शिरगाव परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ
वन विभाग सुस्त; उभ्या पिकांची नासधूस, तातडीने मदतीची मागणी
भुईंज, ता. ४ : वाई तालुक्यातील शिरगावसह पूर्व भागातील अनेक गावांमध्ये सध्या वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. डोंगरालगत असलेल्या शेतीमध्ये रानडुक्कर आणि इतर जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने हातातोंडाला आलेला घास हिरावला जात आहे. पिकांच्या होत असलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
शिरगाव, देगाव, बेलमाची, खोलवडी, काळंगवाडी आणि गोवेदिगर यांसारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेती फुलवली आहे. कमी पाऊस असतानाही अनेक किलोमीटरवरून पाणी आणून आणि मोठे भांडवल गुंतवून कपाशी, हरभरा, ज्वारी अशी पिके उभी केली आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी रानडुकरे आणि गव्यांचे कळप शेतात घुसून पिकांचा फडशा पाडत आहेत. विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेताला तारेचे कुंपण घातले आहे; परंतु रानडुकरे या कुंपणाखालून सरपटत आत शिरून पिकांची नासधूस करत आहेत.
‘शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही का?’ असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, वन विभागाचे अधिकारी केवळ दिवसा हजेरी लावतात आणि लाकूड तस्करी पकडण्याच्या कामातच व्यस्त असतात. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पिकांची राखण करताना रात्रभर जागूनही प्राण्यांचा बंदोबस्त करणे कठीण झाले आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी काही पिकांची पेरणी करणेच बंद केले आहे.
वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे, तसेच वैयक्तिक पातळीवर कुंपण घालणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने शासनाने सर्व शेतकऱ्यांना कंपाउंडसाठी (तारेच्या कुंपणासाठी) १०० टक्के अनुदान द्यावे, जेणेकरून शेती सुरक्षित राहू शकेल.
कोट
दिवसभर शेतात राबायचे आणि रात्री वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी जागून काढायचे, अशी आमची अवस्था झाली आहे. सदाशिव शिंदे यांच्या शेतातील ज्वारीच्या कणसांचा डुकरांनी अक्षरशः फडशा पाडला आहे. प्रशासनाने आता तरी झोपेतून जागे व्हावे
- राहुल शिंदे, भुईंज
B01449
शिरगाव ः येथील सदाशिव शिंदे यांच्या शेतात रानडुकरांनी ज्वारीच्या कणसाचा पाडलेला फडशा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.