पुणे

भारत माझा देश आहे

CD

भारत माझा देश आहे!


भारताला स्वातंत्र्य मिळालं. मिळालेल्या स्वातंत्र्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लावले गेले. काही म्हणाले गोरे गेले. काळे आले. काहींना हे स्वातंत्र्य काळे की गोरे हे ही ठावूक नाही. स्वातंत्र्याचं झालं काय? आमच्या वाट्याला आलंच नाय. असा आकंठ आक्रोश ते तथाकथित विकासाच्या परिघाबाहेरून करीत राहिले. तर ज्यांच्या वाट्याला हे स्वातंत्र्य आलं, त्यांना या स्वातंत्र्याचं नेमकं काय करायचं, हे अजून उमगलं नाही.

गांधीबाबा गेले. जाताजाता त्यांची काठी चष्मा आणि घड्याळ तेवढे मागे राहिले. आपण त्याचं केलं काय, तर ती काठी गेली सत्तर वर्षे एकमेकावर उगारत राहिलो. धार्मिकतेच्या, जातीयतेच्या प्रादेशिकतेच्या चष्म्यातून एकमेकांना पाहत राहिलो...आणि हे करत असताना गांधीबाबाने मागे ठेवलेल्या घड्याळाला चावी द्यायचे विसरून गेलो. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला आपण भारतीय होऊ लागलो. आपण दिवसेंदिवस प्रतीकात्मक जगू लागलो. त्या प्रतीकांच्या आपण अस्मिता बनवल्या आणि त्याच प्रतीकांसाठी भांडू लागलो.
आपला भारतीय ते ग्रामीण, नागर, आदिम, डावे उजवे, पुरोगामी-प्रतिगामी, प्रवास होताना आपल्याला संवेदना बोथट आणि अस्मिता टोकदार झाल्या. स्वातंत्र्याचं भलं मोठं अवकाश आपण कप्प्याकप्प्यात बंधिस्त केलं. पंखांना बांधणारं आभासी सीमारेषांचं अस्तित्व आपण उभं केलं. रस्त्यावर पडलेला तिरंगा पाहून हळहळताना तिथंच फुटपाथवर झोपलेला मागास भारत आपल्याला दिसला नाही.

या सर्व गदारोळात आपण हे विसरलो, की कोणतीही मोठी गोष्ट येताना ती सोबत जबाबदारी घेऊन येते. छोट्या छोट्या गोष्टीतून देशाचं मोठेपण अधोरेखित होतं. आपल्या जबाबदार कृतीतून ते अभिवर्धीत होतं हे आपण विसरलो. भारत गावखेड्यांचा देश मानला जातो. पाच-साडेपाच लाख खेडी... कधी काळी गांधीबाबाने खेड्याकडे चला हा संदेश दिला होता. आज फिरून ७० वर्षांनी जर गांधीबाबांच्या चष्म्यातून खेडं पाहिलं तर?.. विकास किती आणि कुठंवर पोहोचला ही बाब अलाहिदा. आम्ही अजून स्वतःला आणि सरकारला वेगळे समजतो.. ‘सरकारी’ म्हणजे याच्याशी ‘मला घेणं देणं नाही’ अशी साधी व्याख्या आपण ठरवून टाकलीय. शेजाऱ्याने बांध रेटला म्हणून कोर्टकचेऱ्या करणारे आपण साथ रोगात माणसं मरू लागली तरी गटार उपसायला सरकारची वाट बघतो. फुटलेल्या पाण्याच्या सार्वजनिक स्टँडपोस्टला वर्षानुवर्षे तोट्या नसतात. मात्र, जपानमध्ये धागा सुईने सार्वजनिक गाड्यांच्या सीट शिवणाऱ्या माणसाच्या पोस्ट आवडीने व्हायरल करतो. आपल्या देवळांची शिखरं आभाळाला भिडलेली असतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या भिंती पडायला आलेल्या असतात, ज्यात देशाचे भवितव्य घडत असते. सरकारने अनुदानातून दिलेल्या घरांमध्ये प्रत्येकवेळी संडास बांधायलाच कशी काय जागा अपुरी असते?.. किंवा सरकारी योजनेतून उभ्या झालेल्या सार्वजनिक संडासची दारे खिडक्या का निखळलेल्या असतात? असे एक ना अनेक प्रश्न.. सरकारी योजनांमधला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे शस्त्र वापरणारे आपण रस्त्यावर पडलेला खड्डा मुजवण्यासाठी प्रशासनाला दोन ओळीचे पत्र का बरं लिहू शकत नाही.

दरवेळी केवळ भारत माझा देश आहे म्हणून भागत नाही. भारत माझा देश आहे म्हणताना मी देशाचा कोण आहे, हा प्रतिप्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.. मग माझीही काही कर्तव्ये आहेत, ती मी करतो का? स्वच्छ भारत होताना नागरिक म्हणून स्वच्छतेची काही तत्त्वे पाळावी, हे महत्त्वाचं नसतं का? स्वच्छतेची भावना आधी मनात जिवंत हवी. मग मी नागरी, ग्रामीण वा कुणी अन्य याला तितकंसं महत्त्व राहत नाही.. दरवेळी मी टॕक्स भरतो असेही म्हणून भागत नाही.. मी भरलेल्या कराचा योग्य वापर होतो का? हे पाहणंही कर्तव्यात येतंच की. केवळ बोटाला शाई लावून भारतीय होता येणार नाही. ते तर आद्यकर्तव्य आहे. मात्र, मी निवडून दिलेलं सरकार माझं आहे, उभी राहिलेली मालमत्ता माझी आहे, ही भावना खोलवर रुजली पाहिजे.. मग दंगे धोपे होताना दरवेळी एसटी बस का फुटतात? हा प्रश्न पडणार नाही.

चार ग्रामसभा असतात वर्षाकाठी. बजेट ठरतं. लाभार्थी ठरतात. समस्या सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असतं..दरवेळी कोरमअभावी जर ग्रामसभा तहकूब होत असेल, तर तुम्हाला काहीही अधिकार नसतो टीका करण्याचा, आक्रोश करण्याचा वा देशप्रेमाचा टेंभा मिरवण्याचा. ७० वर्षे उलटूनही दारिद्र्यरेषा जैसे थे आहे. रेशनिंग दुकानातून चार-दोन रुपये किलोचा गहू-तांदूळ त्यामुळे दुप्पट दराने खासगी दुकानात फिरून विकता येतो. सरकारी अनुदानातून मिळालेली कोळपी, पाइप, इंजिने, अर्ध्या किमतीत विकता येतात. प्रत्येकवेळी बँकेतून घेतलेलं कर्ज उपजीविकेसाठी वापरलं जात नाही. बरेचदा तर सावकारी कर्ज फेडण्यासाठी ते वापरलं जातं. कारण बँकेचं कर्ज माफ होणार, अशी आपली ठाम धारणा आहे.

आपणच या सवयी आपल्या अंगी भिनवून घेतल्या. आपल्या सवयी मग हळूहळू जगण्याचा भाग झाल्या. निवडणुकीत पाचशेची नोट घेतल्यामुळे आपले उपद्रव मूल्य पाचशेच्या खाली गेले. आपण आपली पाच वर्षांची किंमत ठरवून टाकली. आपला विद्रोह लुळा झाला. पाचशेच्या नोटीने आपली प्रश्न विचारण्याची शक्ती काढून घेतली. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपलं नेमकं काय झालं? आपण आपल्याच अस्मितांच्या, जातीपातींच्या जोखडातून कुठं मुक्त झालो? आपलं काय झालंय की आपल्याला अमाप स्वातंत्र्य मिळालंय; पण ते उपभोगता येत नाही. कारण त्याचं मूल्य आणि मोल आपल्याला माहीत नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माझ्या पिढीला झगडावं लागलं नाही.. त्यामुळे माझ्या पिढीला त्याची किंमत कळाली नाही.. समाजमाध्यमावर स्वार झालेली माझी पिढी प्रतीकांच्या चक्रव्यूहामध्ये अडकून पडली. लुटुपुटीच्या आभासी लढाया लढू लागली. त्या जिंकल्याचे समाधान मानू लागली. आभासी सुखदुःखात रमू लागली. एमबीचे जीबी झाले. काही दिवसांनी अनलिमिटेड होतील.. आपले प्रश्न सुटल्याचा भास उभा राहील. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला फिरून भारतीयत्वाची आठवण येईल.. प्रोफाईलवर तिरंगे येतील.. काही क्षण भारत माझा देश असल्याचा आभास निर्माण होईल. मात्र, १६ ऑगस्टला त्या भारतात अनेक छोटे-छोटे देश असतील आणि ते पुढच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत लुटुपुटीच्या लढाया लढत राहतील. फूटपाथवरचा, गावकुसाबाहेरचा भारत आहे तिथंच राहील. त्यांचे प्रश्न आहे तसेच राहतील.

अदम गोंडवीची एक ओळ आहे. ती मला फिरून फिरून आठवते.

सौ मे सत्तर आदमी.. फिलहाल जब नाशाद है...
दिल पे रखके हात कहीये...देश क्या आझाद है?

-नीलेश महिगावकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

बाबा गाडीतून उतरले आणि अख्खा रानडे रोड जॅम झाला... अजिंक्य देव यांनी सांगितला दिवाळीतला तो किस्सा

Dombivli News: पेशवेकालीन तोफा पुन्हा मलंगगडावर, प्रशासकीय चौकशी सुरू असतानाच ऐतिहासिक वस्तू मंदिर प्रांगणात

Shivsena SC Hearing LIVE Updates : 'सादिक अली' प्रकरणाचा निकाल शिवसेनेच्या केसला लागू होत नाही, सिब्बल यांनी नेमकं काय सांगितलं?

विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्या, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल आक्रमक; सुनावणीत नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT