पुणे

तरुणांनो, स्वतःचा मार्ग स्वतः घडवा!

CD

तरुणांनो, केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून स्वतःचा मार्ग स्वतः घडवण्याची हीच खरी वेळ आहे. शिक्षण, नेतृत्व आणि उद्योजकतेचा त्रिवेणी संगम साधत आपल्यातील कौशल्यांना वाव द्या. अपयशाची भीती न बाळगता आव्हानांना संधीत बदला, स्वतःसोबत समाजाचा विकास करा आणि आत्मनिर्भर भारताचे नेतृत्व करत आपल्या स्वप्नांना नवी दिशा द्या.
- डॉ. संजय डी. पाटील, अध्यक्ष, डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर

माणसाच्या आयुष्यात काही निर्णय असे असतात, ज्यांचा परिणाम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही; तर तो पुढील अनेक पिढ्यांचे भविष्य घडवतो. दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात टाकलेले पाऊल हा असाच एक दूरदृष्टीचा निर्णय होता. ग्रामीण आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, या विचारातून त्यांनी सुरू केलेली शैक्षणिक चळवळ आज हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत आहे. शिक्षण म्हणजे केवळ इमारती, अभ्यासक्रम आणि पदव्या नव्हेत; तर ते समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षणामुळे व्यक्ती, कुटुंब आणि पर्यायाने राष्ट्र सक्षम होते. आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात मोबाईल आणि इंटरनेटमुळे ज्ञान सहजरीत्या उपलब्ध आहे. परंतु, केवळ माहिती मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. आजच्या तरुणाला प्रश्न विचारण्याची सवय, योग्य-अयोग्याचा विवेक आणि समस्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता शिक्षणातून मिळणे गरजेचे आहे.

पदवीसोबत कौशल्याची जोड
आजचा तरुण तंत्रज्ञानाशी जोडलेला आहे. जगभरातील ज्ञान त्याच्या हातातील मोबाईलवर उपलब्ध आहे. ‘एआय’, डिजिटल तंत्रज्ञान, संशोधन, स्टार्टअप्स आणि नव्या उद्योगक्षेत्रांमुळे करिअरच्या अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. मात्र, या बदलत्या काळात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही. शिक्षणाने विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळू नये, तर विचार करण्याची दृष्टी मिळाली पाहिजे. प्रश्न विचारण्याची सवय, योग्य-अयोग्याचा विवेक, समस्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता आणि नव्या संधींचा शोध घेण्याची वृत्ती शिक्षणातून विकसित झाली पाहिजे. आजच्या विद्यार्थ्याने आपल्या आवडी, क्षमता आणि बदलत्या काळातील गरजा लक्षात घेऊन शिक्षणाची दिशा निश्चित केली पाहिजे. पदवीसोबत कौशल्य, संवादकौशल्य, तंत्रज्ञानाचे ज्ञान, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास यांची जोड मिळाली, तर शिक्षण खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन ठरेल.

स्वतःसोबत इतरांनाही पुढे नेण्याची क्षमता
नेतृत्व म्हणजे पद नव्हे आणि अधिकारही नव्हे. नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची तयारी. अडचणीच्या काळात निर्णय घेण्याचे धैर्य, अपयशाची जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती आणि इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता म्हणजे नेतृत्व. महाविद्यालयीन जीवन हे नेतृत्वगुण विकसित करण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. एखाद्या उपक्रमाचे नियोजन करणे, सामाजिक प्रश्नांवर काम करणे, टीममध्ये काम करणे, आपले मत स्पष्टपणे मांडणे आणि दुसऱ्याचे मत समजून घेणे या अनुभवांतून नेतृत्वाची बीजे रुजतात. चांगला नेता स्वतःचा मार्ग तयार करतो; परंतु उत्तम नेता इतरांसाठीही मार्ग तयार करतो. त्यामुळे तरुणांनी केवळ स्वतःच्या यशाचा विचार न करता समाजासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचाही विचार केला पाहिजे.

नोकरीच्या शोधापलीकडचा विचार
आजच्या तरुणाईसमोर रोजगार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘मला चांगली नोकरी मिळावी’ ही अपेक्षा स्वाभाविक आहे. मात्र, ‘मी स्वतः किती रोजगार निर्माण करू शकतो?’ हा प्रश्नही तरुणांनी स्वतःला विचारला पाहिजे. उद्योजकता म्हणजे मोठी कंपनी सुरू करणे एवढेच नाही. आपल्या परिसरातील एखादी समस्या ओळखून त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधणे, स्थानिक उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे, शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे, पर्यटन, सेवा, डिजिटल माध्यमे किंवा नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवसाय उभा करणे, हीदेखील उद्योजकतेचीच रूपे आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मोठी क्षमता आहे. मेहनत, जिद्द, परिस्थितीशी संघर्ष करण्याची ताकद त्यांच्या अंगी आहे. त्यांना योग्य शिक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन मिळाले, तर ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणही देश-विदेशातील बाजारपेठेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो.

शिक्षण, नेतृत्व अन् उद्योजकता विकासाची त्रिवेणी
शिक्षण, नेतृत्व आणि उद्योजकता या तीन स्वतंत्र गोष्टी नाहीत; त्या परस्परांना पूरक आहेत. शिक्षण दिशा देते, नेतृत्व त्या दिशेने वाटचाल करण्याचे धैर्य देते आणि उद्योजकता त्या विचारांना कृतीचे रूप देते. या तिन्हींचा समन्वय साधणारा तरुण केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी नव्या संधी निर्माण करतो. डॉ. डी. वाय. पाटील यांनीही एका व्यापक स्वप्नातून शिक्षणाची चळवळ उभी केली. त्या चळवळीचे खरे यश संस्थांच्या विस्तारात नसून, या संस्थांमधून घडलेल्या, घडत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनातील सकारात्मक परिवर्तनात आहे. आज त्यांचा वारसा पुढे नेताना आमचे ध्येय केवळ संस्था उभारणे किंवा त्यांचा विस्तार करणे एवढेच नाही. या संस्थांमधून आत्मविश्वासपूर्ण, मूल्यनिष्ठ, कौशल्यसंपन्न, नेतृत्वक्षम आणि उद्योजक तरुणाई घडवणे, हे आहे.

स्वतःवर विश्वास ठेवा...
आजच्या तरुणांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. अपयश आले, तर त्यातून शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. बदलत्या काळानुसार नवी कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, आपल्या क्षमतेला योग्य दिशा दिली पाहिजे.
जगात संधींची कमतरता नाही; गरज आहे ती त्या संधी ओळखण्याच्या दृष्टीची आणि त्यांचे रूपांतर संधीत करण्याच्या धैर्याची.
म्हणूनच तरुणांनी केवळ कोणीतरी तयार केलेल्या वाटेवर चालण्यापेक्षा स्वतःची वाट तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण घ्या, नेतृत्व स्वीकारा आणि उद्योजकतेच्या माध्यमातून स्वतःसोबत इतरांचेही जीवन समृद्ध करा. कारण आजचा विद्यार्थी हा तो उद्याचा उद्योजक, नेतृत्वकर्ता, संशोधक आणि राष्ट्रनिर्माता आहे.

शिक्षणाची ही ज्योत अविरत तेवत ठेवून ती अधिक प्रज्वलित करण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांची आहे. त्यातूनच असंख्य तरुणांच्या स्वप्नांना योग्य दिशा मिळावी, त्यांच्या हातांना रोजगाराभिमुख कौशल्यांची साथ मिळावी आणि त्यांच्या कल्पक विचारांना ठोस कृतीची जोड मिळावी. शिक्षणातून ज्ञान, ज्ञानातून नेतृत्व आणि नेतृत्वातून निर्माण होणारी उद्योजकता याच त्रिवेणी संगमातून नव्या भारताचा मार्ग सुकर होईल. आजच्या तरुणाईने या त्रिसूत्रीचा अंगीकार करून स्वतःचा मार्ग स्वतः घडवला, तरच आत्मनिर्भर, सक्षम आणि प्रगत राष्ट्राचे स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT