लीना नायर
लीना नायर sakal
संपादकीय

आभा आत्मविश्वासाची अन्‌ उद्यमशीलतेची

सकाळ वृत्तसेवा

चेहऱ्यावरील आभा जणू तिच्या आजवरच्या यशाविषयी खूप काही सांगून जात असते.

जगातला सर्वांत मोठा लक्झरी ब्रॅण्ड असलेल्या ‘शनॅल’च्या जागतिक मुख्य कार्यकारीपदी लीना नायर यांची नुकतीच नियुक्ती झाली. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या लीना यांचा या क्षेत्रातील प्रवास कसा झाला, यावर त्यांच्या मुलाखतीच्या आधारे टाकलेला दृष्टिक्षेप. तो महिलांसाठी मार्गदर्शकच नव्हे तर प्रेरकही ठरेल.

सुधा मेनन

जगातला सर्वांत मोठा लक्झरी ब्रॅण्ड असलेल्या ‘शनॅल’च्या जागतिक मुख्य कार्यकारीपदी लीना नायर यांच्या नियुक्तीच्या बातमीचे अजिबात नवल वाटले नाही. ‘मी हे करू शकते’ हा आत्मविश्वास तिच्या बोलण्या-वागण्यातून नेहमी झळकत असतो. त्या आत्मविश्वासातून निर्माण झालेली तिच्या चेहऱ्यावरील आभा जणू तिच्या आजवरच्या यशाविषयी खूप काही सांगून जात असते.

२०१६मध्ये एकदा मुंबईतील ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’च्या आलिशान कार्यालयात तिच्या ऑफिसमध्ये गेल्याचे मला आठवते. लीना त्या वेळी ‘मानव संसाधन विभागा’ची प्रमुख होती. ‘देवी, दिवा ऑर शी डेव्हिल : स्मार्ट करिअर वूमन सर्व्हायव्हल गाइड’, या पुस्तकासाठी तिची मुलाखत घ्यायला गेले होते. पहिल्या भेटीतच तिने खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यातून कोल्हापूरपासूनचा तिचा प्रवास उलगडत गेला. तो विलक्षण प्रेरणादायी आहे. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत झाली, ते वर्ष होते १९९२चे. वयाच्या विशीत या मुलीवर या क्षेत्राने मोठा प्रभाव टाकला.

त्याच क्षेत्रात नेतृत्वपदी पोहचायचे, याची खूणगाठ तिने बांधली. प्रत्येक अप्रायझलनंतर तिची कार्यकारी संचालक होण्याची आकांक्षा फुलत गेली. २००२मध्ये तिचे स्वप्न साकार झाले. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’मध्ये ‘युवा संचालक’ होण्याचा मान तिने मिळविला. २०१६मध्ये तिची मनुष्यबळ विभागाची जागतिक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही तिच्या यशाची एक मोठी झेप होती. त्या उद्योगसमूहाच्या सुकाणू समितीत ती कार्यरत झाली. ‘शनॅल’च्या मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत होण्यापूर्वी पाच वर्षे आधीच तिने ही भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे.

‘‘कोल्हापूर या छोट्याशा शहरात (तेव्हाच्या) अगदी पुराणमतवादी सामाजिक संस्कारांसह मी लहानाची मोठी झाले. त्यावेळी तेथील स्त्रियांमध्ये मी माझा आदर्श शोधत नव्हते. आमच्या स्वतःच्या कुटुंबातील अनेक सदस्य उद्योजक असूनही, मी माझे शिक्षण पूर्ण करून लग्न करण्यापेक्षा आणखी काही करीन, अशी अपेक्षा कोणीही केली नाही. माझ्या स्वतःच्या कुटुंबानेही नाही,’’ असे तिने मला सांगितले होते. पण प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर तिने आपला मार्ग शोधला. स्वतंत्र पाऊलवाट निर्माण केली. अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर तिने मानव संसाधन व्यवस्थापनातही पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आपले सुकाणू आपल्याच हातात ठेवणारी स्त्री ही तिची ओळख बनली. मानव संसाधन विभागात (एच.आर.) कार्यरत असताना तिने कंपनीत यशाचा प्रत्येक टप्पा पार केला.

केवळ कामाच्या बाबतीत नव्हे, तर स्री- पुरुष विषमतेच्या वातावरणातही तिला डायनॅमिक भूमिका बजावावी लागली. तिने अनेक पायंडे मोडीत काढले. पायात पाय घालण्याची वृत्ती असलेल्यांवर जरब बसवली. कंपनीच्या कार्यालयात रात्रपाळीला काम करणारी पहिली महिला, याचा तिच्या डोळ्यांत त्यावेळी तरळलेला अभिमान मला अजून आठवतो. एच. आर. विभागात काम करणे सोपे नाही. कामगारांच्या आंदोलनाच्यावेळी तटस्थ भूमिका घेत समन्वय साधण्याचे काम तिने केले. कामगारांचे प्रश्न तिला जीवनाचे नवे आयाम आणि सहानुभूती शिकवून गेले. एच. आर.च्या स्पर्धात्मक आणि गुंतागुंतीच्या जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या. अनेकदा कठोर निर्णय घेण्याची अपेक्षा केली जाते. लीना तिच्या अनुभवातून शिकली. कामाच्या ठिकाणी लिंगभाव समानता निर्माण झाली पाहिजे, यासाठी एक महत्त्वाचा आवाज म्हणून ती ओळखली जाते. हा विषय ती जगातील विविध प्रभावी व्यासपीठांवर बोलते. धडपडणाऱ्या इतर महिलांना तिच्या अनुभवातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळेच त्यासंबंधी विचारले. तेव्हा तिने सांगितलेले काही कानमंत्र महत्त्वाचे होते. ते असे...

  • संधी आली तर ती सोडू नका. ती घेतल्याने घरचे काय होईल, यासारखे विचार आणि अतिविश्लेषण करीत अपराधभाव बाळगू नका.

  • आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कामावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून घरच्या अन्य जबाबदाऱ्यांच्या संदर्भात एक नेटवर्क विकसित करा. आपल्यासाठीची एक ‘सपोर्ट सिस्टम’ तयार करा.

    आयुष्याचा जोडीदार चाणाक्षपणे निवडा. त्याला आपले करीअर, आपली उद्दिष्टे याविषयी विश्वासात घ्या. त्याच्या पूरक भूमिकेचा तुम्हाला खूपच फायदा मिळू शकतो.

  • आपण जिथे कार्यरत आहोत, तिथे मार्गदर्शक शोधा. जो तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाप्रत नेईल.

  • तुमचे सहकारी आणि वरिष्ठांचे अभिप्राय नक्की ऐका. हा फीडबॅक महत्त्वाचा असतो.

  • तुमचे संपूर्ण आयुष्य म्हणजे तुमचे करिअर असे मानू नका. इतर आवडी, छंद जोपासा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.

लीना यांचा सगळा प्रवास जाणून घेताना यातली प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतः आचरणात आणली आहे, हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळेच त्यांनी सांगितलेले हे कानमंत्र म्हणजे अनुभवसिद्ध अशा सूचना आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT