Lilatai-Patil
Lilatai-Patil 
संपादकीय

प्रयोगशील शिक्षणयात्री

सकाळवृत्तसेवा

आपल्याकडे शिक्षण या विषयावर जितकी मतमतांतरे, वाद आहेत तितके अन्य कशावर नसावेत. मेकॉलेच्या  शिक्षण पद्धतीने देशाचे वाटोळे केले, हा सर्वसाधारण सूर असतो. मात्र त्याचे जे पर्याय सांगितले जातात, ते अनेकदा अगम्य असतात. या कोंडीला ठोस व्यवहार्य उत्तर देणाऱ्या व्रतस्थ शिक्षणयात्री लीलाताई पाटील यांनी सोमवारी शेवटचा श्‍वास घेतला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखादा शिक्षक किती शिस्तबद्ध, किती तर्ककठोर, तरीही मुलातले बाल्य न हरवू देता त्यांना घडवण्यासाठी कमालीचा संवेदनशील असू शकतो याचे उदाहरण म्हणजे लीलाताई. वयाच्या ९३ व्या वर्षी त्या गेल्या. सिद्धहस्त साहित्यिक ना. सी. फडके यांच्या कन्या व ‘दलितमित्र’ बापूसाहेब पाटील यांच्या त्या पत्नी. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले होते. अध्यापक महाविद्यालयात प्रदीर्घ काळ अध्यापन व प्रशासनाची धुराही सांभाळली. प्रत्येक ठिकाणी खास लीलाताईंचा खणखणीत ठसा उमटत राहिला.

त्यांचे बालशिक्षणातले प्रयोग अधिक मोलाचे. स्वयंसिद्ध शिक्षक, प्रशासक, शिक्षणविषयक मूलभूत चिंतक म्हणून लीलाताईंनी केलेले काम समाजासाठी मार्गदर्शक ठरले. जे करायचे ते नियोजनबद्धपणे, बोलायचे ते ठामपणे हा त्यांचा बाणा होता.

कोल्हापूरने देशाला जे. पी. नाईक यांच्यासारखा जगप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ दिला. ते जो विचार मांडत होते, तो आपल्या नोकरशाहीला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा झेपणारा नव्हता. आताही पोपटपंचीच्या पलीकडे त्या दिशेने काही होत नाही. अशा वेळी लीलाताईंनी ‘सृजन आनंद’च्या माध्यमातून केलेल्या प्रयोगांचे मोल आगळे आहे. मूल्यशिक्षण म्हटले की पाठांतरावर भर देणारे इतिहासातल्या आत्मगौरवाकडे जाणारे काही आणायचे आणि बोलक्‍या भिंती आणि लटकलेल्या रंगबिरंगी तक्‍त्यांतून पर्यावरणकेंद्री शिक्षणाचा ओनामा होईल असे मानायचे, हे शिक्षणातल्या अंधाराचे लक्षण. त्या तमाच्या तळाशी दिवे लावायचे म्हणजे काय हे लीलाताईंनी दाखवले. मुलांमधील कुतूहल जागे करणे, उत्सुकता वाढवणे, त्यातून प्रश्न पडतील, विचारले जातील आणि त्यांना उत्तरे शोधायचा प्रवास सुरू होईल, असे वातावरण तयार करणे हे ‘सृजन’चे वैशिष्ट्य. लीलाताईंच्या शिक्षणातील प्रयोगांवर बरेच लिहून झाले आहे. 

आता ‘कोरोना’च्या संकटाशी झुंजत असताना परीक्षा कधी, कशी घ्यावी, वर्ग कसे सुरू करावेत यावर सारी चर्चा, वाद केंद्रित झाले आहेत. त्याचे महत्त्व पूर्णतः नाकारता येत नसले तरी परीक्षा, त्यात मिळणारे गुण आणि त्यासाठीची धावाधाव एवढेच शिक्षण असते काय? या धबडग्यात अनेकदा बाल्य हरवून जाते. ते होऊ नये यासाठी लीलाताईंचे काम मैलाचा दगड ठरावे. त्यांनी शाळकरी मुलांना स्मशानात नेले, धडाडती चिता दाखवली.

स्मशान, भुतखेते याचे भय कायमचे संपवले. एकदा त्यांच्या शाळेत पाणी या विषयावर काम केले जात होते. पाणी येते कुठून, तयार कसे होते इथपासून आपण पाण्याचा वापर कसा करतो, गळती कशी होते, किती सांडपाणी तयार करतो, त्याचे काय होते इथपर्यंतचा शोध मुले घेत होती. त्यासाठी काही कुटुंबांत जाऊन सर्वेक्षण करत होती. या एका प्रयोगात मुलांमध्ये किती कौशल्ये आणि किती संस्कार सहजपणे बिंबवले जात होते. आई-बापाने ‘गुगल’वरून सर्च करून आणलेले ‘वर्कबुक’मध्ये कॉपी पेस्ट करायचे आणि प्रोजेक्‍ट आणि असाइन्मेंटचे उपचार उरकायचे, या शिक्षणाच्या फॅक्‍टऱ्यांत चालणाऱ्या उपक्रमांतून शक्‍य नसलेला पर्यावरण जपण्याचा संस्कार सहजपणे ‘सृजन’च्या प्रयोगात होत असे.

स्वयंपाकघरालाच प्रयोगशाळा बनविण्याचे उपक्रमही असेच प्रयोगशील, सोबत काही कायमचे ठसवणारे. पालक आणि मुलांमधला संवाद आणि त्यातून मुलांची जडणघडण हा या प्रयोगांचा एक महत्त्वाचा पैलू होता, जो भरमसाट फी देऊन कथित उच्चभ्रू शाळेत मुलाला टाकले की जबाबदारी संपली असे मानण्याला छेद देणारा. वर्गाच्या चार भिंतीत मूल घडतेच; पण ते भवतालच्या व्यापक शाळेतही घडत असते, याची लख्ख जाणीव लीलाताईंच्या प्रयोगात होती. मुलांच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणारे आणि कल्पकतेला दाही दिशा उधळू देणारे प्रयोग- खेळ हे वैशिष्ट्य. प्रचलित अभ्यासक्रम न नाकारता हे घडवता येते ही या प्रयोगांची खासियत. आज साऱ्या जगात ‘कोरोनो’त्तर व्यवस्थेविषयी चर्चा सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या अतिवेगाने आदळण्यातून होणाऱ्या घुसळणीवर मंथन सुरू आहे. तेव्हा शिक्षणात हे सारे कसे सामावायचे आणि तरीही व्यक्तिमत्त्व फुलवण्याचे मूळ तत्त्व कायम कसे ठेवायचे हा मुद्दा जगासोर आहे.

तिथे भाकरी देणाऱ्या  कौशल्यांपलीकडे जगणे आनंदाचे बनविणारे शिक्षण, लाइफ स्कील्स आणि एकमेकांविषयी आस्था, सामाजिक भान आणि सहवेदनेचा संस्कार असलेले शिक्षण ही आवश्‍यकता बनते. या साऱ्याचा विचार लीलाताईंच्या प्रयोगात आहे. लीलाताईंची आठवणच ठेवायची तर शिक्षणातल्या अशा प्रयोगांच्या चळवळी व्हाव्यात; राज्याच्या, देशाच्या धोरणात त्याचे प्रतिबिंब पडावे. बाकी जे देता येणे शक्‍य होते ते सारे लीलाताई देऊन गेल्याच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT