उजनीच्या पाण्याचा हिशेब ठरला; वापरावरही निर्बंध!
रब्बी हंगामासाठी ३७.६९ टीएमसीचे नियोजन; शहरांना १० टक्के बचतीचे निर्देश, नदीकाठच्या गावांना एक दिवासाआड सलग सहा तास वीज
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. उजनी धरणात सध्या ६५ टक्के पाणीसाठा असला, तरी मध्यम व लघुप्रकल्पांमधील साठा अत्यल्प आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा. महापालिका व नगरपालिकांनी शासन निर्णयानुसार १० टक्के पाणी बचत करावी, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी (ता. ५) दिले. रब्बी हंगामातील उर्वरित कालावधीसाठी एकूण ३७.६९ टीएमसी पाणी वापराचे नियोजनही करण्यात आले. पिण्यासाठी भीमेतून सोडण्याकरिता ९ टीएमसी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, ते कधी सोडायचे याबाबत निर्णय झाला नाही. तसेच उजनीतून सोडलेले पाणी अरळी बंधाऱ्यात पोहोचले असून त्याखाली पाणी सोडण्याबाबत विजयपूर जिल्हा प्रशासनाशी चर्चेनंतर निर्णय होणार आहे.
नियोजन समितीच्या सभागृहात उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पाणीपुरवठा, सिंचन आणि वीजपुरवठ्याच्या नियोजनावर चर्चा झाली. पाणीपुरवठा योजनांना नियमानुसार पाणी उपलब्ध करून दिले जाईल. मात्र, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही जबाबदारी घ्यावी, असे गोरे यांनी सांगितले.
नदी व कालव्यालगतच्या गावांना एक दिवसाआड सलग सहा तास वीजपुरवठा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकाच वेळी आणि समान प्रमाणात वीज मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवावा. सिंचनाची सुविधा असलेल्या आणि सध्या उभी पिके असलेल्या शेतकऱ्यांचा विचार करून वीजपुरवठ्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कालवा फोडणे किंवा अनधिकृत पाणी उपसा केल्यास संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जलसंपदा आणि पोलिस विभागाला देण्यात आले. नादुरुस्त यंत्रणा दुरुस्त करून अतिरिक्त पंपांची उपलब्धता करण्यासही सांगण्यात आले.
आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, उत्तम जानकर, अभिजित पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्याची दक्षता घेण्याची मागणी केली. बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
चौकट
रब्बी हंगामासाठी ३७.६९ टीएमसी पाण्याचे नियोजन
कालावधी ः ४ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७
पाणी वापर नियोजित पाणी (टीएमसी)
- बाष्पीभवन ४.२८
- जलाशय उपसा सिंचन ३.२१
- बिगर सिंचन (पिण्यासाठी) ०.८२
- औद्योगिक वापर ०.६०
- जलाशयातील गाळ ३.८७
- सीना-माढा उपसा सिंचन १.३१
- दहिगाव उपसा सिंचन ०.५७
- कालवा प्रवाही सिंचन ९.५०
- भीमा-सीना जोड कालवा ४.५३
- भीमा नदीतून पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ९
- एकूण नियोजन ३७.६९
मध्यम प्रकल्पांतील पाणी कोणाला आणि किती दिवस पुरणार?
प्रकल्प साठा (‘टीएमसी’मध्ये) पाणी पुरण्याचा अंदाज
- एकरुख ०.५५ ३० जून २०२७
- हिंगणी (पा.) ०.४४ ३१ ऑगस्ट २०२७
- जवळगाव ०.३६ ३१ ऑगस्ट २०२७
- मांगी ०.०९ ३१ जानेवारी २०२७
- बोरी ०.१७ २८ फेब्रुवारी २०२७
- पिंपळगाव (दा.) ०.०२ ३१ डिसेंबर २०२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.