भारज साठवण तलाव
कोरडा; पाणीप्रश्न गंभीर
भीषण पाणीटंचाई; पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
बर्दापूर, जि. बीड ः अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने परिसरातील भारज आणि बर्दापूर गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरींनीही तळ गाठल्याने आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
भारज साठवण तलाव हा परिसरातील पाण्याचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. मात्र, सध्या तलावात पाणीसाठा शिल्लक नसल्याने त्याचा थेट परिणाम भारज आणि बर्दापूर येथील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. तलावातील पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरींची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा पडत आहे.
भारज आणि बर्दापूर परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. प्रशासनाने पाण्याची गरज भागविण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे तातडीने सर्वेक्षण करून पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध विहिरींचे अधिग्रहण किंवा अन्य पर्यायी जलस्रोतांचा वापर याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट ---
पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांची गरज
तलावातील गाळ काढणे, ओढ्याचे खोलीकरण करणे, गाव तलावातील गाळ काढणे, तलावातील सार्वजनिक विहिरीची उंची वाढविणे, सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण करणे, पाइपलाइन टाकणे, विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण करणे, विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करणे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची सोय आणि नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
कोट ----
पाणीटंचाई वाढली असून पाणीपुरवठ्याच्या विहिरीतही पाणी नसल्यामुळे बर्दापूरच्या नागरिकांना यंदा भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा आणि पाणी वाया जाणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. या कठीण परिस्थितीत बर्दापूर गावातील सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- अनिता विकास मोरे, सरपंच, बर्दापूर
कोट ---
पाण्याचा वापर काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने करून बचत करावी. ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीटंचाई निवारण्यासाठी शक्य त्या उपाययोजना केल्या जातील. नागरिकांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
- वनमाला व्यंकट शिंदे, सरपंच, भारज
छायाचित्र ओळी ----
बर्दापूर, ता. अंबाजोगाई ः येथे पावसाअभावी कोरडा पडलेला भारज साठवण तलाव. (छायाचित्र : गोविंद सूर्यवंशी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.