यवतमाळममध्ये तीन दिवसांत
३६ हजार हेक्टर पिकांना फटका
४१ हजार ५५६ शेतकरी बाधित; ३१५ कोटींच्या मदतीची शासनाकडे मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : जुलै महिन्याच्या अखेरच्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला. पावसामुळे ५३५ गावांतील ४१ हजार ५५६ शेतकरी बाधित झाले असून, ३६ हजार १३५.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३५ हजार २७७.८२ हेक्टर कोरडवाहू, ७.९० हेक्टर बागायती, ९.४० हेक्टर बहुवार्षिक फळपिके आणि ८४०.२७ हेक्टर खरडून गेलेल्या शेतजमिनीचा समावेश आहे. नुकसानीपोटी ३१५ कोटी रुपयांचा मदत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
यंदा मॉन्सूनच्या विलंबामुळे सुरुवातीला खरीप पेरण्यांना खोळंबा झाला होता. जूनअखेर झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. जिल्ह्यात तब्बल ८ लाख ६७ हजार ९९० हेक्टरवर कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, कडधान्ये, फळपिके आणि भाजीपाल्याची लागवड झाली. जूनमध्ये पावसाची तूट राहिल्याने जुलैतील पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते. मात्र जुलैअखेर पावसाने रौद्ररूप धारण केले. अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात १३५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. नदी-नाल्यांना पूर आला, तर प्रकल्पांमधील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. परिणामी, काही प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूकही ठप्प झाली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक परिणाम खरीप पिकांवर झाला. तालुकानिहाय नुकसानीत दारव्हा तालुका आघाडीवर असून ८ हजार ९६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ नेरमध्ये ७ हजार ३५२.१०, आर्णीत ५ हजार ७५२, घाटंजीत ४ हजार ३८७.६५, कळंबमध्ये १ हजार २२८ आणि यवतमाळ तालुक्यात १ हजार १३३.३२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बाभूळगाव १ हजार ८८२.२१, वणी १ हजार ५३६.१९, झरीजामणी १ हजार ५३६.१९, दिग्रस ९३.८८, राळेगाव ३४.५५, महागाव ४९२.४५ आणि पांढरकवडा १९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. इतकेच नाही तर मुसळधार पावसामुळे ४ हजार २६३ शेतकऱ्यांची ८४०.२७ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. यामध्ये ५.७६ हेक्टर जमिनीचे कायमस्वरूपी नुकसान झाले असून ८३४.५१ हेक्टर जमीन दुरुस्त होण्यायोग्य आहे. खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीपोटी १५ कोटी २ लाख ९२ हजार रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
तीन तालुक्यांना दिलासा
जिल्ह्यातील १३ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असताना पुसद, उमरखेड आणि मारेगाव तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षणात आढळले नाही. त्यामुळे या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.