लोगो ः दुष्काळाच्या झळा
चिया सीडची लागवड माघारण्याची शक्यता
सिंचनासाठी पाणीच नाही; शिल्लक पाण्यावर हळद पीक वाचविण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न
ॲग्रोवन वृत्तसेवा
वाशीम ः चिया सीड उत्पादनासाठी लौकिक मिळविलेल्या वाशीम जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे या पिकाच्या लागवड क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. पावसातील खंड आणि सिंचनासाठी पाण्याची अनुपलब्धता यामुळे शेतकरी चिया सीड लागवडीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. चांगले बाजारभाव मिळत असतानाही सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतकऱ्यांना या पिकाची लागवड करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाचा फटका चिया सीड लागवडीलाही बसण्याची चिन्हे आहेत.
वाशीम जिल्ह्यात मागील दोन-तीन हंगामांत चिया सीड लागवडीला प्रोत्साहन मिळाले होते. बाजारात सातत्याने चांगले दर मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनीही या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला होता. कृषी विभागानेही लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून जिल्ह्यात चिया सीडचे क्षेत्र १० हजार हेक्टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
चिया सीडचा वापर सुपरफूड म्हणून केला जातो. त्यामुळे बाजारात या पिकाला मागणी आहे.
चिया सीडच्या मूल्यवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले होते. गेल्या वर्षभरात चिया सीडला प्रति क्विंटल १० हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत होता. काही काळात दर १८ ते १९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे तुलनेने चांगले उत्पन्न मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी या पिकाकडे आकर्षित झाले होते.
मात्र, यंदा दुष्काळी स्थितीने या समीकरणाला छेद दिला आहे. पावसातील खंड आणि पाण्याची कमतरता यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या नियोजनावर मर्यादा आल्या आहेत. चिया सीडची लागवड करण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. या पिकाला चार ते पाच वेळा सिंचनाची गरज असते. त्यामुळे बाजारभाव अनुकूल असतानाही लागवड करणे शक्य होईलच, अशी परिस्थिती नाही.
हळदीचे पीक
वाचविण्याला प्राधान्य
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या मर्यादित पाण्यावर शेतकरी सध्या हळदीचे पीक वाचविण्याला प्राधान्य देत आहेत. आधीच लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्याचे आव्हान असताना नव्या पिकासाठी पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे. त्यामुळे यंदा चिया सीडच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. रब्बीत १० हजार हेक्टरपर्यंत नेलेले क्षेत्र यंदा हजार हेक्टरपर्यंत तरी राहते किंवा नाही, याबाबत शाश्वती नाही. चांगला बाजारभाव असूनही पाण्याअभावी या पिकाला माघार घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.