फायनल
----------------------
मॅग्नेट ः मुंढे
एकजुटीतून साधली
समृद्धीची नवप्रभा
--------------
कधीकाळी बचत गट म्हणजे किचकट वाटणाऱ्या महिलांनी आज बचतीच्या बळावर भाजीपाला निर्यातीपासून बंजारा हस्तकला, पारंपरिक व्यवसायांचे आधुनिकीकरण आणि ब्युटी पार्लरच्या विस्तारापर्यंत मजल मारली आहे. जालना जिल्ह्यातील आष्टी येथील सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून घनसावंगी व परतूर तालुक्यांतील ३२ गावांमध्ये महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची चळवळ आकाराला आली आहे. एकजुटीने बचत, व्यवसाय आणि नव्या संधींची सांगड घालत या महिला समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत.
--------------
संतोष मुंढे
--------------
सुरुवातीला महिलांना एकत्र करायचं, त्यांचा गट करायचा म्हटलं, की ही किचकट कशाला. आपलं चूल आणि मूल बरं. फार तर बांधावर जाऊन शेतातली काम इथपर्यंत ठीक, असं महिला म्हणायच्या. त्यांना याच्या बाहेर पडून काय करता येऊ शकतं, याविषयी समजूनच घ्यायचं नव्हतं. पण हिंमत हरली नाही, प्रयत्न सुरू ठेवले त्यांच्यात मिसळली, त्यांच्या चुलीपर्यंत गेली, तेव्हा कुठं सोपारा या एका गावात काही महिला एकत्र येऊन गटाने बचतीसाठी तयार झाल्या. त्यांनी गटाचं नावही ‘ओम नमः शिवाय’ ठेवलं, अन् आमच्याही कार्याचा श्री गणेशा झाला. जालना जिल्ह्यातील आष्टी (ता. परतूर) येथील सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सुषमा भास्करराव कुलकर्णी त्या परिसरात महिलांच्या एकजुटीतून समृद्धीची नवप्रभा अवतरणे कसे सुरू झाले याचा लेखाजोखा मांडत होत्या.
महिलांच्या सर्वांगीण विकासाची आत्मनिर्भरतेची चळवळ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून साधारणपणे २००३ मध्ये सुरू झाली. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये जालना जिल्ह्यातील आष्टी (ता. परतूर) येथे सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्र कार्यान्वित झाले. सोपारा येथील एका गटापासून सुरू झालेले काम आता घनसावंगी व परतूर तालुक्यातील ३२ गावांतील महिला बचत गटांपर्यंत पोहोचले आहे. या माध्यमातून सुमारे ३६२ बचत गट कार्यरत असून ३९४० महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना बचतीचे महत्त्व या लोकसंचालित साधन केंद्रामुळे उमगले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या एकूणच विकासासाठी ‘एकजुटीतून अवतरेल समृद्धीची नवप्रभा’ हे बिरुद घेऊन काम झाले. त्यातून आता महिला आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
.....
सहयोगिनी ते व्यवस्थापक ः
साधारणतः २००३ ते २०१५ दरम्यान सुषमा कुलकर्णी परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात सहयोगीनी म्हणून महिला बचत गटाच्या निर्मितीसाठी काम करत होत्या. २०१५ नंतर त्यांच्याकडे सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी आली. आता या केंद्रात लेखापाल म्हणून जुबेर मदार शेख, तर केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सहयोगिनी म्हणून संगीता भागवत दहिभाते, जयश्री आसाराम ढोके, अश्विनी रामकृष्ण गंगणे, सीमा आदेश नाईक कार्यरत आहेत.
....
आष्टी धोतरजोडा
या आष्टीच एक महत्त्व आहे. जशी पैठणला पैठणी तयार व्हायची, तसं पूर्वी इथे हातमागावर धोतर तयार व्हायचं. एक धोतर न घेता सलग दोन धोतराची जोडी तिथं तयार व्हायची. त्याला राज्य व देशभरातून खूप मागणी असायची. त्यामुळे या आष्टीला ‘आष्टी धोतरजोडा’ असं नाव प्रचलित झालं, असे परतवाडीचे शिवनारायण राठोड व चौरेवाडीचे बाबासाहेब चौरे सांगत होते. ते म्हणाले, आता ते हातमाग इथे राहिले नाही, धोतर जोडाही तयार होत नाही. परंतु आजही गावाच नाव आष्टी (धो.जो) असं लिहिलं जातं.
....
कार्यकारणी आणि कार्यपद्धती ः
सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राचे काम घनसावंगी तालुक्यातील नऊ, तर परतूर तालुक्यातील २३ गावांत सुरू आहे. या एकूण ३२ गावांतील नऊ सदस्यांची एक कार्यकारणी दर तीन वर्षांनी निवडली जाते. त्या कार्यकारणीच्या माध्यमातून महिलांच्या विकासात्मक कामांसाठी आवश्यक प्रकल्प राबविण्याचे काम केंद्राची यंत्रणा करते. केलेल्या सर्व कामांचा कार्य अहवाल सातत्याने सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापकांना या कार्यकारणी समोर ठेवावा लागतो. आता कार्यरत असलेल्या कार्यकारणीत जाईबाई मोरे, प्रेमला तौर, मंदाकिनी डोळस, शोभा शेळके, संगीता चौगुले, शालनबाई मोटे, रेखा मोरे, विजयमाला मोरे, लक्ष्मी देवकर यांचा समावेश आहे. अध्यक्षापासून सचिव, सहसचिव व सदस्य पदावर या महिला काम करतात.
.....
केंद्राचे उद्दिष्ट...
कार्यक्षेत्रातील महिला व पुरुष दारिद्र्यरेषेच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळवतील (दारिद्र्यरेषेतून बाहेर येतील) अशा स्थितीत आणणे, महिला पोषण आहाराकडे वळविणे, महिला ग्रामीण उद्योग व्यवसाय विकसित सेवेमध्ये येतील, महिलांच्या एफपीओ, एफपीसी अशा सक्षम संस्था तयार होतील असे काम करणे, महिला बँक लिकेज कार्यक्रमांतर्गत विकासात्मक कर्ज घेतील, महिलांचे आरोग्य, हक्क व अधिकार, शिक्षण त्याबाबतच्या क्षमता विकसित करणे, ८० टक्के महिला शाश्वत व्यवसायामध्ये गुंतलेल्या दिसतील, जास्तीत जास्त ग्रामीण उद्योजकाच्या नफ्यामध्ये वाढ झालेली दिसून येईल आदी उद्दिष्ट घेऊन आष्टीच्या सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राचे काम सुरू आहे. केंद्र नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प, तेजश्री फायनान्शिल सर्व्हिसेस, मानव विकास मिशन, स्मार्ट, मॅग्नेट, वॉटर. ओआरजी, महिला एफपीओ/एफपीसी तसेच नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कल्पातून काम करते आहे.
....
नावीन्यपूर्णतेचा ध्यास ः
श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, की सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून स्थापन झालेल्या सुमारे २०० बचत गटांचे काम बचत करणे, कर्ज घेणे आणि कर्जाची परतफेड करणे एवढ्यापुरतेच मर्यादित होते. परंतु सुमारे सव्वाशे ते दीडशे गट नावीन्याचा ध्यास घेऊन काम करतात. त्यामध्ये काही शेतकरी बचत गट गटशेती करतात, तर काहींनी पारंपरिक व्यवसायाला आर्थिक पाठबळ देऊन चालना देण्याचे काम केले आहे. यातूनच एक वेळ भेंडी निर्यातीची संधी साधली गेली, तर दोन वर्षांपूर्वी सिताफळ निर्यात करण्यापर्यंतचा प्रयत्न आम्ही केला. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. परंतु किमान १६२ लोकांना निर्यात आयात कशी करावी हे अवगत करणे आम्हाला शक्य झाले. मॅग्नेटच्या माध्यमातून फळबाग लागवड व व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, आयात- निर्यात परवाने याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आम्हाला यश आले. हे देखील काही कमी नाही.
.....
भेंडी निर्यातीपर्यंत मारली मजल ः
चौरेवाडी, ता. परतूर येथील बालाजी महिला बचत गटाच्या अध्यक्षा कांता बाबासाहेब चौरे म्हणाल्या, की श्रीमती कुलकर्णी यांच्या माध्यमातून लोकसंचालित साधन केंद्राशी जोडले गेल्यानंतर आम्हांला बचतीचे महत्त्व समजले. आम्ही महिला एकत्र येऊन बचत करू लागलो. त्यामुळे बँकेत आमची पत निर्माण झाली. केंद्रामुळेच आम्हाला भाजीपाला लागवडीचे तंत्रज्ञान व मार्गदर्शन मिळाले. आमच्या गटातील सात महिला भाजीपाला उत्पादन घेतात. साधारणतः तीन-चार वर्षांपूर्वी आम्ही गटाद्वारे उत्पादित केलेल्या भेंडीची निर्यात केली. त्यासाठी संपूर्ण मदत लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून मिळाली. आजही आमच्या गटातील महिला टोमॅटो, चवळी, मिरचीत सपाटा, शिमला आदींचे उत्पादन घेतात.
.....
बंजारा हस्तकलेला मिळाल बळ ः
परतवाडी (ता. परतूर) येथील योगेश्वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनिता शिवनारायण राठोड म्हणाल्या, की मला बंजारा हस्तकलेत रुची होती. ती हस्तकला जपण्याच्या माझ्या आवडीला सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्रामुळे बळ मिळाले. त्या माध्यमातून मी प्रशिक्षण घेतले. मला अवगत असलेली कला माझ्या कुटुंबातील, तसेच जवळच्या दहा महिलांना शिकविण्यासाठी आम्ही योगेश्वरी गटाची निर्मिती केली. त्यातून आम्ही बचत करणे सुरू केले. बचतीमुळे पत निर्माण झाली आणि आमच्या कलेला आर्थिक पाठबळ मिळाले. आता देशाच्या अनेक भागातून आमच्या या बंजारा हस्तकलेतून तयार झालेल्या साहित्याला मोठी मागणी आहे.
....
इन्फो ः
काळानुसार बदललो आम्ही ः
सोपारा येथील वयाची ७५ ओलांडलेले अर्जुन राऊत आजही सुतार काम करतात. काळानुसार सुतारकामातील गरजा बदलल्या. त्या गरजा ओळखून अर्जुनराव यांनी जावई महादेव सांगुळे व मुलीच्या मदतीने आपल्या सुतारकामाच्या व्यवसायातही बदल केले. अर्जुनराव म्हणाले, की मुलीचा जय मल्हार बचत गट आहे. त्या गटातून आमच्या पारंपारिक व्यवसायाला आर्थिक आधार मिळाला. औत-फाट्याची गरज संपली, म्हणून आम्ही शोपीससाठी लागणाऱ्या साहित्य निर्मितीकडे वळलो. आता शोपीसमधील बैलगाडी, चौरंग पाठ पाळणे, देवघर, तुळशी वृंदावन, हत्ती व इतर प्राणी ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही तयार करून देतो. त्यासाठी डोकं लावून जरा लाकूड कापणीची मशिनही मी तयार केली आहे. सावित्रीबाई लोकसंचालित केंद्रामुळे आम्हाला अनेक ठिकाणी प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळून अनेक ग्राहकही आमच्याशी जोडले गेले आहेत. केवळ जालना जिल्ह्यातच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, वाशीम, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांतूनही आमच्या कलाकृतींना आता मागणी वाढू लागली आहे.
.....
ब्युटी पार्लर विस्तारासाठी मिळाला आर्थिक आधार ः
आष्टी (ता. परतूर) येथील दीपाली पांचाळ गेल्या वीस वर्षांपासून ‘रूपकला’ नावाचे ब्युटी पार्लर चालवितात. सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राच्या श्रीमती कुलकर्णी यांच्याकडून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायासाठी आर्थिक मदत कशी मिळू शकते, तसेच केंद्राशी जोडल्यामुळे कौशल्य विकासाच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या बचत गटाशी जोडल्या गेल्या. गटाच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळाल्याने त्यांना ब्युटी पार्लरच्या व्यवसायाचा विस्तार करणे शक्य झाले. गटातील इतर महिलाही शिवणकामासह विविध कौशल्ये विकसित करू लागल्या. बचतीच्या माध्यमातून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
दीपाली यांची मुलगी मोहिनी हिने विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण घेऊन ब्युटी पार्लरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तिने या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करून दोन वर्षे नोकरीही केली. त्यानंतर आता ती आईचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी ‘रूपकला’ ब्युटी पार्लरमध्ये दीपाली यांना मदत करत आहे.
...................
- सुषमा कुलकर्णी, ७३५०४६०६९८
फोटो ः
सुषमा कुलकर्णी PNE26W57644
सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्राच्या बैठकीला उपस्थित महिला. PNE26W57643
सुतार कामातील आपल्या कलाकृतीसह अर्जुन राऊत (डावीकडून पहिले), त्यांचे जावई महादेव सांगुळे व कुटुंबातील सदस्य. PNE26W57645
विविध प्रकारच्या पारंपारिक बंजारा हस्तकलेसह अनिता शिवनारायण राठोड. PNE26W57646
--------------------