राज्याराज्यांत
‘यूपी’त योगी हवेत की नकोत?
उत्तर प्रदेशच्या राजकीय पटावर पुढील काही महिन्यांत कोणती समीकरणे आकार घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाजूला करणे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला परवडेल का, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
.............................................................
शरत् प्रधान
उत्तर प्रदेश यावेळी योगी हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसू शकतात, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी एका मुलाखतीत सूचित केल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली.
चौधरी यांनी केवळ योगींचे नाव वगळण्यापुरते मर्यादित न राहता, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी पक्षातील अन्य चार नेत्यांची नावेही घेतली. त्यात संरक्षणमंत्री राजनाथसिंह, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि केशवप्रसाद मौर्य यांचा समावेश आहे. स्वतःचे नावही या यादीत जोडताना, ‘अंतिम निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रचारातील प्रमुख चेहरे कोण असतील, याबाबतही चौधरी यांनी सूचक वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच प्रचारातील प्रमुख चेहरे असतील, असे त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाल्याचे स्पष्ट होत आहे. योगी आदित्यनाथ यांच्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वात अस्वस्थता वाढत असल्याची चर्चा भाजप वर्तुळात जोर धरत आहे. योगींच्या अतिमहत्त्वाकांक्षी आणि काहीशा अहंकारी स्वभावामुळे ते पक्षातील सहकाऱ्यांपासून दुरावल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. योगींनी पक्षात मित्र जोडण्यापेक्षा विरोधकांची संख्या वाढविली, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे.
उत्तरेचे ‘हिंदू हृदयसम्राट’
योगी आदित्यनाथ हे भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (आरएसएस) आलेले नाहीत किंवा भाजपमध्ये त्यांची पारंपरिक राजकीय मुळे नाहीत. स्वतःच्या राजकीय प्रभावाच्या जोरावर ते ‘हिंदू हृदयसम्राट’ म्हणून पुढे आले. मात्र, पक्षातील सहकाऱ्यांमध्ये ते फारसे लोकप्रिय नाहीत. पूर्वपरवानगीशिवाय त्यांची भेट घेणेही अवघड असल्याने मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांमध्येही योगींबद्दल वाढती नाराजी असल्याचे सांगितले जाते. ‘योगीजी पक्षाच्या नेत्यांपेक्षा नोकरशहांवरच अधिक अवलंबून असतात, असे मत व्यक्त करीत ते अतिशय व्यग्र असणारे व्यक्तिमत्त्व आहे, अशी टिप्पणी त्यांच्या मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याने केली.
दुसऱ्या एका ज्येष्ठ मंत्र्याच्या मते, ‘‘योगी संयम का बाळगू शकत नाहीत, हे समजत नाही. वयाने ते तसे लहान आहेत. मात्र, निवांत राहून पक्षातील बड्या नेत्यांशी जुळवून घेण्याऐवजी सर्वांना मागे टाकून सर्वोच्च स्थानी पोहोचायची त्यांना घाई झाली आहे’’, असे या मंत्र्याचे म्हणणे आहे.
मोदींच्या पावलावर पाऊल
जवळपास दशकभर सत्तेत राहिल्यानंतर योगींचा राजकीय प्रभाव प्रामुख्याने त्यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे वाढला आहे. त्यांची मुस्लिमविरोधी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे नेऊ शकते, असा त्यांचा समज झाल्याचे बोलले जाते. अनेक बाबतीत ते मोदींची नक्कल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मोदींनी प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर राजकीय ताकदीत केले, त्याच धर्तीवर योगींनीही मुस्लिमविरोधी भूमिका अधिक तीव्र केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मोदींना २००२च्या गुजरात दंगलीतील कथित भूमिकेवरून लक्ष्य करण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र त्यातून ते पुढे आले. मग योगींनीही हिंदुत्ववादी शक्ती म्हणून पुढे येण्यासाठी तोच मार्ग स्वीकारला तर त्यात गैर काय, असा युक्तिवाद त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जातो.
प्रसारमाध्यमांशी जवळीक
जर मोदींनी प्रसारमाध्यमांशी जवळीक साधून सर्वोच्च पदापर्यंतचा मार्ग मोकळा केला असेल, तर योगीही मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्ये आपली अनुकूल प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. दरवर्षी सोळाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा प्रसिद्धीवर खर्च केला जात असल्यामुळे माध्यमांकडून योगींच्या प्रत्येक निर्णयाचे वारेमाप कौतुक केले जाते. योगी किंवा त्यांच्या सरकारविषयीच्या नकारात्मक बातम्यांना माध्यमांमध्ये कमी स्थान मिळते. सरकारचे दावे मात्र ठळकपणे मांडले जातात. त्यामुळे त्यांचे अतिशयोक्तीपूर्ण दावे हेच सत्य म्हणून अधोरेखित केले जाते आणि राज्यभरातील लोक ते खरे मानतात.
‘रामराज्या’चा आभास
कायदा आणि सुव्यवस्थेबाबत योगी सरकारकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांशी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीत अनेकदा तफावत असते. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणत ‘रामराज्य’ आणल्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी सरकारची प्रसिद्धियंत्रणा प्रयत्नशील असली तरी ‘एनसीआरबी’ची आकडेवारी वेगळे चित्र दाखवते. महिलांविरोधातील गुन्हे ही त्यातील प्रमुख बाब आहे. बलात्कार, खून, खंडणी तसेच जातीय कारणांवरून होणाऱ्या हत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. ‘दंगली होऊ देणार नाही,’ असा योगींचा दावा असला, तरी मुस्लिमांना लक्ष्य करून होणाऱ्या हत्या आणि त्यांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
मात्र, या सर्व पार्श्वभूमीवरही योगींना ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाजूला करणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला परवडेल का, हा प्रश्न कायम आहे. योगींना दूर करण्याचा कोणताही निर्णय पक्षासाठी उलट परिणाम करणारा ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्याच वेळी, योगींचा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी वाढता प्रभाव भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी चिंतेचा विषय असल्याचेही यात नमूद केले आहे.
नेतृत्वाची दुहेरी कोंडी
उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची आकांक्षा मोदी बाळगत असताना योगींना बाजूला केल्यास भाजपच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, उत्तर प्रदेशमध्ये योगी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, तर त्यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातून भविष्यात ते मोदींसमोर आव्हान उभे करू शकतात, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजपचे केंद्रीय नेतृत्व दुहेरी कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशच्या राजकीय पटावर पुढील काही महिन्यांत कोणती समीकरणे आकार घेतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
अनुवादः मंजूषा कुलकर्णी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.