बुधवारी पेस्टिंग
१- वडील ज्ञानदेव, आई नलिनी व पत्नी समीक्षा यांच्यासमवेत सूरज आसोलकर.
२ व ३- आसोलकर यांचे बहरलेले बागायती रब्बी ज्वारीचे पीक.
४- झाडावर लगडलेले खजूर
बागायती रब्बी ज्वारीचे उल्लेखनीय, फायदेशीर उत्पादन
अकोला जिल्ह्यात देगाव येथील सूरज (शिवा) आसोलकर या एमटेक पदवीधारक तरूणाला उच्चशिक्षणाच्या जोरावर नोकरी निश्चित मिळाली असती. मात्र त्याने ज्ञानाच्या बळावर आपल्या घरच्या शेतीवरच लक्ष केंद्रित केले.
तीन वर्षांपासून बागायती रब्बी ज्वारीचे प्रयोग सूरज सातत्याने राबवत असून, अभ्यासू व्यवस्थापनातून मिळत असलेल्या उच्च उत्पादनामुळे दरवर्षी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. तीन वर्षांत एकरी २० क्विंटलहून अधिक उत्पादकता सातत्याने साध्य केले असल्याचे सूरज सांगतात. धान्याबरोबर चारा शाश्वतीही त्यांनी मिळवली आहे.
.......................................................................................
गोपाल हागे
......................................................................
अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात देगाव येथे आसोलकर कुटुंबाची सुमारे ३० एकर शेती आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून एमटेकची (एरिगेशन आणि ड्रेनेज) पदवी घेतलेले कुटुंबातील सूरज (शिवा) हे युवा शेतकरी सध्या शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांचे वडील ज्ञानदेव देखील पूर्णवेळ शेतकरी आहेत. आसोलकर खरिपात सोयाबीन आणि तूर तर रब्बी हंगामात गहू आणि ज्वारी ही पिके घेतात.
पूर्वी पारंपरिक पद्धतीची शेती होती. मात्र बदलते हवामान, वाढती मजूरटंचाई, पाण्याची उपलब्धता आणि बाजारभावातील चढउतार यामुळे पीकपध्दतीत बदल करण्यास व नवे प्रयोग करण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे बागायती रब्बी ज्वारीच्या लागवडीचा. पूर्वी ज्वारी हे पीक खरीप हंगामात घेतले जात होते. परंतु पावसाची अनिश्चितता, वन्यप्राण्यांचा त्रास आणि कमी बाजारभाव यामुळे हे पीक मागे पडत गेले. परंतु आसोलकर यांनी परिस्थितीत नवी संधी शोधत रब्बी हंगामात ज्वारी घेण्याचा निर्णय घेतला.
तीन वर्षांची वाटचाल
कोरोना काळापासून म्हणजे साधारण २०२० पासून सूरज यांनी शेतीत पाऊल टाकले. मागील तीन वर्षांपासून त्यांनी
रब्बी ज्वारीच्या शेतीत सातत्य राखले आहे. या काळात उत्पादन आणि अनुभव दोन्हीही वाढत गेले. पहिल्या वर्षी केवळ अडीच एकर क्षेत्रात ज्वारीची लागवड होती. योग्य व्यवस्थापन, बागायती सिंचन आणि हवामानाची साथ यामुळे एकरी २० ते २५ क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळाल्याचे सूरज सांगतात. पहिला अनुभव त्यांच्यासाठी आत्मविश्वास व हुरूप वाढवणारा ठरला. त्यापुढील वर्षी क्षेत्र वाढवून पाच एकरांपर्यंत नेले. त्या वेळेसही पहिल्या वर्षीचा उतारा मिळाला. वाढलेल्या क्षेत्राबरोबर व्यवस्थापन अधिक सुधारले. तिसऱ्या वर्षी म्हणजे मागील रब्बी हंगामात ज्वारीचे क्षेत्र त्यांनी चक्क १५ एकरांपर्यंत नेले. नुकतीच या पिकाची काढणी पूर्ण झाली असून, मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही एकरी २० क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळाल्याचे सूरज सांगतात.
व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
असोलकर यांच्याकडे विहीर बागायती असून निर्गुणा नदी जवळून वाहते. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहे. अशा रीतीने पाण्याची पूर्ण शाश्वती आहे. साधारण १५ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान ज्वारीची लागवड होते. त्यासाठी बीबीएफ यंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे पिकांमध्ये योग्य अंतर राखले जाते. पाण्याचा निचरा तसेच सिंचन सुलभ होते. पहिल्या दोन वर्षी पाटपाण्याचा वापर केला होता. यंदा मात्र पाच एकरांत ठिबक सिंचनाचा प्रयोग केला. सुरुवातीला दोन वेळा स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले. दर १० ते पंधरा दिवसांनी एक यानुसार एकूण पाण्याचे सुमारे नऊ हप्ते देण्यात आले. अळी नियंत्रणासाठी ठरावीक अंतराने कीटकनाशकाच्या दोन फवारण्या केल्या. पेरणीवेळी डीएपी एकरी एक बॅग, तिसऱ्या पाण्याच्या वेळी एतरी दीड किलो बॅग युरिया, तर फुलोऱ्याच्या सुरूवातीस एकरी ३० किलो पोटॅश अशी खते दिली. खरिपात मशागतीवेळी एकरी दोन ट्रॉली शेणखत देण्यात येते. ज्वारी पिकातील या भागातील सर्वांत मोठी समस्या म्हणजे वन्यप्राण्यांचा उपद्रव. अनेक शेतकरी या कारणामुळे ज्वारी लागवड टाळतात. मात्र आसोलकर यांनी यावर उपाय शोधत आधुनिक झटका यंत्राचे कुंपण बसवले. त्यामुळे शेतात येणारे वन्यप्राणी दूर राहू लागले आणि पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी झाले. या उपायामुळे ज्वारी पिकातून स्थिर उत्पादन मिळते आहे. ज्वारीनंतर थेट खरिपातच सोयाबीन घेण्यात येते.
दरांचा धोका केला कमी
आसोलकर यांच्या अनुभवानुसार रब्बी हंगामातील ज्वारी खरीप हंगामापेक्षा अधिक फायदेशीर ठरते. खरिपात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान होण्याचा मोठा धोका असतो. या हंगामात पावसाचा धोका नसतो. उगवण १०० टक्के होते. शासकीय खरेदी केंद्राकडे सूरज ज्वारीची विक्री करतात. शासनाने सुमारे ३७५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. त्यामुळे बाजारभावातील अनिश्चिततेचा धोका कमी झाला आहे.
कडबा उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न
ज्वारी पिकातून केवळ धान्यच नाही तर मोठ्या प्रमाणात कडबा (चारा) देखील मिळतो. अलीकडील काळात तर चाराटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सूरज यांना एका एकरातून सुमारे ५५० ते ६०० पेंड्यांपर्यंत कडबा मिळतो. अकोला आणि परिसरातील पशुपालकांना त्याची विक्री होते. त्यास दोन हजार ते २५०० रुपये प्रति शेकडा दर मिळतो. अशा प्रकारे ज्वारीतून दुहेरी उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे.
खजूर लागवडीचा प्रयोग
आसोलकर यांनी सहा वर्षांपूर्वी खजूर लागवडीचा प्रयोग केला. सध्या त्यांच्याकडील झाडांपैकी तीन झाडे उत्पादनक्षम असून प्रति झाड ६० ते ७० किलो उत्पादन मिळते आहे. हा प्रयोग पाहाता देगाव परिसरातील शेतकरी खजूर लागवडीकडे आकर्षित होत आहेत. मध्यंतरी आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी टिश्यू कल्चर खजूर नर्सरीला सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथे भेट दिली. पारंपरिक पिकांबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पद्धती, वन्यप्राणी नियंत्रण आणि बाजारपेठ व्यवस्थापन यांचा योग्य समतोल साधून सूरज यांची शेतीत वाटचाल सुरू आहे.
..........................................
कृषी विभागाचे मार्गदर्शन (इन्फो)
आसोलकर यांना नव्या पीककपद्धतीकडे वळविण्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. देगाव परिसरात रब्बी ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देगाव, मानकी, वाडेगाव, सांगवी जोमदेव, खामखेड या गावशिवारांत रब्बी ज्वारीचे क्षेत्र चारशे एकरांच्या पुढे गेले आहे. एकरी उत्पादनाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्यानुसार निविष्ठांचे व एकूण व्यवस्थापन करण्याची पद्धत सूरज यांनी अवलंबिली आहे. आगामी हंगामात तुरीचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन करीत एकरी उत्पादन वाढीचा त्यांचा प्रयत्न आहे. आमच्या भागात माझ्याप्रमाणे अन्य काही ज्वारी उत्पादकांनाही एकरी २० क्विंटलच्या पुढे उत्पादकता मिळवण्याचे आसोलकर यांनी सांगितले.
सूरज आसोलकार, ९८५०३५६४२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.