PNE26W48929
मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली नाहीत
प्रवीण गेडाम ः पात्र मतदारांना फॉर्म ६ भरण्याचे आवाहन ः २ लाख ९२ हजार मतदारांना नोटिसा ः अडीच हजार दावे दाखल
अहिल्यानगर, ता.११ ः जिल्ह्यात पुनरीक्षणापूर्वी ३८ लाख मतदार होते. सध्या ३३ लाख ८३ हजार मतदार यादीत आहेत. सुमारे ४ लाख २६ हजार मतदारांची नावे विविध कारणांमुळे वगळण्याच्या प्रक्रियेत आली आहेत. यामध्ये दुबार नोंदी हा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही मतदाराचे नाव मुद्दामहून वगळण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. सध्याच्या पुनरीक्षणात ज्यांची नावे यादीत नाहीत, तसेच मतदानासाठी पात्र असलेल्या नव्या मतदारांनी फॉर्म क्रमांक सहा भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता.११) मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा गेडाम यांनी आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी पंकज आशिया, निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील मतदार यादीची सद्यस्थिती, वगळण्यात आलेली नावे, दावे-हरकती आणि मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेबाबत सविस्तर माहिती दिली.
गेडाम म्हणाले, मॅपिंग किंवा पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत एखाद्या मतदाराचे नाव वगळले गेले असल्यास संबंधित मतदाराने त्याबाबत दावा दाखल करावा. प्राप्त दावे आणि हरकतींची योग्य पद्धतीने तपासणी केली जाईल. जिल्ह्यात २ लाख ९२ हजार मतदारांना त्यांच्या नावाबाबत अथवा अन्य कारणांबाबत नोटिसा बजावण्यात येणार आहेत. संबंधित मतदारांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले दावे दाखल करावेत. मतदार यादीबाबत नागरिकांकडून दावे-हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत २ हजार ५०० दावे दाखल झाले आहेत. ज्यांचे नाव सध्याच्या यादीत दिसत नाही, त्यांनी घाबरून न जाता निर्धारित प्रक्रियेतून दावा दाखल करावा.
...............
शनिशिंगणापूर देवस्थानच्या व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या मागील पाच वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अहवाल तयार झाल्यानंतर तो थेट राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांचा अपव्यय कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, हा ऑडिटमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासक गेडाम यांनी स्पष्ट केले. देवस्थानचा विकास करताना केवळ मंदिर परिसराचा विकास न करता शनिशिंगणापूर गावाचाही विकास झाला पाहिजे, यावर प्रशासनाने भर दिला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही नवीन आराखडा तयार करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना होणाऱ्या त्रासाचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. भाविकांना त्रास देणाऱ्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कठोर भूमिका घेणार आहे. देवस्थानमध्ये प्रशासक काळात दहा महिन्यांमध्ये पंधरा कोटी रुपये हे जमा झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.