विठ्ठल मूर्ती जतन-संवर्धनासाठी लवकरच बैठक
विभागीय आयुक्तांची राहणार उपस्थिती; जानेवारीअखेर दर्शन मंडपाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ३० : पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणी माता मूर्ती जतन आणि संवर्धना संदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच पंढरपुरात बैठक घेतली जाणार आहे. दरम्यान, जानेवारी अखेर नवीन दर्शन मंडपाचे भूमिपूजन केले जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी येथे दिली.
मंगळवारी (ता. ३०) श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विठ्ठल मूर्ती जतन आणि संवर्धना संदर्भात चर्चा झाल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली. विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात भारतीय पुरातत्त्व विभागाने तसा अहवाल मंदिर समितीला दिला आहे. मंदिर समितीने तो अहवाल विधी व न्याय खात्याला पाठवला आहे. विधी व न्याय खात्याची परवानगी मिळताच मूर्ती जतन व संवर्धनाचे काम केले जाणार आहे. सध्या तरी विठ्ठल मूर्ती पूर्णपणे सुरक्षित आहे; परंतु चरणांची झीज झाली आहे. त्यावर लवकरच रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. येत्या २९ जानेवारी रोजी माघ एकादशी असून, या यात्रेला येणाऱ्या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यावेळी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराच्या जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पुरातत्त्व विभागास देण्यात आल्या. याशिवाय, श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना भारतीय पुरातत्त्व विभागाने दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देखील पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, मंदिर समिती सदस्य, सल्लागार परिषद सदस्य, स्थानिक महाराज मंडळी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये पुरातत्त्व विभागाने दिलेल्या अहवालानुसार ‘श्रीं’च्या मूर्ती संवर्धनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
याशिवाय, मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर श्री विठ्ठलाची नित्यपूजा उपलब्ध करून देणे, उपदान लागू करणे, श्रीक्षेत्र आळंदी येथे जागा खरेदी करणे, भेट स्वरूपातील दाग-दागिन्यांचे मूल्यांकन करणे, जमिनी ३ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणे आदी निर्णय घेण्यात आले. टोकन दर्शनाची दैनंदिन संख्या १२०० वरून १८०० करण्यात आली आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल व पृथ्वीराज राऊत यांनी मागील चार महिने चांगल्या पद्धतीने व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.
---
...चौकट ....
विद्युत व्यवस्थेच्या खर्चात होणार १.५ लाखांची बचत
श्री विठ्ठल- रुक्मिणी भक्त निवास येथील ‘फ’ विंगच्या इमारतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सीएसआर फंडातून विद्युत व्यवस्थेसाठी १२५ केव्हीचा सोलर प्लांट उभारण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ मंदिर समितीचे सहअध्यक्ष व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे विद्युत व्यवस्थेच्या खर्चामध्ये १ ते १.५ लाख रुपयांची बचत होणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.