वाईमध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहात
वाई, ता. ३० : राष्ट्रीय स्तरावर दिव्यांग क्षेत्रात काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘सक्षम’ या सेवाभावी संस्थेच्या वाई शाखेच्या वतीने आयोजित मेळावा उत्साहात झाला.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांची रॅली काढण्यात आली. किसन वीर चौकातून रॅलीचा डॉ. मेघा घोटवडेकर यांच्या हस्ते फीत कापून प्रारंभ झाला. जिल्ह्यातील २०० दिव्यांगांनी रॅलीमध्ये भाग घेतला. वाई अक्षर इन्स्टिट्यूट, नवसंजीवनी स्वमग्न मुलांची शाळा, पाचवडची आपुलकी संस्था, साताऱ्यामधील दिव्यांग प्रेरणा संस्था यासह अनेक नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. सक्षमचे अध्यक्ष भगवान पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली व दीपक वाळिंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग मेळावा झाला. या वेळी सचिव आनंद मोरे यांनी सक्षम संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ डेरे संस्थेच्या अंध मुलींनी स्वागतगीत, तर स्वाती कासुर्डे यांच्या नवसंजीवनी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. दृष्टिबाधित दिव्यांग हनुमंत कुडाळकर गायनाने सर्वांना भारावून टाकले. पाचवडच्या ‘आपुलकी’ दिव्यांग संस्थेच्या संस्थापिका सुषमा पवार यांनी मतिमंद क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेतील संघर्षमय व प्रेरणादायक अनुभव कथा सांगितल्या. याप्रसंगी सातारा येथील दिव्यांग प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, अंध, अपंग संघांचे अध्यक्ष अजय घोरपडे, कार्यवाह संतोष यादव यांच्यासह २५ अंध कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व अंध दिव्यांगांना पांढरी काठी देऊन सन्मानित करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. मनीषा घैसास यांनी सूत्रसंचालन केले. जैन समाजाने सर्व दिव्यांगांना भोजन दिले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सक्षम वाई शाखेचे सचिव सुधाकर भिलारे, कोषाध्यक्ष रवींद्र मोने आणि स्वाती कासुर्डे यांनी परिश्रम घेतले.
----
07414
वाई : विविध स्पर्धांमधील विजेत्या दिव्यांगांना पारितोषिक देताना डावीकडून भाग्यश्री काळभोर, सुषमा पवार, भगवान पाटणे, दीपक वाळिंबे, स्वाती कासुर्डे.