पान १२- १५ साठी
---------------------------------
रानभाज्या ः पोषणसुरक्षेसाठी समृद्ध अन्नस्रोत
------------------------------------------------
जैवरासायनिक संशोधनानुसार विविध रानभाज्यांमध्ये उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फिनॉलिक संयुगे आणि जैवसक्रिय घटक आढळले आहेत. त्यामुळे या भाज्यांवर अधिक संशोधन करून त्यांचे पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासणे आवश्यक आहे.
-----------------------------------------
श्रीकृष्ण नरळे, डॉ. प्रकाश लोखंडे, स्मिता मोहिते
-----------------------------------------
ग्रामीण भागात रानभाज्यांचा वापर हा पारंपरिक आहारसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या हंगामात शेती बांध, माळरान किंवा जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अनेक वनस्पतींची पाने आणि कोवळे भाग भाजी म्हणून वापरले जातात. महाराष्ट्रात तांदुळजा, अंबाडी, टाकळा, कोळभाजी, चवळीची पाने, शेपू इत्यादी रानभाज्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. रानभाज्या केवळ पारंपरिक अन्न नसून त्यामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजद्रव्ये, प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि जैवरासायनिक सक्रिय संयुगे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे या भाज्या पोषणसुरक्षा, आरोग्य संरक्षण आणि शाश्वत आहार प्रणालीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
प्रमुख रानभाज्या ः
महाराष्ट्रात विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक प्रकारच्या रानभाज्या आढळतात. या रानभाज्या ग्रामीण भागात सहज उपलब्ध असल्यामुळे त्या स्वस्त, पौष्टिक आणि पर्यावरणपूरक अन्नस्रोत ठरतात.
रानभाजी---वैशिष्ट्ये
तांदुळजा---लोह, कॅल्शिअमचे चांगले स्रोत
अंबाडी---जीवनसत्त्व क आणि अँटीऑक्सिडंट समृद्ध
कोळभाजी---प्रथिने व तंतुमय पदार्थ भरपूर
टाकळा---औषधी गुणधर्म असलेली वनस्पती
शेप--- सुगंधी व पचनासाठी उपयुक्त
चवळीची पाने---प्रथिने व खनिजद्रव्ये
महत्त्वाचे जैवरासायनिक घटक ः
जीवनसत्त्वे ः
रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे जैवरासायनिक घटक आढळतात, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
क्र.--- जीवनसत्त्व---रासायनिक स्वरूप / घटक---जैवरासायनिक महत्त्व
१--- जीवनसत्त्व अ---बीटा-कॅरोटीन--- बीटा-कॅरोटीन हे कॅरोटेनॉइड वर्गातील संयुग असून, ते शरीरात रेटिनॉलमध्ये रूपांतरित होते. रेटिनामध्ये रोडोप्सिन या प्रकाशसंवेदनशील रंगद्रव्याच्या निर्मितीस मदत करते. त्यामुळे अंधारात पाहण्याची क्षमता सुधारते आणि रातांधळेपणा टाळण्यास मदत होते. तसेच त्वचा व श्लेष्मल त्वचेचे संरक्षण करते.
२--- जीवनसत्त्व क---ॲस्कॉर्बिक आम्ल--- हे पाण्यात विद्राव्य जीवनसत्त्व असून शक्तिशाली प्रतिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करून पेशींचे संरक्षण करते. कोलेजन निर्मितीस मदत करते, जखमा लवकर भरून येण्यास साह्य करते आणि लोहाचे शोषण वाढवून रक्तनिर्मितीस मदत करते.
३--- जीवनसत्त्व ई---टोकोफेरॉल---हे चरबीयुक्त जीवनसत्त्व असून पेशींच्या झिल्लीचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करते. शरीरातील लिपिड्सचे ऑक्सिडेशन कमी करते. त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
४--- जीवनसत्त्व के---फिलोक्विनोन--- रक्तातील प्रोथ्रोम्बिन प्रथिनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. जखम झाल्यानंतर रक्तस्राव थांबविण्यास मदत करते. तसेच कॅल्शिअमचे योग्य नियमन करून हाडांच्या मजबुतीस साहाय्य करते.
खनिज द्रव्ये ः
क्र.--- खनिजद्रव्य---प्रमुख स्रोत रानभाज्या---शरीरातील भूमिका---सविस्तर माहिती
१--- लोह---तांदुळजा, राजगिरा, चवळीची पाने---रक्तनिर्मिती---लोह हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक खनिज आहे. हिमोग्लोबिन रक्तामधून प्राणवायू शरीराच्या विविध पेशींना पोहोचवते. लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताल्पता निर्माण होऊ शकते.
२--- कॅल्शिअम--- शेपू, तांदुळजा, राजगिरा--- हाड मजबुती---कॅल्शिअम हाडे व दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तसेच स्नायूंचे आकुंचन, मज्जासंस्थेचे कार्य आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत त्याची महत्त्वाची भूमिका असते.
३--- मॅग्नेशिअम---अंबाडी, कोळभाजी, अळू--- एन्झाइम क्रिया--- मॅग्नेशिअम अनेक एन्झाइमांच्या कार्यासाठी आवश्यक घटक आहे. हे ऊर्जा निर्माण, प्रथिन संश्लेषण आणि पेशींच्या चयापचय प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
४--- पोटॅशिअम--- भोपळ्याची पाने, चवळीची पाने--- दाब नियंत्रण--- पोटॅशिअम शरीरातील द्रव संतुलन राखण्यास मदत करते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि स्नायू व मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक आहे.
५--- फॉस्फरस--- तांदुळजा, राजगिरा--- ऊर्जानिर्मिती--- फॉस्फरस ऊर्जा चयापचय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. तो एटीपी या ऊर्जा वाहक संयुगाच्या निर्मितीस मदत करतो, हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे.
६--- झिंक---कोळभाजी, अंबाडी---रोगप्रतिकार--- झिंक शरीरातील अनेक एन्झाइमांच्या क्रियेत सहभागी असते. हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास, जखमा भरून येण्यास आणि पेशींच्या वाढीस मदत करते.
७--- मँगेनीज--- तांदुळजा, करडईची पाने--- चयापचय--- मँगेनीज हे अनेक एन्झाइम प्रणालींचा घटक आहे. हे कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि लिपिड्सच्या चयापचय प्रक्रियेत साहाय्य करते.
८---तांबे---अंबाडी, चवळीची पाने---रक्तसंश्लेषण--- तांबे हे लोहाच्या योग्य वापरासाठी आवश्यक आहे. ते हिमोग्लोबिन निर्मिती आणि एन्झाइम क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
जैवरासायनिक सक्रिय संयुगे ः
रानभाज्यांमध्ये विविध प्रकारची जैवरासायनिक सक्रिय संयुगे (फाइटोकेमिकल्स) आढळतात. ही संयुगे शरीरातील मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करून पेशींचे संरक्षण करतात आणि अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.
फिनॉलिक संयुगे :
- फिनॉलिक संयुगे ही शक्तिशाली प्रतिऑक्सिडंट असतात. ती शरीरातील मुक्त रॅडिकल्स निष्क्रिय करून पेशींना होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात. त्यामुळे पेशींचे संरक्षण होते आणि हृदयरोग व इतर दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
फ्लॅव्होनॉइड्स :
- फ्लॅव्होनॉइड्स ही वनस्पतींमध्ये आढळणारी जैवसक्रिय रंगद्रव्ये आहेत. त्यांना प्रतिऑक्सिडंट आणि दाहरोधक गुणधर्म असतात. ही संयुगे रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
अल्कलॉइड्स :
- अल्कलॉइड्स ही वनस्पतीजन्य जैवसक्रिय संयुगे असून त्यांना विविध औषधी गुणधर्म असतात. ही संयुगे दाह कमी करणे, वेदना कमी करणे आणि काही रोगकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करणे यासाठी उपयुक्त ठरतात.
टॅनिन्स :
- टॅनिन्स ही संयुगे प्रतिऑक्सिडंट आणि जंतुनाशक गुणधर्म दर्शवतात. ती पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात तसेच काही हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध करतात. त्यामुळे शरीराच्या संरक्षणात त्यांची महत्त्वाची भूमिका असते.
आहारातील तंतू ः
रानभाज्यांमध्ये आहारातील तंतू भरपूर प्रमाणात असतात. हे तंतू पचनक्रिया सुधारतात बद्धकोष्ठता कमी करतात तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.
संशोधन आणि प्रसाराची गरज ः
आजच्या काळात पोषणतुटी ही एक मोठी समस्या आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात उपलब्ध असलेल्या रानभाज्या पोषणसुरक्षा सुधारण्यासाठी महत्त्वाचे साधन ठरू शकतात. रानभाज्या सहज उपलब्ध असल्यामुळे त्या कमी खर्चात मिळतात, रसायनमुक्त असतात आणि स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करतात. यामुळे रानभाज्या शाश्वत शेती आणि पोषणसुरक्षा यांच्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
-----------------------------
इन्फो ः
आरोग्यविषयक महत्त्व ः
अँटिऑक्सिडंट गुणधर्म :
- फिनॉलिक संयुगे आणि फ्लॅव्होनॉइड्स हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून पेशींचे नुकसान टाळतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढ:
- रानभाज्यांतील जीवनसत्त्व क आणि इतर जैवरासायनिक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवून संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण देतात.
दाहरोधक प्रभाव:
- काही रानभाज्यांमध्ये दाहरोधक संयुगे आढळतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते.
मधुमेह आणि हृदयरोग नियंत्रण :
- रानभाज्यांतील जैवरासायनिक घटक रक्तातील साखर व कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
रक्तवर्धक गुणधर्म :
- लोहयुक्त रानभाज्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करतात. रक्ताल्पता कमी करण्यास उपयुक्त ठरतात.
---------------------------------------------------------------
- श्रीकृष्ण नरळे ९१४६९७६०९८
(पीएचडी संशोधक विद्यार्थी, जीवरसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.