युवक, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर
स्थानिक पातळीवर काम करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २ : शिवसेना हा सामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पक्ष पोचवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिवसेनेच्या राज्य प्रमुखांच्या आढावा बैठकीत केले. नेते-कार्यकर्त्यांनी महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर काम करावे, असेही ते म्हणाले.
शिक्षण, क्रीडा, रोजगार, आरोग्य, पाणी, रस्ते आणि कृषी या मुद्द्यांवर प्रभावी पद्धतीने काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या. सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी गरज पडल्यास आपापल्या राज्यांत शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. तळागाळात पक्ष अजून मजबूत करण्यासाठी येत्या काही महिन्यांत विविध राज्यांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाना, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेशासहित विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. या काळात देशभरात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जातील. तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी हे केवळ राजकारणासाठी नाही, तर समाजकारणासाठी काम करतात. बूथ स्तरापर्यंत पक्षाचे जाळे मजबूत करून जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.