PDR26B09984
सोलापूर : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना निवेदन देताना शिष्टमंडळ.
---
गोशाळेसाठी यमाई तलावाची जागा देण्यास विरोध
विशेष सभा न बोलाविल्यास न्यायालयीन लढाईचा शिष्टमंडळाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ५ : शहरातील यमाई तलावालगतची सुमारे ३.१२ हेक्टर जागा श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीस गोशाळा विस्तारासाठी देऊ नये, अशी मागणी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे, सुजितकुमार सर्वगोड, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, अमोल डोके, ॲड. सुनील वाळूजकर, विनायक संगीतराव, ॲड. गुरुदास अभ्यंकर, शरद माने यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महसूल विभागाने नगरपरिषदेला विश्वासात न घेता ही जागा मंदिर समितीला देण्याचा निर्णय घेतल्याने पंढरपूरकरांमध्ये नाराजी आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी उपनगराध्यक्ष, गटनेते यांच्यासह २४ नगरसेवकांनी ३० जून २०२६ रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशी मागणी नगराध्यक्षांकडे केली होती. मात्र, दोन महिने उलटूनही सभा घेण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ८१ (२) नुसार एकूण सभासदांच्या एक चतुर्थांशपेक्षा कमी नसलेल्या सदस्यांनी मागणी केल्यास १५ दिवसांत विशेष सभा घेण्याची तरतूद आहे. अध्यक्षांनी सभा न घेतल्यास कलम ८१ (३) नुसार जिल्हाधिकाऱ्यांना सभा बोलावता येते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करून एक महिना १२ दिवस झाले तरी सभा झालेली नाही.
येत्या सात दिवसांत यमाई तलावाबाबत विशेष सभा न घेतल्यास वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यमाई तलाव हा शहराचा ऑक्सिजन पार्क असून नागरिक, भाविक आणि शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचे अस्तित्व कायम राहणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तातडीने विशेष सभा आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते वासुदेव बडवे आणि सुजितकुमार सर्वगोड यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.