शेती नसलेल्या नऊ लाख महिलांची नोंदणी
अमरावती विभाग राज्यात अव्वल; ३४ हजार प्रमाणपत्रांचे वितरण
विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : शेती नसलेल्या महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता देण्याच्या उपक्रमात अमरावती विभागाने राज्यात आघाडी घेतली आहे. विभागातील पाच जिल्ह्यांत आतापर्यंत नऊ लाख २३ हजार २२६ महिलांची ऑनलाइन नोंदणी झाली असून, त्यापैकी ३४ हजार १९६ महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा २०२६ मधील तरतुदींनुसार शेती किंवा शेतीशी संबंधित कामे करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देण्याची प्रक्रिया कृषी विभागाने सुरू केली आहे. यासाठी महिलांमध्ये जनजागृती करून ऑनलाइन अर्ज करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. घरातून संगणकाद्वारे किंवा गावातील सार्वजनिक सेवा केंद्राच्या (सीएससी) माध्यमातून अर्ज करता येतो. या कायद्यानुसार शेतीची व्याख्या व्यापक करण्यात आली असून, शेतीशी संबंधित १७ प्रकारच्या कामांपैकी कोणतेही काम करणाऱ्या महिलेला शेतकरी प्रमाणपत्र मिळू शकते. जमीन महिलेच्या नावावर असण्याची अट नसून, प्रमाणपत्रासाठी किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. महिलेने केलेला अर्ज ग्रामसभा किंवा नगरपंचायतीसमोर मंजुरीसाठी ठेवला जातो. मंजुरीनंतर दोन आठवड्यांच्या आत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. अर्ज नाकारल्यास त्याचे कारण सात दिवसांत कळवावे लागते. प्रमाणपत्र नाकारल्याच्या निर्णयाविरोधात संबंधित महिलेला चार महिन्यांच्या आत अपील करता येते. अपिलीय अधिकाऱ्याने अर्ज दाखल झाल्यापासून एका महिन्यात निर्णय देणे आवश्यक आहे. अमरावती विभागात २५५ ग्रामसभांच्या माध्यमातून आतापर्यंत ३४ हजार १९६ प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ग्रामसभांवर निर्बंध आल्याने उर्वरित अर्जांवरील निर्णय प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
-
विभागनिहाय ऑनलाइन नोंदणी
अमरावती विभागात ९ लाख २३ हजार २२६, नाशिक विभागात ७ लाख ३ हजार ३२२, नागपूर विभागात ५ लाख ९६ हजार १९१, लातूर विभागात ५ लाख ७९ हजार ९१४, कोल्हापूर विभागात ५ लाख १३ हजार ६५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४ लाख ५० हजार ५९९ आणि ठाणे विभागात ४ लाख ३९ हजार १९२ महिलांची नोंदणी झाली आहे. पुणे विभागातील नोंदणी ६३ हजार ३२४ आहे. राज्याचा एकूण विचार करता ४८ लाख ३८ हजार ८३३ महिलांची आतापर्यंत या अंतर्गत नोंदणी झाली आहे. ३१२९ ग्रामसभांच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख ८१ हजार ९५९ महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत.
-
“शेती नसलेल्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून नऊ लाख २३ हजार २२६ महिलांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. राज्यात ही सर्वाधिक नोंदणी आहे.”
— गणेश घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.