वारजे परिसरातील कचरा हटवावा
वारजे परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणाजवळ दररोज काही नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यासह वाहनचालकांनाही त्रास होतो. महापालिका प्रशासनाने येथील परिसर स्वच्छ करून येथे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी.
- एक नागरिक (PNE26W19105)
--------------------
कसबा पेठेतील कचरा संकलन
व्यवस्था पूर्ववत करावी
कसबा पेठेत सुमारे आठ ते १० वर्षांपूर्वी महापालिकेचे एक छोटे कचरा संकलन वाहन येत होते. त्या वाहनावर स्पीकर लावलेला असून त्यावर भक्तिगीते वाजवली जात होती. त्यामुळे नागरिकांना कचरा संकलनासाठी वाहन आल्याचे सहज समजत होते. परंतु सध्या महापालिकेने ही सेवा बंद करून खासगी सेवकांमार्फत कचरा संकलन सुरू केले आहे. या सेवेसाठी प्रत्येक घरातून दरमहा १०० रुपये घेतले जातात. मात्र, पैसे देऊनही काही सेवक नियमितपणे येतीलच याची खात्री नसते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी महापालिका प्रशासनाने कचरा संकलनासाठी येणाऱ्या वाहनाची सेवा पूर्ववत करावी.
- विलास कुलंगे, कसबा पेठ
------------------------------------------
मांजरी बुद्रुक परिसरातील
कचरा नियमितपणे उचलावा
मांजरी बुद्रुक परिसरातील कमाल विहार सोसायटीपासून पुढे असलेल्या मांजरी अनेक्स सोसायटीच्या थोडे समोर गेल्यास डाव्या बाजूला असलेल्या जागेवर नागरिकांकडून कचरा टाकला जातो. हा कचरा उचलून नेण्यासाठी महापालिकेच्या वाहनाला नेहमीच उशीर होतो. त्यामुळे त्याभागात साचलेला कचरा सडून त्यातून दुर्गंधी येते. महापालिकेने येथील कचरा नियमितपणे उचलण्याची व्यवस्था करावी.
- शशिकांत हरिसंगम, मांजरी बुद्रुक
-----------------------------------------
शिव हाऊसिंग सोसायटीतील
अस्वच्छतेची समस्या सोडवावी
सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग, निरंजन पार्क येथील शिव हाउसिंग सोसायटीतील एका घरासमोर अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. महापालिकेने ही समस्या तातडीने सोडवावी.
- गिरीश बक्षी, शिव हाउसिंग सोसायटी (PNE26W19114)
------------------------------
कळमकर चौकात सिग्नल उभारावा
बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील रघूनाना कळमकर चौकात वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणा नसल्यामुळे तिथे कधीही वाहतुकीचा खोळंबा होतो. वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे वाहनचालकांचा वेळ वाया जातो. या चौकात चार रस्ते समोरासमोर नसल्याने वाहनेही कोणत्याही दिशेने चालविली जातात. वाहतूक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथे सिग्नल उभारावा.
- माया भाटकर, बाणेर
-----------------------------------
कालवा रस्त्यावरील अतिक्रमणे,
अनधिकृत पार्किंगवर कारवाईची गरज
एरंडवण्यातील एसएनडीटी मेट्रो स्थानक ते पौड फाट्यादरम्यान असलेल्या कालवा रस्त्यावर अनेक अतिक्रमणे झाली आहेत. मेट्रोने ये-जा करणारे प्रवासी या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृतपणे वाहने पार्क करतात. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. येथील रहिवाशांनीही रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. तसेच मेट्रो स्थानकाशेजारीच विटा, वाळू, खडीची बेकायदेशीर विक्री सुरू असून, त्यांची वाहनेही रस्त्यावरच लावलेली असतात. त्यामुळे येथे दुहेरी व तिहेरी पार्किंग केले होत असल्याने इतर वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यातच अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या रिक्षांमुळे रहदारीस रस्ताच उरत नाही. या रस्त्यावर सिग्नल नसल्याने अनेक वाहनचालक या कालवा रस्त्याला प्राधान्य देतात. परंतु अतिक्रमणांमुळे येथे कोंडी उद्भवत असल्याने त्यांचाही वेळ वाया जातो. महापालिका प्रशासन मात्र याकडे काणाडोळा करत आहे. या अतिक्रमणांवर व अनधिकृत पार्किंगवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
- शिवाजी पठारे, कोथरूड (PNE26W19120)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.