पुणे, ता. ९ ः स्त्री जाणिवांचा वेध घेणारी आणि स्त्री पात्र केंद्रस्थानी असणारी अनेक नाटके आजवर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सादर झाली. मात्र, अनेक वर्षांनी एकाचवेळी रंगभूमीवर स्त्रीपात्र प्रधान असलेल्या चार नाटकांचे प्रयोग सुरू आहेत. विशेष म्हणजे, यातील तीन नाटके ‘भद्रकाली’ या एकाच निर्मिती संस्थेची आहेत.
‘भद्रकाली’ची निर्मिती असलेल्या ‘संगीत देवबाभळी’, ‘करुणाष्टके’ आणि ‘सांगा कसं जगायचं’ या तीन नाटकांचा आणि स्क्रिप्टीज क्रिएशन्स व रंगाई निर्मित ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाचा समावेश आहे. या चारही नाटकांमध्ये स्त्री पात्रच केंद्रस्थानी आहे. स्त्रियांच्या भावविश्वाचा वेध, स्त्रियांचा सामाजिक-कौटुंबिक संघर्ष, मानसिक अवस्था, बंडखोरी याभोवती फिरणाऱ्या या नाटकांच्या संहिता आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे या चारही नाटकांचे लेखक मात्र पुरुष आहेत.
प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ २०१७ मध्ये रंगभूमीवर आलेले नाटक आजही ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसादात सुरू आहे. संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली आणि रखुमाई यांच्यातील संवादातून उलगडणाऱ्या या नाटकात दोन्ही स्त्री पात्रच आहेत. प्राजक्त देशमुख हेच लेखक-दिग्दर्शक असलेले ‘करुणाष्टके’ हे नाटक गतवर्षी रंगभूमीवर आले. तब्बल सात स्त्री पात्रे असलेल्या या नाटकातून १८ व्या शतकातील स्त्रियांचा सामाजिक संघर्ष चितारला आहे.
‘सांगा कसं जगायचं’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले असून, नीरज शिरवईकर यांचे लेखन-दिग्दर्शन आहे. ‘मेडिको लीगल ड्रामा’ असे वर्णन असलेल्या या नाटकात दोन मैत्रिणींचे नातेही केंद्रस्थानी आहे. ‘असेन मी नसेन मी’ हे देखील एका वेगळ्या धाटणीचे नाटक असून संदेश कुलकर्णी यांचे लेखन असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अमृता सुभाष यांचे आहे. आई-मुलीच्या गुंतागुंतीच्या नात्याच्या पार्श्वभूमीवर या नाटकातील कथानक घडते.
----
सशक्त अभिनेत्रींची परंपरा
मराठी रंगभूमीला सशक्त अभिनेत्रींची परंपरा लाभली आहेच. स्त्रीपात्रप्रधान नाटकांच्या निमित्ताने मध्यवर्ती भूमिकेतील या अभिनेत्रींचे काम पाहण्यासाठी रसिक आवर्जून या नाटकांचे प्रयोग पाहत आहेत. यात नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले, अमृता सुभाष, गीतांजली कुलकर्णी, पर्ण पेठे, कल्याणी मुळे, स्पृहा जोशी, स्वानंदी टिकेकर, शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी आदी अभिनेत्रींचा समावेश आहे.
----
‘‘सामाजिक जाणिवांवर आधारित नाटकांची निर्मिती, ही ‘भद्रकाली’ची ओळखच आहे. माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा मी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच अनवट, वेगळ्या पण महत्त्वाच्या विषयांवरील नाटकांची निर्मिती आम्ही केली. यात स्त्रीवादी, स्त्रीपात्रप्रधान नाटकांची यादीही मोठी आहे. त्यामुळे आत्ता रंगभूमीवर सुरू असलेली तीन स्त्रीप्रधान नाटके हा केवळ योगायोग नाही; तर आमच्या विचारपद्धतीचेच द्योतक आहे.
-प्रसाद कांबळी, निर्माते, भद्रकाली प्रॉडक्शन्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.