MNS 
संपादकीय

ढिंग टांग : आकडा!

ब्रिटिश नंदी

दादू : (फोन फिरवत) ट्रिंग ट्रिंग..!

सदू : (कोरडेपणाने) बोल दादूराया!

दादू : (च्याट पडत) नुसत्या रिंगवरून ओळखतोस! कमालचै तुझी!!

सदू : (त्रयस्थपणे) उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचं काम सोडून शिळोप्याचे फोन का करतोयस?

दादू : का? तुला नाहीत वाटतं निवडणुकीची कामं?

सदू : (एक पॉज घेत) लौकरच कळेल!

दादू : (दर्पोक्‍तीयुक्‍त) आमची पहिली यादी बाहेर आलीसुद्धा!

सदू : (खवचटपणे) तुम्ही म्हणे तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवण्याची प्रतिज्ञा केली आहे? खरं आहे का?

दादू : (स्वाभिमानी बाण्याने) प्रतिज्ञा नव्हे, वचन दिलंय, वचन! एक ना एक दिवस मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत आपला मावळा बसवून दाखवीन, असं वचन दिलंय!

सदू : (टोमणा मारत) कधी उगवणार तो दिवस?

दादू : (गोंधळून) ते अजून ठरवलेलं नाही! पण बसवीन एक दिवस!

सदू : (टोचून बोलत) वाट बघा, वाट!

दादू : (खवळून) सद्या, तोंड सांभाळून बोल! महाराष्ट्रातल्या किंगमेकरशी बोलतोयस तू!!

सदू : (विषय बदलत) झाली का तुमची युती?

दादू : ती आधीच झालीये! आमचं ठरलंय!!

सदू : (सदिच्छा व्यक्‍त करत) एकदाचं गंगेत घोडं न्हाऊ द्या, म्हंजे झालं!!

दादू : (खबर काढून घेत) तुम्ही म्हणे निवडणूक लढवणार नाही यंदा?

सदू : (कपाळाला आठी घालत) कोण म्हणतं असं?

दादू : (जीभ काढून) मतदारच म्हणतायेत!!

सदू : (संतापून) दादूराया, मोठा भाऊ आहेस म्हणून ऐकून घेतोय! दुसरं कोणी बोललं असतं तर दाखवला असता इंगा!! रणांगणापासून पळ काढणारे आम्ही नव्हंत! केवळ युद्ध जिंकायचं म्हणून शत्रूशीच हातमिळवणी करणारे फितूरही आम्ही नव्हंत! आमचं युद्ध दिल्लीतल्या मोगलांशी चालू आहे!!

दादू : (सुटकेचा निःश्‍वास सोडत) चला, म्हंजे आम्ही सुटलो!! 

सदू : (सात्त्विक संतापाने) तुम्हीही त्याच दिल्लीश्‍वरांचे पाईक! त्यांच्या पाठीशी उभे राहून महाराष्ट्रावर अन्याय करणारे तुम्हीही आमचे शत्रूच! रणांगणात बघा, तुमची काय हालत करतो ते!

दादू : (कुतूहलानं) यंदा आहे का तुमचा तो ‘लाव रे तो व्हिडिओ’चा कार्यक्रम?

सदू : (खुशालून) अलबत! यंदा तर मल्टिमीडिया शो आहे! बघशीलच तू!! भरपूर दारुगोळा जमा केलाय! एकेकाची अशी तंतरवणार आहे की ज्याचं नाव ते!! फुल्ल साऊण्ड सिस्टिम, सेवंटी एमेम स्क्रीन, म्युझिक... एकदम दणक्‍यात शो लावणार आहे! 

दादू : (भोळेपणाचा आव आणत) हा निवडणुकीचा कार्यक्रम आहे की दिवाळी पहाटेचा?

सदू : (गंभीर होत) कळतात आम्हाला हे टोमणे!

दादू : (आणखी वर्मी घाव घालत) यंदा तरी स्वत:साठी करतोयस कार्यक्रम की आपला स्पॉन्सर्ड?

सदू : (चवताळून) खामोश!

दादू : (थोरल्या भावाच्या आवाजात) कशाला लष्करच्या भाकऱ्या भाजाव्यात आपण सदूराया? लोक हसतात!

सदू : (बेफिकिरीने) हसू देत! हसतील त्याचे दात दिसतील!! 

दादू : यंदा किती जागा लढवणार, ते सांग!

सदू : (गडबडून) ते अजून ठरायचंय!

दादू : (खवचटपणे) ठरायचंय? फू:!! 

सदू : (खर्जात) तुमचं ठरलंय म्हणता ना?

दादू : (फुशारकीने) एकदम फायनल ठरलंय म्हण!. 

सदू : (नेहले पे देहला देत) मग तुमच्या फायनल सीटा सांगा बरं! सांग ना... हलोऽऽ... हलोऽऽ... ठेवलास का फोन? हात्तिच्या!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT