Dhing Tang
Dhing Tang 
संपादकीय

घड्याळ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

'पप्याजीऽऽऽ...‘‘ कृष्णकुंजगडाच्या बालेकिल्ल्यातील निजघरातून आलेल्या राजियांच्या जबर्दस्त हाकेने दाराबाहेर स्टुलावर बसून डुलक्‍या घेणारा पप्याजी फर्जंद साफ कोलमडला. उठून देहाचा पाठीमागचा परिसर चोळत, झटकत तो राजियांच्या शयनगृहाकडे धावला. धावता धावता मांडचोळण्यात पाय अडकून धडपडला. धडपडून त्याने नजीकचा दरवाज्याचा पडदा आधारासाठी ओढला. वरील आडव्या दांड्यासकट पडदा खाली येऊन बुटाच्या फडताळावर पडला. फडताळ गडगडत जिन्यावरून खाली गेले. जिन्याच्या पायथ्याशी उभे असलेले जेम्स आणि बॉंड चवताळून भुंकू लागल्याने जमा झालेल्या गर्दीतील चार मनसैनिकांनी पोबारा करून शिवसेनेत प्रवेश केला. रस्त्यावल्या गर्दीतील चार शिवसैनिकांनी 'कृष्णकुंज‘च्या गोटात प्रवेश साधला. ह्या घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसांनी थेट गृहमंत्र्यांना फोन लावून खबर दिली. गृहमंत्र्यांनी दिल्लीला फोन लावला...इतके सारे एका हाकेमुळे घडले!! 

होय, ह्याचा अर्थ महाराष्ट्रहृदयसम्राट मराठी मनाचे अभिषिक्‍त राजे उठले होते. ह्याचा अर्थ महाराष्ट्र उठला होता. ह्याचा अर्थ सह्याद्री जागा झाला होता. गडाच्या पायथ्याशी पसरलेला शिवाजी पार्काचा परिसरदेखील डोळे चोळत तटकन उठून बसला. पलीकडल्या बांद्रे प्रांतातही वर्दी पोचली. राजे उठले! राजे उठले हो, उठले! 

'पप्याजी, किती वाजले?‘‘ निजघरातून दबलेल्या आवाजात राजसवाल उमटला. हा आवाज एरवी दबण्यासारखा नाही, हे इतिहासासदेखील ठाऊक आहे. महाराष्ट्राच्या शत्रूंना त्याची जाणीव आहे, आणि मराठी माणसाच्या मनात हा दृढ विश्‍वास आहे. दबणारे आवाज वेगळे, हा वेगळा!! पण काहीही असले, तरी तोंडावर उशी घेऊन पडल्या राहणाऱ्या माणसाचा आवाज असाच येतो ना? जिज्ञासूंनी आपापल्या जबाबदारीवर प्रयोग करून पाहावा! (खुलासा : स्वत:च्याच तोंडावर उशी दाबून बघावी. शेजारच्या नको! असो.)...धावत निजघराकडे आलेल्या पप्याजीने घड्याळ पाहिले. किती वाजले? किती वाजले? त्याने साक्षात काळाकडे पाहिले; पण काळ थंड होता. त्याचे काटे सव्वादोन वाजल्याचे सांगत होते आणि अहर्निश हालणारा लांबलचक लंबक थंड होता. जणू काही प्रत्यक्ष काळ स्वत: विचारत होता, की राजे, तुम्ही तो आमचे राजे!! बोला, तुम्हास किती वाजवून हवे आहेत? बारा? तीन? सहा? नऊ?...हवे तर माझे हे खुजे हात तुम्ही म्हणाल त्या आकड्याशी नेऊन ठेवितो. तुम्हाला हवे तितके आणि तसे निमूटपणाने वाजवतो. आपण नुसते उच्चारा, तेवढे टोले नाही हाणून दाखवले, तर नावाचा काळ नव्हे!! 

''घड्याळ बंद पडलंय जी!‘‘ जणू काही ते घड्याळ त्याच्यामुळेच बंद पडले आहे, अशा अपराधी सुरात पप्याजी फर्जंदाने कबुली दिली. त्यावर उशीच्या खालती शांतताच होती; पण ती वादळापूर्वीची शांतता असणार, ह्या खात्रीमुळे फर्जंदाच्या तोंडचे पाणी पळाले. अर्थात, 'किती वाजले?‘ हा सवालदेखील ह्या वास्तूत तसा फारसा विचारला जात नाही. 
''घरातली सगळी घड्याळं मेली?‘‘ दबलेल्या आवाजात दबलेल्या निखाऱ्यांची धग होती. 


पप्याजी फर्जंदास देहाच्या कानाकोपऱ्यातून घाम फुटला. आता तोफखाना धडाडणार. त्याच्याआधी त्या तोफेच्या तोंडात चहा ओतला गेला पाहिजे, अन्यथा काही खरे नाही. तेवढ्यात त्यास आयडिया सुचली. 

''साहेब, परवा आपण अमिताभ बच्चनसाहेबांच्या बर्थ डेला त्यांचं कार्टून काढून दिलंवतं ना?‘‘ पप्याजीने आठवण करुन दिली. उशीच्या खाली दबलेल्या मुखावर आठ्यांचे जाळे. दिले काढून कार्टून, त्याचे इथे काय? हा पप्याजी म्हंजे... 
''त्यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून लंडनमध्ये घेतलेलं हिरवंगार घड्याळ पाठवलंय!,‘‘ पप्याजीने माहिती पुरवली. हिरवंगार घड्याळ? हिरवं? हि-र-वं?...ह्यापाठीमागे काही कारस्थान तर नाही ना? राजियांचे मन शंकेने भरुन गेले. 

''घड्याळ घड्याळ असतं...वेळ कळण्याशी मतलब!‘‘ राजियांनी प्रॅक्‍टिकल डिसिजन घेतला. 
रिटर्न गिफ्टचा बॉक्‍स घाईघाईने खणातून काढत पप्यार्जींने ते हिरवेगार घड्याळ हाती घेतले. निरखून पाहताना त्याची बोबडी वळली...त्या घड्याळाला तासकाटाच नव्हता! 
...इतक्‍यात मुखावरली उशी लांबवर फेकत राजे कडाडले : आम्हाला प्रत्येकजण दरवेळी घड्याळाचीच आठवण का करून देतो? हॅ:!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT