कोरोना विषाणूचा मुकाबला करताना सारे जग सध्या मेटाकुटीला आले आहे. परिस्थिती कधी पूर्वपदावर येईल दोन महिन्यांनी, सहा महिन्यांनी की दोन वर्षांनी कोणाला काही कळेनासे झाले आहे. सारे जग इतक्या विमनस्क स्थितीत याआधी कधीच पहायला मिळाले नव्हते. कोरोनानंतर लोकांचे प्राधान्यक्रम बदलतील, विविध देशांना धोरणे बदलावी लागतील यावर साऱ्यांचे एकमत आहे. कोरोनानंतरचे जग कसे असेल यावर जगभरातील माध्यमांमध्ये विचारमंथन सुरू आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आपले विचार मांडत आहेत.
शास्त्रज्ञांचे सामूहिक प्रयत्न
सध्या अमेरिका आणि चीन एकमेकांना दोष देण्यात मश्गूल असले तरीही जगातील शास्त्रज्ञ, संशोधक कधी नव्हे इतक्या जवळ आले आहेत, असे प्रथमच घडत असल्याचे निरीक्षण न्यूयॉर्क टाईम्सने नोंदविले आहे. जगात सध्या एकाच बाबीवर संशोधन सुरू आहे ते म्हणजे कोरोनावरील लस. बाकी सारे संशोधन थांबले आहे. देशांनी जरी सीमा बंद केल्या असल्या तरी विविध देशांतील संशोधक एकमेकांना कमालीचे सहकार्य करीत आहेत, असे न्यूयॉर्क टाइम्समधील लेखात म्हटले आहे. जीनोम सिक्वेन्स उकलण्यासाठी सर्व वैज्ञानिकांनी एकमेकांना मदत केली. सध्या परस्परांच्या मदतीने दोनशेहून अधिक क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत. न्यूयॉर्क, बिजींग, मॉस्को, पॅरिस, दिल्ली, लंडन अशा सर्व शहरांतील वैज्ञानिक कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जवळ आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या कॉन्फरन्स कॉलवर सारे शास्त्रज्ञ आपले संशोधन सर्वांसाठी शेअर करीत आहेत. पेटंट मिळवण्याचा विचारही त्यांच्या मनाला सध्या शिवत नाही. वैयक्तिक यशापेक्षा सामूहिकरीत्या यश मिळवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झटत आहेत. विशेष म्हणजे चीनमधील शास्त्रज्ञ यात आघाडीवर आहेत.
तंत्रज्ञानाचा सर्वदूर प्रवेश
लंडनच्या फायनान्शियल टाइम्समध्ये जागतिक कीर्तीचे विचारवंत युवाल नोआ हरारी यांनी कोरोनानंतरच्या जगावर गंभीर भाष्य केले आहे. त्यांच्या मते, मानवतेपुढील आतापर्यंतचे हे सर्वांत गंभीर संकट आहे. येत्या काळात विविध देशांतील सरकारे जे काही निर्णय घेतील त्याचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवर, आरोग्य सुविधांवर, संस्कृतीवर राजकारणावर होणार आहेत. यातील पर्याय निवडताना आपल्याला फार पुढचा विचार करावा लागेल. कोरोनाचे संकट नक्की दूर होईल, मानव व मानवता टिकून राहील. मात्र आपण मात्र एका नव्या जगात प्रवेश करू. नेहमीच्या वेळी जे निर्णय घेण्यास अनेक वर्षे गेली असती ते निर्णय आता क्षणात घेतले जातील. अपरिपक्व आणि धोकादायक तंत्रज्ञान वापरात आणले जाईल. कारण काहीही न करण्यापेक्षा काही तरी करण्याशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येक जण काही अंतर राखून किंवा घरातून काम करू लागेल तेव्हा काय घडेल? सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे सारा शिक्षणव्यवहार ऑनलाइन करू लागतील तेव्हा काय घडेल? एरवीच्या परिस्थितीत सरकारे, शैक्षणिक मंडळे, उद्योगसमूह असे प्रयोग करण्यास पटकन राजी झाले नसते. पण कोरोनानंतरचा काळच वेगळा असेल.
मानवी इतिहासात प्रथमच प्रत्येकावर चोवीस तास नजर ठेवणारं तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. विविध देशांतील सरकारे कदाचित आता यावर अवलंबून राहतील. चीनचे उदाहरण बोलके आहे. तेथे अनेकांचा स्मार्ट फोनवरील डेटा तपासण्यात येत आहे, चेहरा ओळखण्यासाठी मोबाईल कॅमेराचा वापर होत आहे, इतकेच नव्हे तर लोकांच्या शरीराच्या तापमानाचीही नोंद मोबाईलद्वारे घेतली जात आहे. कोरोना झालेल्या पेशंटच्या संपर्कात तुम्ही आला होता का हे सांगणारे ॲप विकसित झाले आहेत. इस्राईलमध्ये पंतप्रधान नेत्यात्याहू यांनी कोरोनाचे पेशंट शोधण्यासाठी युद्धात वापरले जाणारे टेहळणी तंत्रज्ञान वापरण्यास सुरक्षा संस्थांना परवानगी दिली आहे. कदाचित पुढील काळात सरकार आता स्मार्ट फोनच्या माध्यमातून तुमचा रक्तदाब किती आहे, शरीराचे तापमान किती आहे याचीही माहिती जाणून घेण्यास उत्सुक असेल. त्यामुळे येत्या काळात टेहळणी करणारे तंत्रज्ञान वेगाने विकसित होईल.
डिजिटल डिव्हाईडची भीती
फोर्बस या जगविख्यात नियतकालिकाने बदलणाऱ्या विश्वावर विस्तृत विवेचन केले आहे. फोबसच्या मते उद्योगांसाठी पुरवठा करणारी जागतिक साखळी सध्या उध्वस्त झाली आहे. आता पुढील काळात अनेक कंपन्या स्थानिक पातळीवरील पुरवठादारांना प्राधान्य देतील. ऑनलाइन शॉपिंग प्रचंड वाढेल. त्यामुळे अवाढव्य स्टोअर्सची संख्या घटेल. जगभरातील लोक ऑनलाइन काम तसेच शिक्षणास प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑनलाइन काम करण्याच्या क्षमतेला आता कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त होणार आहे. ज्यांना हे जमणार नाही ते आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर राहतील. त्यामुळे नव्या प्रकारची डिजिटल डिव्हाईड निर्माण होण्याची भिती आहे. जगभरात अनेक मोठे प्रकल्प आता रखडण्याची भिती आहे. कारण त्यातील गुंतवणूकदार आता हात आखडता घेण्याची शक्यता आहे.
थोडक्यात, कोरोनामुळे जगभरातील सर्व देशांना कधी नव्हे ते एकमेकांना सहकार्य करण्याची गरज निर्माण झालेली आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिल्यास आपण केवळ कोरोनावरच विजय मिळवणार नाही तर येत्या काळात मानवतेसमोर उभ्या ठाकणाऱ्या संभाव्य वैश्विक साथींनाही आला घालू शकू. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी यापेक्षा दुसरी संधी नसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.