सासवड, ता. ३ : ''जगात कितीही सुंदर शहरं असली, तरी मायदेशाची माती आणि आपली माणसं यांची किंमत अनमोल असते,'' अशा शब्दांत पुरंदर तालुक्यातील खळद येथील योगेश साहेबराव कामथे यांनी दुबईतून आपली व्यथा मांडली आहे. कंपनीच्या माध्यमातून पत्नीसह दुबई सहलीवर गेलेले कामथे सध्या तिथे सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि विमानसेवा खंडित झाल्यामुळे अडकून पडले आहेत.
योगेश कामथे २६ फेब्रुवारीला दुबईला रवाना झाले होते. त्यांच्यासोबत पत्नी कविता योगेश कामथे तसेच बेलसर (ता. पुरंदर) गावचे नीलेश कृष्णा जगताप, मीनाक्षी नीलेश जगताप आणि अभय नीलेश जगताप आहेत. सुरुवातीचे दोन दिवस बुर्ज खलिफासारखी भव्य ठिकाणे पाहून आनंदात गेले. मात्र, अचानक युद्ध सुरू झाल्याची बातमी धडकली आणि परिसरातील हल्ल्याच्या माहितीमुळे विमानसेवा बंद करण्यात आली. आनंदाने उधाण आलेल्या सहलीवर एका क्षणात चिंतेचे सावट पसरल्याची भावना कामथे यांनी सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. योगेश कामथे यांनी दुबईतून आपला अनुभव सांगताना म्हटले की, येथे कंपनी (केअर हेल्थ इन्शुरन्स) आणि एजन्सीने निवास, भोजन आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली आहे. मात्र, बाहेर शांतता असली तरी मनात अस्वस्थता आहे. हॉटेलमधील तो आलिशान झगमगाट आता ओसाड वाटू लागला आहे. सोन्याचा घास समोर असला, तरी आपल्या माणसांच्या हातच्या साध्या जेवणाची आठवण येत आहे.
३७७ हून अधिक भारतीय अडकले..
कामथे यांच्यासोबतच पुणे जिल्ह्यातील पुरंदरसह, हडपसर, आळंदी, थेऊर, शिरूर, शिक्रापूर, दौंड, पिंपरी चिंचवड तसेच इचलकरंजी, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, सांगली, सातारा, नाशिक, याबरोबरच कर्नाटक आणि गोवा येथील सुमारे ३७७ नागरिक आणि इतर कामांसाठी आलेले हजारो भारतीय सध्या तिथे अडकले आहेत. गावाकडून काळजीपोटी फोनचा पाऊस पडत आहे. तेव्हाच जाणीव झाली की, शेवटी आपली माणसं ती आपलीच असतात, असे भावुक उद्गार कामथे यांनी काढले.
मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना..
कंपनीने विमानसेवा सुरू होताच तात्काळ मायदेशी पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, सध्या प्रत्येक क्षण जड जात असून, ''देवा, लवकरात लवकर विमानसेवा सुरू होऊ दे आणि आम्हाला सुखरूप मायदेशाच्या कुशीत पोहोचू दे, अशी प्रार्थना कामथे यांनी खळदसह संपूर्ण पुरंदरवासीयांच्या वतीने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.