Beggars-in-Mumbai 
संपादकीय

भीक मागणं हा गुन्हा कसा?

दीपा कदम

मुंबईतल्या कुठल्याही चौकात सिग्नलला गाडी थांबली की, तिच्या खिडकीबाहेर हात पसरलेले भिकारी दिवसाच्या कोणत्याही प्रहरी दिसतात. घाईघाईने रस्ता ओलांडतानाही ते गाठतात. मंदिर आणि मशिदीबाहेर तर आपल्या पदरी पुण्य पडावं यासाठी बिचारे ते हात पसरून उभे असतात. गर्दीने तुडुंब लोकलमध्ये साताठ वर्षांची पोरगी एकाच हाताने दोन दगड एकावर एक वाजवून ‘परदेसी परदेसी जाना नही...’ हे विस्मरणात गेलेलं गाणं बेसूरपणे गाते आणि घामाघूम गर्दीतून खळखळ करत पैसे जमवते. मुंबईच काय कुठल्याही महानगरांमध्ये, शहरांमध्ये, धार्मिक स्थळी भिकारी नाहीत असे ठिकाण शोधूनही सापडणार नाही. मुंबईसारख्या आंतररष्ट्रीय शहरावर भिक्षेकऱ्यांचा ठिपका शहराची शोभा आणि शान कमी करीत असल्याचे मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांना वाटते. त्यांनी शहरातील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पत्राद्वारे भिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या दिशेने कारवाईदेखील सुरू झाली आहे. 

मान-सन्मान गहाण
मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता या महानगरांमध्ये भिकारी ही समस्या आहे. जगण्याचं कोणतंही साधन नसतं तेव्हा जिवंत राहण्यासाठीचा तो मार्ग असतो. मान-सन्मान प्रत्येकाला असतो. पण जगण्यासाठी गहाण टाकण्यासाठी तो शेवटचा ऐवज असतो. महानगरांमध्ये काम तरी मिळते किंवा नाही मिळालं तर भीक मागूनही जगता येतं अशी मुंबईसारख्या शहराची ख्याती असल्याने शहरात भीक मागणं स्वतंत्र धंदा आहे. उंच टॉवरच्या बाहेरच्या चौकात दोन बांबू उभे करून त्यावर डोंबाऱ्यांचे खेळ करून पैसे गोळा करणाऱ्या डोंबारणींचे कौतुक या शहराला अजूनही आहे, तिला कशात मोजणार? लग्नामध्ये, बारशाला टाळ्या वाजवत येणाऱ्या तृतीय पंथींना हौसेने साडीचोळी अजूनही दिली जाते, ती भीक असते का? 

त्यांचे पूरक धंदेही
काही वर्षांपूर्वी एक भिकारीण तिच्या झोपडीत वार्धक्‍याने गेली. तिच्या गाठोड्यात लाखभर रुपये तर एकाकडे शेअर सर्टिफिकेट सापडली होती. मुंबईतल्या जागेला सोन्याचा भाव असल्याची चर्चा नेहमीच असते, भिकाऱ्यांनादेखील तो अनुभव येतो. गरिबी आणि श्रीमंतीची शाल एकत्रच लपेटून असलेल्या या शहरात भिकारी कसे काय मालामाल होणार नाहीत? ठराविक वाराला मंदिर आणि दर्ग्यांच्या बाहेर विशिष्ट जागा पटकवण्यासाठी भिकाऱ्यांच्या टोळीच्या म्होरक्याला भाडे द्यावे लागते. कडेवर शेंबडं मूल घेऊन फिरल्यावर लोकलसाठी पळणारी बाईपण थांबून पाच दहा रुपये हातावर टेकवते (एक रुपया, पन्नास पैसे देणाऱ्याकडे भीकारीच दयेने पाहतात). या शहरातले सर्वच भिकारी काही केवळ पोटापाण्यासाठी भीक मागत नाहीत. काही वेगवेगळ्या धंद्यांमध्ये अडकले आहेत. भीक मागण्यासाठी लहान मुलांच्या टोळ्या करणं, स्मगलिंगसाठी भिकाऱ्यांचा वापर करणे, दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना खबरी पुरवणे यासारखे पूरक धंदेही ते करत असतात. मुंबईसारख्या शहरात भिकाऱ्यांची वेगळी दुनिया आहे. तिला नजरेआड करायचं तर त्यासाठी मुळात भिकारी ही समस्या नाही तर ते सामाजिक वास्तव आहे हे स्वीकारायला पाहिजे. भिकारी हे गरिबीचे फुटपाथवर पसरलेलं सत्य आहे. 

भिक्षेकरी गृहात भिकाऱ्यांना बंदिस्त करून या प्रथेचे उच्चाटन करण्याचा कोणता नवीन फॉर्म्युला मुंबई पोलिसांकडे आहे? मुंबईतल्या भिक्षेकरीगृहाची क्षमता साधारण ९००पेक्षा कमी आहे. मुंबईतील किती भिकाऱ्यांना किती काळासाठी तिथे ठेवले जाईल? त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून प्रश्न संपणार आहे का, असे अनेक प्रश्न ही मोहीम हाती घेतल्यावर दरवेळी उपस्थित होतात. त्याप्रमाणेच आताही झाले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या भिकाऱ्यांबाबतच्या निर्णयामुळे या प्रश्नावर कोणत्या दिशेने विचार करण्याची गरज आहे याचे मार्गदर्शन आहे. राज्य सरकारने यावर विचार करण्याची आवश्‍यकता आहे. नाहीतर यापुढेही ही मोहीम नित्यनेमाची, लोकानुनय करणारी म्हणून ओळखली जाईल. या शहरातून भिकाऱ्यांना हटविण्यासाठी ब्रिटिशांपासून प्रयत्न  झाले. पण त्याला इंचभरही यश कोणत्याच सरकारला किंवा अधिकाऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळेच या कायद्यामध्ये मूलभूत सुधारणांची गरज आहे. भीक मागण्याची वेळ येऊच नये यासाठीची व्यवस्था उभारायची की त्यांना गुन्हेगार मानायचं, हे आता तरी निश्‍चित करावं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT