मंचर, ता. २१ : ‘‘निवडणूक आयोगाने गुरुवार (ता. १ ऑक्टोबर) या अर्हता तारखेवर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी बुधवारी (ता. ४ नोव्हेंबर) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.’’ अशी माहिती आंबेगाव मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी अर्चना तांबे यांनी दिली.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले असून, त्यासंदर्भात गुरुवारी (ता. २०) सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. या पुनरीक्षणाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करणे हा आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार सोमवार (ता. २४) पर्यंत मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण केली जाईल. सोमवारी (ता. ३१) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांना नाव समाविष्ट करणे, वगळणे, दुरुस्ती किंवा पत्ता बदल यासाठी दावे व हरकती दाखल करता येतील. या अर्जांची छाननी आणि निर्णय प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला जाहीर केली जाईल.
असा असेल पुनरीक्षणाचा कार्यक्रम
मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण : २४ ऑगस्टपर्यंत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : ३१ ऑगस्ट
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर
छाननी व निर्णय प्रक्रिया : ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : ४ नोव्हेंबर
सुधारित वेळापत्रकानुसार विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नागरिकांनी मतदार यादीतील आपली नोंद तपासून आवश्यक दावे व हरकती वेळेत दाखल कराव्यात. राजकीय पक्षांनीही जनजागृतीस सहकार्य करावे.
- अर्चना तांबे, मतदार नोंदणी अधिकारी, जुन्नर-आंबेगाव उपविभाग
नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती दाखल कराव्यात. राजकीय पक्ष व त्यांच्या प्रतिनिधींनी अधिकाधिक मतदारांपर्यंत ही माहिती पोहोचवून पुनरीक्षण प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ. सचिन वाघ, निवडणूक शाखा अधिकारी