माय जशी रखुमाई
दिल आयुष्याचं दान, कशी होऊ उतराई
माझ्या कवितेचं बाढ, जीवापाड गं जपलं
साऱ्या संस्काराचे माप, माझ्या पदरात टाकलं
गुण्या गोविंदाने नांदलो,आम्ही साऱ्याच बहिणाई
बाप माझा विठूराया, माय जशी रखुमाई
बापाचं साधं भोळ रूप, पापण्यात दडलेलं
त्याच्या परिस स्पर्शाने,जगणं सोनियाचं झालं
सरळमार्गी त्याचा हेका, कधी चुकलाच नाही
बाप माझा विठूराया, माय जशी रखुमाई
हाती दिले त्याने पुस्तक, बाळकडू शिक्षणाचे दिले
स्वतः उभा विटेवरी, आमचे जग सावरले
लेकी रुजल्या, वाढल्या, सारी त्याचीच पुण्याई
बाप माझा विठू राया, माय जशी रखुमाई.

- शर्मिला गोसावी
अहिल्यानगर
९३२५१०७५८८
................

पाऊस

खात्याचं खरं निघाना म्हणून
हवामानतज्ञावर विश्वास ठेवला
तो म्हणाला, मुसळधार येणारंय
पाणीच पाणी होणारंय
ह्योही अंदाज लक्षात घ्यायचा
मुसळधार सोडा आम्हाला
कुसळधारही नीट आला नाही
म्हणून आम्ही त्याला विचारलं,
आमचा पाऊस कुठंय?
तुम्ही म्हणल्याप्रमाणे आला नाही
तो म्हणाला, "वाऱ्याला विचार"
वाऱ्याला विचारलं, वारा म्हणाला,
"मी फक्त हमाली करतो,
बाकीचं मला माहित नाही.
ढगाकडं जावून विचारपूस कर."
आम्ही ढगाला विचारलं
ढग म्हणला, "समुद्राला भेट"
समुद्राला भेटलो, समुद्र म्हणला,
"मी पार्सल पाठवून देतो
वारा हे सगळं वाहून नेहतो,
तू वाऱ्याशी एकदा बोलून बघ"
वैतागून शेवटी मी म्हणालो,
"त्याला आधीच विचारून झालंय
तो म्हणाला, ढगाला विचार
अन ढग म्हणलं तुला विचार"
थोडा वेळ विचार करुन
डोकं खाजवत समुद्र म्हणाला,
"डोंगराकडं एकदा चौकशी कर"
आम्ही डोंगराला विचारलं,
त्याने तर हात झटकले
माझ्या हातात कुठं कायहे?
मी आपला उभाय नुसताच.
काय करावं, कुठं शोधावं?
झाडाखाली जावून बसलो
अन विचार करू लागलो
उदासवाणा चेहरा पाहून
झाड म्हणालं, "काय झालं?
कसला विचार करतोयस?"
मी म्हणालो, "लोकांना पडलाय,
आमचाच पाऊस गायबय.
कुठं गेलाय? कुणी नेहलाय?
कुणीच काही सांगत नाही!
त्याचा थांगपत्ता लागत नाही
जवळ घेत झाड म्हणालं,
"तू काळजी करू नकोस,
तुला तुझा पाऊस मिळून जाईल,
माझ्या शब्दावर विश्वास ठेव
बाकीचं सगळं मी बघतो
तू फक्त झाडं लाव आणि जगव...
विश्वास ठेवायला हरकत नाहीय
झाडच जर का शब्द देतंय
खड्डे खोदून तयार आहेत
आम्ही पावसाची वाट पाहातोय...

- लक्ष्मण खेडकर
मुंगूसवाडे, पाथर्डी
(8329830177)
....................

निर्ममतेनं

पुन्हा एकदा आयुष्य बदलून जाते
पुन्हा एकदा काहूरले मन भरून जाते
काय? कशी? कधी? उमलून येते
नवी उदासी आभाळाच्या पारंब्यावर...

वाटा या सरळ सोप्या नव्हत्याच कधी
काटेकुटे पेरलेल्या पांदीतून
भरकटत आयुष्य
कधी सरले उमगलेच नाही
हे बरोबर आहे आभाळ
पण पायाखालची धसत चाललेली जमीन
कुठून आणायची गोळा करुन पुन्हा?

मिटले डोळे, घट्ट मिटले मनही
तरीही विझत नाहीत विचार नकार पांघरलेले
थांबलोय जरासा एखाद्या क्षणी असे होत नाही
हल्ली उभ्या जन्माचे पातक
पाठी लागल्यासारखे धावत जाताना
किती अंधारुन आले म्हणजे रात्र होते
की उजेडातही काळीकुट्ट पसरलेली असते
आशेच्या कुशीत किती साठवून ठेवायचे कढ
उरात किती साठवायचे
बांध ओसंडून वाहू नाही म्हणून किती रोखायचे पापण्यांना धाकात ठेउन

या इथे कधी तरी पुन्हा नव्याने सुरू होईल पेरणी
ऐकू येतील भलरीचे सूर
म्हणून मी वाट पाहतोय कधीचाच
पण पाऊस थांबतच नाही ना अवकाळी
हे माझ्या धमन्यातल्या सळसळत्या प्राणवायुंनो
मी हरलोय कधीचाच धोबीपछाड घेऊन परास्त
माती देखील तोंड फिरवून घेते आता
माझे उध्वस्त श्वास पांगतील रानावनात म्हणे
म्हणून सगळीकडे फवारणी केली जात आहे
इथल्या धुलीकणात उमटलेले
माझ्या पावलांचे ठसे
मिटवून टाकले जात आहेत जाणीवपूर्वक
बेसावध जगण्याची सवय झाली आहे
आणि आता बेईमानांचेही फितुर चेहरे
अपराधी वाटत नाहीत

आपणच आपले कर्तव्य समजून घेतले
आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला जगण्याचा
हा प्रकाश फसवा आहे
हे दिवे भ्रम आहेत पेरलेले
जवळच्या मित्राने आपल्या नकळत आपल्या पाठीमागून
दिशाभूल नको म्हणून आपण
आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत
की घडू द्यायचं? जे जे होईल ते फक्त पहात रहायचं परक्यासारखं,
आपल्याच आयुष्याकडं निर्ममतेनं...

- गणेश सुभद्रा शिवाजी
अहिल्यानगर
(7741931284)

..........................
कवितेची भाषा

माझ्या लेखणीच्या टोकावर एक चाळणी लावली आहे
ज्यातून बारीक रव्यासारखे शब्द चाळून निघतात,

अनेकदा काही शब्दांचे अक्षर, मात्रा किंवा अर्थ
चाळणीतच अडकून राहतात,

मग अशा चाळलेल्या शब्दांपासून
एक तोतरी भाषा निघते
समीक्षक म्हणतात की,
तोतरी भाषा ही कविता होऊ शकत नाही
व्याकरण शास्त्रज्ञ भाषेवरच प्रश्न उपस्थित करतात,

मी चाळणीत अडकलेल्या अक्षरांना,
मात्रांना आणि अर्थांना
टिपून बाहेर काढते
आणि पुन्हा भाषेच्या चाळणीत टाकते

कविता अजूनही नीट जमत नाही
कारण शब्दांवर आता प्लास्टर चढलेले आहे
समीक्षक महाशयांना संशय आहे की
आता मी चाळणी आणि भाषा सोडून
केवळ भावना उचलते
आणि दोरी बांधून आकाशाकडे उडवते

माझी कविता जमिनीवर चालत
आकाशाचा चेहरा पाहत आहे
माझ्या लेखणीच्या टोकावर
आता कोणतीही चाळणी नाही
कोणत्याही समीक्षकांची नजर
आता माझ्या कवितेवर नाही

(मूळ हिंदी कविता - रती सक्सेना)
मराठी अनुवाद - विजय नगरकर
अहिल्यानगर
(9422726400)

............
.........................

सांजवेळी

सांजवेळी साजणाने घातली ग गळ
आभाळाने नेली माझी निळी चंद्रावळ

हिमरंगी पाणी बाई आलं घाटातून
सळाळली सोनसळा ऊन पांघरून
ऋतुमती करणीची घातली ग शीळ...

ओढ्याला मी दिला देह गेले भोवऱ्यात
तुरे गवताचे मला हासले वाऱ्यात
जांभळ्या ग खडकाला हिरवं शेवाळ...

शृंगाराच्या चांदण्यात घातलं ग न्हावू
चिरेबंदी वाड्यावर सांगा कशी जाऊ
मालवेना मनातून पेटलेला जाळ...

- बाबासाहेब सौदागर
श्रीरामपूर
(9226180039)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! लालपरीच्या जादा फेऱ्या, मुंबई विभागाचा मोठा निर्णय

Mumbai News: समुद्रात उभे राहणार नौकांचे शहर! मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळणार; कसा असेल ९२२ कोटींचा प्रकल्प?

Marathi News Live Updates : बारामतीत यंदा पाडव्याचा पारंपरिक सोहळा रद्द! शरद पवारांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय, दिवाळी साजरी न करण्याचा भावनिक पवित्रा

Beed Crime : घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बीड एलसीबीने केला पर्दाफाश; ​४ गुन्हे उघडकीस; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग; ज्ञानेश कुमारांची खुर्ची धोक्यात?

SCROLL FOR NEXT