शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित
वाईच्या पश्चिम भागातील स्थिती; पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
व्याहळी, ता. २ : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीपंपांसाठी आठ तास वीजपुरवठा उपलब्ध असला, तरी या कालावधीत २० ते २५ वेळा वीज खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांना पाणी देण्याची गरज असताना महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
अवकाळी पावसाने पाठ फिरवल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, दर १५ ते २० मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतीपंप चालविणे आणि पिकांना पुरेसे पाणी देणे अशक्य होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात असली, तरी प्रत्यक्षात सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने या योजनेचा उपयोग काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. महावितरणने वीजपुरवठ्यातील वारंवार होणारे खंड थांबवून शेतीपंपांना नियोजित आठ तास अखंडित वीज द्यावी, अशी मागणी पश्चिम भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
-------------------
कोट
दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी महावितरणकडून त्यांची अडवणूक होत आहे. आठ तास वीज देऊनही वारंवार खंड पडत असेल, तर शेतकऱ्यांनी पिके जगवायची कशी? महावितरणने तातडीने यावर तोडगा काढून अखंडित वीजपुरवठा करावा, अन्यथा वाई तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावी.
- स्वप्नील गायकवाड, पंचायत समिती सदस्य, वाई.
--------------------------
कोट
धोम धरणाचे कॅनॉल सुरू झाल्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यावर अतिरिक्त भार येत आहे. येत्या काही दिवसांत वीजपुरवठा सुरळीत होईल. शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सागर मगदूम, शाखा अभियंता, महावितरण, व्याहळी.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.