ayodhya ram temple inauguration pm modi pran pratishtha ram lalla idol puja ram temple consecration ceremony january 22 esakal
संपादकीय

Ram Temple Inauguration : घराघरांवर रत्नतोरणे…!

सदिच्छांमध्येच खरा राम वसत असतो, आणि तो तर अंतर्यामी आहे. एकमेकांच्या मंगलाची भावना जिथे जागृत होते, तो क्षण वाया का दवडायचा?

सकाळ वृत्तसेवा

‘‘जरा धीरे धीरे हांको, मेरे राम गाडीवाले…जरा हौले हौले हांको, मेरे राम गाडीवाले…’’ प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तमाला गाडीवानाची उपमा देणाऱ्या संत कबीरांना जो श्रीराम अभिप्रेत होता, तोच आज देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या मनीं विसावला आहे.

कबीराचा गाडीवान राम जीवनाची गाडी हाकणारा. आपली सामान्य जीविते योग्य दिशेने मार्गस्थ करणारा. ‘है जी गाडी अटकी रेत में, मेरी मजल पडी है दूर, धर्मी धर्मी पार उतर गया, पापी चकनाचूर…’ अशी ही या गाडीवानदादाची गाडी.

संकटांच्या खाचखळग्यातून, अपप्रवृत्तींच्या वाटमारीमधून मुसाफिराला अलगद बाहेर नेणारी. त्याच्याच भरवश्यावर तर हा प्रवास चालला आहे, याची जाणीव करुन देणाऱ्या संत कबीरांना जो राम दिसला होता, तोच रामराणा आज धनुष्यबाणासहित अयोध्येतील मंदिरात स्थानापन्न होईल. श्रीराम हे आपल्या बहुसंख्यांचे दैवत.

किंबहुना मनुष्यप्राणी कसा असावा, याचा तो मूर्तिमंत आदर्शच. अयोध्येचा हा राजा, देव असला तरी, नियतीचे फासे त्यालाही चुकले नव्हते. जीवनातले अकटोविकट संघर्ष पार करत, दुष्टप्रवृत्तींना आपल्या रामबाणाने विद्ध करत श्रीरामांनी आपले ‘रामपण’ सिद्ध केले.

त्या रामतत्त्वाचे शाश्वत मंदिर अयोध्येत उभे राहिले आहे. एकवचनी, एकबाणी, मातापित्यांच्या आज्ञा विनाविवाद स्वीकारणारा, सत्य सिद्ध व्हावे म्हणून अवघड परीक्षेला धीरोदात्तपणे सामोरा जाणारा श्रीराम हे आपल्यासाठी एक जीवनमूल्य आहे.

त्या जीवनमूल्याची प्रतिष्ठापना आज अयोध्येतील दिव्यसुंदर मंदिरात होत आहे. हा सोहळा अनेकार्थांनी भारतीयांसाठी ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. त्याला सांस्कृतिकतेचे रंग आहेत. हजारो वर्षांच्या परंपरेचा प्रवाह त्यामागे वाहात आला आहे.

काही भलेबुरे सामाजिक संदर्भ आहेत, आणि अपरिहार्यपणे मिळालेली राजकारणाची डूबदेखील आहे. या सर्वांच्यावर हा विश्वाचा विश्राम राम दशांगुळे वर उभा आहे. म्हणूनच त्याच्या सोहळ्यात सारा देश एकसमयावच्छेदेकरोन रममाण झालेला दिसतो.

स्वत:च्याच जन्मभूमीत अनिकेत ठरलेल्या श्रीरामलल्लांच्या प्रतिष्ठापनेचा हा दिवस अखेर उजाडला, हाच मुळी एक दुर्मिळ योग आहे. भांडणतंटे, आंदोलने, हिंसाचार, कोर्टकज्जे, राजकीय डावपेच या साऱ्यांमधून तावून सुलाखून निघालेली ती सुंदर मूरत आज त्या भव्य मंदिरात प्रतिष्ठापित होईल, तेव्हा कोट्यवधी भाविकांना ‘याजसाठी केला होता अट्टहास’ ही जाणीव भावविभोर करेल.

नळेचंद्रजोतींच्या रोषणाईने साऱ्या देशाचे नभांगण उजळून निघाले आहे. जणू सारा देशच शरयू नदीचा किनारा झाला आहे. आपल्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीच्यावेळी असेच इंद्रायणीचे वाळवंट विष्णुदासांच्या मांदियाळीने फुलून जाते. तसेच हे!

पंढरीराण्याच्या दर्शनहेळामात्रे हेलावून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तिभावाला कुणी तर्कशास्त्राचे नियम लावत बसत नाहीत. ही भक्तिची पेठ व्यवहारापलिकडची असते. श्रीरामांच्या भक्तीने देशातील बहुसंख्यांचा आनंद ओसंडून वाहात असेल, तर त्यात आपणही आपले थोडके स्मित मिसळावे.

एखादी अस्फुट टाळी आपलीही वाजावी. देशभरातील कोट्यवधी भाविक आज आपापल्या घरांचे उंबरे दिव्यांनी उजळून टाकतील. घरोघरी गोडधोड होईल. ज्या घरात अजूनही दारिद्र्याचा काळोख आहे, तिथे गोडाधोडाचा प्रसाद नेऊन देण्याची खटपट होईल. मंगलकार्य यालाच म्हणायचे असते. एकमेकांच्या मंगलाची भावना जिथे जागृत होते, तो क्षण वाया का दवडायचा?

एकाच वर्षात यंदा दोनदा दिवाळीचा सण आल्यागत वातावरण साऱ्या देशात निर्माण झाले आहे. ‘घराघरावर रत्नतोरणे, अवतीभवती रम्य उपवने, त्यात रंगती नृत्यगायनें, मृदुंगवीणा नित्य नादति, अलकानगरीपरी…’ या ‘गदिमां’च्या गीतरामायणातील पंक्तीं चक्क प्रत्यक्षात भूमीवर अवतरल्या आहेत.

कालपरवापर्यंत जिथे तणावग्रस्त वातावरण होते, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, तिथे आता यापुढे रामभक्तांच्या आणि पर्यटकांच्या रांगा लागणार आहेत. जिथे रामलल्लांचे दर्शन अवघड बनले होते, तिथे स्थापत्य आणि शिल्पकलेचा आधुनिक नमुना ठरणारे भव्य मंदिर उभे राहिले आहे.

ऐन कलियुगात त्रेतायुगाच्या निळ्यासावळ्या सावल्या पडल्या आहेत. या सोहळ्याची राजकीय किंवा सामाजिक मीमांसा पुढील काळात होत राहील. तशी ती व्हायलाच हवी. तूर्त तरी या गाडीवानदादाच्या गाडीत बसून आसपासची दिव्यशोभा पाहून मनोमन हात जोडावेत, हे खरे. सदिच्छांमध्येच खरा राम वसत असतो, आणि तो तर अंतर्यामी आहे.

राम नाम अवलंब बिनु, परमारथ की आस।

वरषत वरिद-बूँद गहि, चाहत चढ्न अकास।।

(रामनामाचा अवलंब न करता परमार्थ साधू पाहाणे म्हणजे पावसाच्या थेंबाच्या आधाराने आकाशाला हात लावण्याची आशा करण्यासाररखे आहे.)

- संत तुलसीदास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge: नवले पुलावरील अपघातांना बसणार आळा! लवकरच सुरू होणार नवा पर्यायी मार्ग; प्रवाशांना मोठा दिलासा

New Frog Species: नागालँडमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

SCROLL FOR NEXT