DonaldTrump-KimJong
DonaldTrump-KimJong 
संपादकीय

भाष्य : उत्तर कोरियातील 'पाऊल' वाट

अजेय लेले

अवघ्या दोन वर्षांपूर्वी अण्वस्त्र निःशस्त्रीकरणावरून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. त्यामुळेच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्तर कोरिया भेटीचे ऐतिहासिक आणि आश्‍चर्यकारक असे वर्णन उत्तर कोरियाने केले. ही भेट सर्वच अर्थांनी आश्‍चर्याची होती. ट्रम्प यांनी 'ट्‌विटर'वरून उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांना अमेरिका भेटीचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर, अवघ्या 24 तासांतच ही भेट झाली.

खरेतर ट्रम्प केवळ दक्षिण कोरियाच्या अधिकृत दौऱ्यावर होते. ते जपानमधील ओसाका येथील 'जी 20' देशांच्या शिखर परिषदेत सहभागी झाले. ही परिषद संपल्यानंतर दक्षिण कोरियाला भेट देण्याचे त्यांचे नियोजन होते. या भेटीदरम्यान ते दक्षिण आणि उत्तर कोरियाला विभागणाऱ्या 'डिमिलिटराइज्ड झोन' (डीएमझेड)लाही भेट देणार होते. या दोन्ही देशांदरम्यानचा हा 'बफर झोन' 1953 पासून अस्तित्वात आहे. जपानमधील 'जी-20' परिषद संपवून दक्षिण कोरियाच्या प्रवासात असतानाच ट्रम्प यांना उन यांच्या भेटीची कल्पना सुचली. त्यांनी ताबडतोब 'डीएमझेड'मध्ये किम जोंग उन यांची भेट घ्यायला आवडेल, असे 'ट्‌विट' केले. या भेटीमागे केवळ सदिच्छांची देवाणघेवाण आणि उन यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यामुळे आपण स्वत:च स्वत:ला एक प्रकारच्या सापळ्यात अडकविले होते, हेही त्यांनी मान्य केले. 

अमेरिकी अध्यक्षांनी सोशल मीडियाद्वारे केलेल्या या विनंतीकडे उन यांनी दुर्लक्ष केले असते, तर त्यांची एकप्रकारची नाचक्की झाली असती. त्यादृष्टीने पाहता ही एक जोखीमच होती. तथापि, ट्रम्प यांना नशिबाने साथ दिली. उन यांनी त्यांच्या आमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला. 'डीएमझेड'ला जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी ही भेट केवळ चार मिनिटांची अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात ती तासभर चालली. दक्षिण कोरियाच्या सीमेच्या बाजूला ही भेट झाली. मात्र, ट्रम्प उत्तर कोरियाच्या प्रदेशात 20 पावले चालले. त्यामुळेच, ते उत्तर कोरियाला भेट देणारे पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरले. 

अमेरिकेत 2020 मध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवर डोळा ठेवूनच ट्रम्प यांनी स्वप्रतिमा उजळविण्यासाठी हा भेटीचा 'स्टंट' केल्याचे म्हटले जातेय. मुळात अशा प्रकारच्या कृतीचा काही राजकीय फायदा होईल का, याविषयीच शंका आहे. एक मात्र नक्की, की ट्रम्प अशा लहरी वर्तनातून अमेरिकेचा जागतिक प्रभाव आणि दबदबा कमी करीत आहेत. इराणवर वर्चस्व मिळविण्यात तसेच इराणच्या अणू प्रश्‍नावर मार्ग काढण्यात त्यांना अपयश आले आहे. ते फारसे डोळ्यांवर येऊ नये, अशी त्यांची इच्छा असणारच. त्या अपयशाकडून लक्ष वळविणे, हा त्यांचा एक हेतू असू शकतो. ट्रम्प प्रसारमाध्यमांचा नेहमीच तिरस्कार करतात, हे लक्षात घेऊन प्रसारमाध्यमेही त्यांना नावे ठेवण्याची संधी कधी सोडत नाहीत. तथापि, उत्तर कोरियाच्या मुद्द्याचा यापलीकडे जाऊनही विचार करायला हवा. 

अवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वी परिस्थिती खूपच गंभीर होती. संभाव्य अणुयुद्धामुळे मानवजातीचा प्रचंड विध्वंस होण्याची चिन्हे दिसत होती. अणुयुद्धाची शक्‍यता असल्याचे ट्रम्प यांनी सांगून टाकले होते. उत्तर कोरियाला रोखण्याबाबत त्यांना कसलेही यश मिळाले नाही. मात्र, चर्चा-वाटाघाटींमध्ये उत्तर कोरियाला सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नांतून युद्धखोरीला आळा घालण्यात यश मिळाले, हे मान्य करावे लागेल. 
अणुचाचणी आणि दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचे उत्तर कोरियाचे उपद्‌व्याप थांबविणेही याच धोरणामुळे शक्‍य झाले.

ट्रम्प यांच्या या धोरणाची सुरवात सिंगापूरमध्ये जून 2018 मध्ये सुरू झाली. या ऐतिहासिक परिषदेत अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या अध्यक्षांनी समोरासमोर येत आव्हानांवर चर्चा केली. उभयतांनी परस्परांतील संबंध दृढ करीत शांतता राखण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे संयुक्त निवेदनही जारी केले. ही खरेतर चांगली सुरवात होती. त्यातून खूप काही निष्पन्न झाले, असे म्हणता येणार नाही. यानंतर फेब्रुवारी 2019 रोजी व्हिएतनाममधील हनोई येथे परिषद झाली. तीदेखील कोणत्याही ठोस निष्कर्षाशिवाय अचानक संपली. तीत नेमके काय चुकीचे घडले, याबाबत कसलीही स्पष्टता नाही. उत्तर कोरियातील योंगब्योन येथील अणू प्रकल्प नष्ट करण्याच्या बदल्यात आपल्या देशावरील निर्बंध पूर्णपणे उठवावेत, अशी किम यांची इच्छा असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. मात्र, आपण निर्बंध पूर्णपणे नव्हे, तर अंशत: उठविण्याची मागणी केल्याचे उत्तर कोरियाचे म्हणणे आहे.

नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांतील चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता नाही, असे चित्र गेल्या चार-पाच महिन्यांतील परिस्थितीवरून निर्माण झाले होते. त्यातच, उत्तर कोरियाने चार मे रोजी लघू पल्ल्याच्या अनेक प्रोजेक्‍टाइलच्या आणि नऊ मे रोजी लघू पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांच्याही चाचण्या केल्या. हा प्रदेश पूर्वीच्या अराजकतेच्या अवस्थेकडे पुन्हा हळूहळू वाटचाल करीत असल्याचे यातून दिसत होते. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांच्या ताज्या कृतीकडे पाहायला हवे. ट्रम्प यांच्या या कृतीकडे सवंग प्रसिद्धी मिळविण्याचे तंत्र यादृष्टीने पाहून त्याचे महत्त्व निकालात काढणे सोपे आहे. पण, तेवढ्याच दृष्टीने या घटनेकडे पाहणे योग्य ठरणार नाही. 

सध्या तरी दोन्ही देशांच्या दृष्टिकोनातील फरक ठळकपणे जाणवतो. उत्तर कोरियाला आधी शांतता प्रस्थापित व्हावी आणि मग अण्वस्त्रमुक्ततेच्या दिशेने पावले टाकावीत, असे वाटते. याउलट अमेरिकेला उत्तर कोरियाकडून संपूर्ण अण्वस्त्रमुक्तता हवी आहे आणि त्यानंतरच शांतता प्रस्थापित होईल, असे वाटते. दोन्ही भूमिकांमधील हा भेद लक्षात घेण्याजोगा. आज उन यांच्याबरोबर जुळलेली "केमिस्ट्री' लक्षात घेऊन ट्रम्प हे उत्तर कोरियाबरोबर तडजोड करण्याच्या मनःस्थितीत आहेत. मात्र, यासंदर्भात त्यांच्या प्रशासनाचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे. त्यांच्या प्रशासनाला इतिहासापासून शिकणे महत्त्वाचे वाटते. उन यांचे वडील आणि आजोबा यांनी आपला शब्द न पाळल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच, अमेरिकेचे प्रशासन ट्रम्प यांना कोणतीही जोखीम पत्करू देणार नाहीत.

उत्तर कोरियाच्या संपूर्ण आणि पडताळणीयोग्य अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाची अमेरिकेची मागणी आहे. परंतु, उत्तर कोरियासाठी अण्वस्त्रे म्हणजे सोन्याचा हंस आहे. गेल्या 66 वर्षांपासून त्यांनी यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. आपल्याकडे अण्वस्त्रे असेपर्यंत देशाचे सामर्थ्य आणि महत्त्व अबाधित असल्याची जाणीव उत्तर कोरियाला आहे. या कठीण परिस्थितीवर ताबडतोब उपाय शोधणे शक्‍य नाही, हे ट्रम्प यांनी ओळखले आहे. त्यामुळेच उन यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी वेग हे आमचे उद्दिष्ट नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले. ट्रम्प हे व्यापार आणि नफा, यापलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर काही दूरच्या पल्ल्याचे काही करू पाहत असल्याचे उत्तर कोरिया हे एकमेव उदाहरण आहे.

(अनुवाद : मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT