यवतमाळ जिल्ह्यात ९५.४३ टक्के शेतीचे पंचनामे पूर्ण
आठ लाख ७७ हजार हेक्टरवरील नुकसानीची नोंद
ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता. १२) ९५.४३ टक्के शेतीक्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील आठ लाख ७७ हजार ७२ हेक्टरवरील पंचनामे आटोपले असून, उर्वरित पंचनामे दोन ते तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.
यंदा चांगल्या पावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची नऊ लाख १९ हजार ५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली होती. मात्र, हंगामात पावसाने वारंवार खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली. अनेक ठिकाणी पिके करपून गेली, तर काही भागांत किडी आणि अळींच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीत भर पडली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, पेरणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पंचनाम्यांना सुरुवात झाली. सोमवारपर्यंत एकूण आठ लाख ७७ हजार ७२.६९ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले. उर्वरित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. त्यानंतर मदतीसाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सध्या नवरात्रोत्सव सुरू असून येत्या काळात दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिक तीव्र झाली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीमुळे हातात पैसा येण्याची आशा मावळली असून, कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
-
तालुकानिहाय पंचनामे पूर्ण झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
यवतमाळ ५८,३२५.५९, कळंब ४९,३८३.०६, घाटंजी ६१,१११.०१, राळेगाव ५६,८१७.५६, दारव्हा ६५,५९०, नेर ५४,१०२, आर्णी ५३,३८२, बाभूळगाव ४१,२६६.८६, पुसद ७२,९७०, दिग्रस ३८,५२२.८९, उमरखेड ६५,४३२, महागाव ६१,१५२, पांढरकवडा ५२,१२०.९०, वणी ६०,७१४, मारेगाव ४५,१८४ आणि झरीजामणी ४०,९९८.८२. एकूण : ८,७७,०७२.६९ हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.