पुणे, ता. २३ : ‘‘शासकीय दवाखान्यांवर नियंत्रण ठेवण्याचे महिला आरोग्य समितीचे काम समाधानकारक असून, आरोग्यसेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदस्यांनी प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करावे,’’ असे आवाहन आरोग्यसेवा (शहरी) सहाय्यक संचालक डॉ. प्रताप सारणीकर यांनी केले.
आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी समितीने आपल्या अधिकारांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. अनुसंधान ट्रस्ट-साथी संस्थेच्या वतीने आयोजित ‘आमची गोष्ट आमच्या तोंडून’ या राज्यस्तरीय आरोग्य-पोषण मेळाव्याचे उद्घाटन डॉ. सारणीकर यांच्या हस्ते झाले.
कोथरूड येथील जे. पी. नाईक शिक्षण व विकास केंद्रात शुक्रवारी (ता. २३) हा मेळावा झाला. या वेळी साथी संस्थेचे संचालक डॉ. धनंजय काकडे, राज्य आरोग्य धोरण समिती सदस्य डॉ. अभय शुक्ला, सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. अनंत फडके, पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे आदी उपस्थित होते. शहरी, ग्रामीण भागातील समित्यांनी माता-बाल आरोग्य, स्वच्छता, असंसर्गजन्य आजारांच्या संदर्भात केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.
पुणे, नाशिक आणि सोलापूर या शहरांतील १८० महिला आरोग्य समित्यांनी ३६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रभावी काम केले. या समित्यांमुळे हजारो उच्च रक्तदाब, मधुमेह व असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांना शासकीय रुग्णालयांत उपचार मिळाले, ज्यामुळे नागरिकांची सुमारे २३ लाख रुपयांची बचत झाली. तसेच, गरोदर माता, बालकल्याण आणि पाणीपुरवठा, सांडपाण्यासारख्या ७९ स्थानिक समस्यांचे यशस्वी निवारण करण्यात आले. ग्रामीण भागात आंबेगाव, वेल्हे, घाटंजी आणि धारणी या तालुक्यांमध्ये १३४ जन आरोग्य समित्या कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.