वडगाव शेरी, ता. ७ : येथील क्रांतीनगर आणि गणेशनगर परिसरामध्ये विजेच्या वारंवार होणाऱ्या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऑक्टोबरमधील वाढता उकाडा आणि व्यवसायांचे होणारे नुकसान यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
क्रांतीनगर आणि गणेशनगरमधील रोहित्रावर क्षमतेपेक्षा जास्त ताण येत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. नवीन रोहित्र उभारण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे समजते. मात्र, ‘तहान लागल्यावर विहीर खोदणार का’ असा सवाल करत, महावितरणने ही समस्या आधीच का ओळखली नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दिवसभरात चार ते पाच वेळा वीज खंडित होत असून, तक्रार केल्यावर महावितरणचे अधिकारी केवळ पाहतो, तपासतो अशी उत्तरे देत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. वीज खंडित होण्याच्या आकडेवारीबाबतही टाळाटाळ केली जात आहे. या प्रकारामुळे बाजारपेठेतील व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण आणि महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. क्रांतीनगरमधील हा विजेचा खेळ महावितरणने तातडीने थांबवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
क्रांतीनगर परिसरामध्ये सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त आहेत. महिनाभरात किती वेळा वीजपुरवठा खंडित झाला याची कोणतीही माहिती महावितरण देत नाही. यावरून अधिकाऱ्यांची निष्क्रियता आणि निष्काळजीपणा लक्षात येतो.
- आशिष माने, अध्यक्ष, वडगाव शेरी नागरिक मंच
ग्राहक संख्या वाढल्यामुळे गणेशनगरमधील रोहित्रावर मोठा ताण आहे. नव्या रोहित्रासाठी जागा मिळावी यासाठी महापालिकेकडे मागणी केली आहे. नवे रोहित्र बसवल्यावर वीज जाण्याचे प्रमाण कमी होईल.
- विकास तायडे, कनिष्ठ अभियंता, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.