उरलं काय आहे ?
इथं राहून गेलेले तुझे माझे क्षण पुन्हा नव्याने आठवून मी तुला आत्ता बघतोय. किती बदल झाला न मीरा आपल्यात? आयुष्यात, शरीरात, आपल्या नात्यात आणि आपण दोघांनी बघितलेल्या प्रत्येक त्या स्वप्नांत ? मी हल्ली खूप विचार करतो सगळ्या गोष्टींचा. पेपर वाचताना चोरून तुला बघतो आणि देवाचे आभार मानतो की तू माझ्या नशिबात आलीस. तुला माहितीय का मीरा ? ( मोहन)
काय ? ( मीरा)
त्या प्रेमाच्या दिवसात मला कमवायची अक्कलही नव्हती आणि दोन वेळ पोटभर खायची ऐपतही नव्हती. तू तुझ्या वाटणीचा डबा मला भेटताना घेऊन यायचीस. बस स्टॉपवर बसून तू मला तो बळजबरी सगळा खायला भाग पाडायचीस. नव्हती गं भूक माझी एवढी कधी. फक्त दोन चपात्यांची भूक माझी भातपण वर जायचा नाही; पण तू चार कधी साडेचार चपात्या आणून भरपूर भाजी आणायचीस.. कधी-कधी कोशिंबीर, काकडी, लोणचं, चटणी ही आणायचीस. तुझ्या घरी वाटत असेल इतकं खाऊन पण मीरा वाढत कशी नाही; पण मीरा का वाढत नाही, हे फक्त मलाच माहीत होत. माझी पहिली नोकरी आणि तुझा आनंद. नंतर तुझ कॉलेज संपल्यावर तुला चांगली नोकरी लागली आणि माझा आनंद. भार कमी केलास माझा तू. आपल्या लग्नाचा. तोपर्यंत माझ्या काही असं मनात नव्हतंच; पण तुझ्या पुढाकाराने मी आणि तू पळून जाऊन लग्न केलं. सगळं कमावलं, सगळं काही मिळवलं. जी स्वप्नं बघितली, त्या काळात आपण भरपूर त्यातल्या निम्म्या स्वप्नांना साकारहा केलं. निम्म्या स्वप्नांचा बालिशपणा होता आपला. प्रेमात काय कळत होतं तेव्हा तुला नि मला ? ( मोहन)
गप्पच बसा... मला सगळं कळायचं तुम्हीच बालिश होता. एक अन् एक गोष्ट मला सांगायला लागायची तुम्हाला तेव्हा कुठे करायचात. विसरलात वाटत? (मीरा)
नाही; पण खरंच. लग्नानंतर तू अजूनच माझ्यावर प्रेम केलंस. मला साथ, आधार सगळं-सगळं दिलंस. मला सांभाळलंस, वर घर सांभाळलंस आणि त्यात कमी म्हणून आपल्या अमितलाही तू सांभाळलंस. ( मोहन)
हो मग... नको होतं का सांभाळायला ? का संसार प्रेम फक्त तुमचंच होत ं? ( मीरा)
नाही म्हणजे खूप सोसलंस तू माझ्यासाठी खूप केलंस माझ्यासाठी. तुला जे-जे हवं ते-ते मी देण्याचा प्रयत्न केला आणि मला, अमितला जे-जे हवं ते-ते तू माझी बायको म्हणून आणि अमितची आई बनून प्रयत्नच नाहीतर पूर्णपणे आम्हाला हवं ते दिलंस. मागच्या ४१ वर्षांचा विचार केला मी तर आता काय स्वप्नं बघावीत किंवा ती पूर्ण करावीत, असं वाटत नाही सगळं आहे जे हवं होतं आपल्याला. आपला अमित आपली सूनही चांगली आहे. आपलं हक्काचं घर आहे. पुरेसा पैसा, दागिने आपल्याकडे आहेत. मुलाचं लग्न. त्याचा संसार, आपला नातू हे बघायला आपण दोघंही आहोत. पांग फिटलंय या जन्माचं फक्त तुझ्यामुळे. (मोहन)
पण एक स्वप्न राहिलंय माझं पूर्ण व्हायचं. (मीरा)
कोणत ? आणि मला कसं माहीत नाही ? बोल मी पुरं करेन मीरा.
माझ्या आधी तुम्ही जायचं नाही. कारण मी अमितवरपण करत नाही इतकं प्रेम तुमच्यावर केलय. अमित नव्हता, आपल लग्नही झालं नव्हतं तेव्हा एखाद्या लहान मुलासारखी तुमची काळजी घेतलीय तुम्हाला जपलंय. मला वचन द्या. (मीरा)
मीरा ए-ए काय होतंय तुला घाम का फुटतोय इतका. बघू इकडं... (मोहन)
मला वचन द्या. मी तुमच्यासाठी जे-जे केलं ते माझं प्रेम आहे. तुम्हीही मला प्रामाणिकपणे साथ दिली ते पण तुमचं प्रेम होतं; पण एक शेवटची इच्छा पूर्ण करा, माझ्या आधी चुकूनही जायचं नाही. कारण तुम्ही जर गेलात तर मी मेली तरी मरणार नाही. तुम्हाला राहावं लागेल माझ्यासाठी जीव स्वतःचा स्वतःत अडकवून. (मीरा)
पण मी काय करायचं ग मीरा तुझ्या माघारी ? मला जगता येणारे का ? ( मोहन)
दोघांच्या अश्रूंच्या धारेत मीराचे अश्रू सुकतात आणि प्रयत्न न करताच माधव मीराचं स्वप्न पूर्ण करून जातो. माधवचा एक मोठा आक्रोश होतो. अमित आत पळत येतो आणि बघतो. एका मेलेल्या प्रेमाला एक जिवंत प्रेम कवटाळून पुन्हा जिवंत करू पाहत होतं.
(एक वर्षाने) श्रीखंड, पुरी, पिवळ्या बटाट्याची भाजी, ती चिंच घालून केलेली गोडाची आमटी. भाताची मुद, कांद्याची आणि बटाट्याची वर घोसावळ्याची भजी, काकडीची कोशिंबीर, गाजराची दह्यातली चटणी, लसूण खोबऱ्याची चटणी, ताक, लिंबाची फोड, मीठ सगळं तुझ्या आवडतं बनवलं त्या स्वयंपाकवाल्या बाईने. अमितला आणि त्याच्या बायकोला दोघांना वेळ नव्हता. या आधी तुझा कधीच मला त्रास झाला नाही; पण हा तुझा फोटो डोळ्यासमोर आला की मात्र त्रास होतो मला. जिवंत असताना दिला असतास तर चाललं असत; पण आता त्रास द्यायला प्रत्यक्ष तू नाहीस मीरा आणि त्रास सहन करायला पहिल्यासारखी ताकदही उरली नाहीये माझ्यात. तरी मग तुझ्या फोटोवरचा कागद काढून फोटोची काच पुसून घेतली. फ्रेमच्या कडा पुसून घेतल्या आणि मागूनही पुसला नीट फोटो.
मग फोटोला आपल्याच खोलीत ठेवलं. बाहेर हॉलमध्ये ठेवलं तर आल्या-आल्या सुनेला, अमितला ते सगळं बघायला मिळेल. बिचारे काम करून येणार दिवसभर थकून आणि परत त्यांचा मूड जायचा. म्हणून मग आपल्याच खोलीत ठेवला तुझा फोटो.
ए.. मीरा ऐक की... रात्री येशील का गं मला भेटायला याच फोटोतून बाहेर ? मला उठवू नकोस; पण एकदा मला बघून तरी जा. टेन्शन नाही कसलंच मला; पण त्रासाने तुझ्या विरहाने इतके विचार सतत डोक्यात असतात कधी छातीत दुखतं, कधी कमरेला, कधी गुडघ्याला दुखतं तर कधी डोकं फुटायची वेळ येते; पण हे सांगणार मी कुणाला ? कोणीच नसतं घरी. आज श्राद्ध आहे तुझं. असं म्हणतात पित्र खाली येतात. मला वाटतंय तू पण येशील आणि मी तरी निदान तुला नीट दिसायला हवा म्हणून काल काळा रंग लावलाय बघ केसांना; पण कमी झालेल्या केसांना परत जोडू शकत नाही. प्रत्येक प्रश्नांची उत्तर हल्ली मिळत नाही. मी जगतोय का ? मी जगू किती ? आणि मला मरण आलंच तर ते चटकन यावं कुठल्या त्रासात नको. कारण माझं करायला कुणाला आता वेळ नाही. असं वाटत बटण दाबल्यावर जशी ट्यूबलाईट विजते इतकं सहज पटकन मरून जावं.
पण खर सांगू तुझी खूप आठवण येतीय मीरा. तूच सांग मला आठवणी काय आपल्या एक-दोन दिवसांच्या आहेत का ? ४२ वर्षांच्या आहेत आणि सतत प्रत्येक आठवण मला आठवत राहते. मीही त्यात रमून असतो; पण मग भानावर आलं की समजतं आयुष्यात माझ्या आत्ता नक्की उरलं काय आहे ? ( मोहन)
------------
अजिंक्य भोसले
9923690609
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.