माण, खटाव तालुक्यांत
पाणीटंचाईच्या तीव्र झळा
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील व अन्य भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण आणि खटाव तालुक्यांत मात्र पिण्याच्या पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष कायम आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, या दोन तालुक्यांतील ३६ गावे आणि २६४ वाड्यांना सध्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत असून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला ३३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
या पाणीटंचाईचा मोठा फटका दोन्ही तालुक्यांतील ५६ हजार ६८५ लोकसंख्येला आणि ४२ हजार ९४७ पशुधनाला बसत आहे. यामध्ये सर्वाधिक दाहकता माण तालुक्यात जाणवत असून, येथील ३० गावे व २२७ वाड्या बाधित आहेत. दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, आंधळी, पळशी, विरळी आणि मायणी परिसरातील तब्बल ५० हजारांहून अधिक ग्रामस्थ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. माण तालुक्यासाठी मंजूर असलेल्या २९ टँकर्सच्या माध्यमातून दररोज ६१ पेक्षा अधिक फेऱ्या मारून पाणी पुरवले जात आहे.
दुसरीकडे खटाव तालुक्यातील एनकुळ, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, गारवडी आणि पडळ या ६ गावांतील ३७ वाड्यांमध्ये टंचाई निर्माण झाली असून तिथे ४ टँकर्स सुरू आहेत. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने दोन्ही तालुक्यांत मिळून १६ विहिरी व ९ बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे. एका बाजूला जिल्ह्यात पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत असताना, दुसरीकडे माण-खटावमधील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.