dr anil lachke
dr anil lachke  
संपादकीय

चालताना येई शक्ती आणि ऊर्जा सापडे!

डॉ. अनिल लचके

चालण्याच्या व्यायामामुळे होणारे फायदे व्यक्तिगत असतात; पण चालण्यामुळं ऊर्जानिर्मितीही होऊ शकते, असं संशोधनातून समोर आलं आहे. तेव्हा चालण्यातून माणसाला ‘स्वार्थ’ आणि ‘परमार्थ’ असं दोन्ही साधता येईल.

चा लणं, म्हणजे ‘वॉक’संबंधी ‘शास्त्रोक्त’ विचार केला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. आपण केवळ अकरा महिन्यांचे होतो, तेव्हापासून चालत असतो. मानव तर गेली पन्नास लाख वर्षं दोन पायांवर चालतोय. तेव्हा चालण्यात विशेष काय आहे, असा प्रश्न मनात येईल. चालणं हा एक उत्तम, सोपा आणि फुकट करता येईल असा व्यायाम आहे. आपण प्रतिदिन पाच किलोमीटर चाललो, तर २७५ ते ३२५ कॅलरीज वापरल्या जातील. यामुळं महिन्याला नऊ हजार कॅलरीज खर्च होतील. एक ग्रॅम मेदा(फॅट)मध्ये नऊ कॅलरीज असतात. अशा रीतीनं महिन्यात एक किलोग्रॅम वजन कमी होईल. मात्र त्यासाठी आहारात मेदाम्ले आणि कर्बोदके यांचं प्रमाण कमी असावं. ‘रनिंग करा - पळा’ असा सल्ला काही लोक देतात, मग पळणं आणि चालणं यात फरक काय आहे? चालताना आपल्या दोन पायांपैकी निदान एक पाय क्षणभर जमिनीला टेकलेला असतो. पळताना मात्र दोन्ही पाय क्षणभर हवेमध्ये मोकळे सुटलेले असतात. सारख्या वजनाच्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती किलोमीटर पळत गेली आणि दुसरी चालत गेली, तर साधारण सारख्याच कॅलरीज जळतात. मात्र वजनदार व्यक्ती पळताना निदान दीडपट जास्त कॅलरीज जाळतात.

आपलं वजन, उंची, उत्साह, दम, रस्त्याचा चढ-उतार, खडबडीतपणा यावर चालण्याचा वेग अवलंबून असतो. आपण खूपच वेगानं चाललो तर ताशी साडेसहा किलोमीटर चालू शकतो. त्यासाठी आपली पावलं मिनिटाला ११५ ते १२० पडली पाहिजेत. चालताना ज्या हालचाली होतात, त्याचा आलेख संशोधकांनी काढलाय. चालताना आपलं डोकं एका सरळ रेषेत असतं. तथापि, कमरेजवळील खुब्याची हाडं नागमोडी पद्धतीनं खाली-वर होत असतात. यामुळं हाडं मजबूत होऊन त्यांची क्षमता वाढते. चालताना काही लोक ‘एमपी’वर संगीत ऐकतात. आमचे एक मित्र चालताना जप करतात. काही सपत्नीक जातात, तर काही मित्र-मंडळींसह गुजगोष्टी करतात. कॅलरीज जळण्यावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. उलट मानसिक प्रसन्नता वाढून ताण-तणाव कमी होतो. मनाची उमेद वाढते व बरीच नवीन माहितीही मिळते. पचनशक्तीबरोबरच स्मरणशक्ती वाढते. पन्नास ते सत्तर वयाच्या वरिष्ठ नागरिकांना आपण अजूनही तरुण असल्याची अनुभूती येते.

चालणाऱ्या व्यक्तीचे सर्व फायदे व्यक्तिगत असतात. त्यावर कोणताही कर नाही! ती व्यक्ती स्वतःची ऊर्जा वापरून चालत असते. चालणाऱ्या व्यक्तींकडून काही सामाजिक फायदादेखील व्हायला पाहिजेत, असं लॉरेन्स केंबॉल-कूक नामक तरुणाला प्रकर्षानं वाटू लागलं. तो इंग्लंडमधील लाफबोरो युनिव्हर्सिटीचा इंडस्ट्रियल टेक्‍नॉलॉजी विषयातील पदवीधर होता. चालणाऱ्या व्यक्तींकडून निदान रस्त्यावरील ‘दिवाबत्ती’चा खर्च काढता येईल काय, यासंबंधी तो विचार करू लागला. ठराविक रस्त्यांवर पादचाऱ्यांची गर्दी असते. उदाहरणार्थ, रेल्वे स्थानक, विमानतळ, शॉपिंग मॉल येथे लोकांची जा-ये बरीच असते.

लॉरेन्सनं २००९ मध्ये संशोधन करून खास फरशा (टाइल्स) तयार केल्या. त्यांचा खर्च वाचवण्यासाठी टाइल्सच्या पृष्ठभागावर मोटारीच्या टाकाऊ टायरमधील पॉलिमर वापरलेले होते. सुरवातीला टाइल्स चौरसाकृती होत्या. त्यावरून कोणी चालत गेलं तर फार कमी ऊर्जानिर्मिती व्हायची; कारण पायाचा दाब पसरला जायचा. टाइल्सचा आकार त्रिकोणी केल्यावर ऊर्जानिर्मिती समाधानकारक होऊ लागली. कारण त्रिकोणी टाइल्सवर कोठेही पाऊल पडले की दाब एकवटून पडायचा. या त्रिकोणी फरशीच्या तिन्ही कडांना एक छोटा ‘जनरेटर’ फिक्‍स केलेला होता. फरश्‍यांवरून एखादी व्यक्ती चालत गेली तर ती पाच मिलिमीटर दाबली जायची. या गतीज (यांत्रिक) ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याचे प्रयत्न लॉरेन्सने केले. चालणाऱ्याचे प्रत्येक पाऊल पाच वॉट पॉवर आणि १२ ते ४८ व्होल्ट (दाब) निर्माण करते. यात सुधारणा झाली असून, प्रत्येक पाऊल सात वॉट पॉवर निर्माण करते. या ऊर्जेच्या जोरावर पादचाऱ्याच्या जवळच्या खांबावरील एलईडी दिवा काही सेकंद प्रज्वलित होतो. या यंत्रणेतील महत्त्वाच्या भागातील रहस्य गुप्त ठेवलंय. ऊर्जानिर्मितीसाठी तांब्याच्या वळ्या, चुंबकत्व आणि विद्युत चुंबकीय इंडक्‍शन या तत्त्वावर बेतलेली आहे, असं संशोधक नमूद करतात. यात मुख्य तत्त्व पिझो-इलेक्‍ट्रिसिटीचे आहे. पिझो इलेक्‍ट्रिक ऊर्जा निर्माण करणारे स्मार्ट मटेरियल स्फटिकयुक्त असते. ते जेव्हा यांत्रिक ऊर्जेने दाबले जाते, तेव्हा विद्युत दाब निर्माण होतो. स्वयंपाकघरातील गॅस लायटर, मनगटी (क्वार्टझ) घड्याळ, ध्वनिक्षेपक, सिगारेट लायटरमध्येदेखील पिझो-मटेरियलचा समावेश असतो.

आपल्या रेल्वे स्थानकांवर भरपूर गर्दी असते. नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात ऊर्जा निर्माण करणाऱ्या फरश्‍यांचा एक छोटा प्लॅटफॉर्म बांधला होता. पंधरा दिवस त्यावरून असंख्य प्रवासी उत्सुकतेनं चालत आले-गेले. अजून काही प्रात्यक्षिकं करून या यंत्रणेचा अभ्यास केला जाणार आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळाच्या आत प्रवासी चालताना त्यांच्या नकळत थोडी प्रकाशरूपी ऊर्जा दान करतात. या क्षेत्रातील पेव्हजेन या कंपनीनं ब्राझील आणि नायजेरिया (लागोस)मधील फुटबॉलचे स्टेडियम बांधताना कृत्रिम गवताखाली त्यांच्या त्रिकोणी टाइल्सची योजना केली. रात्रीच्या वेळी खेळाडू सतत चेंडूच्या मागे धावपळ करत असतात. परिणामी विद्युत-ऊर्जा निर्माण होऊन स्टेडियम उजळून निघते. सामना संपला तरी पुढील दहा तास प्रकाश मिळतो! आगामी काळात चालणाऱ्या माणसाला ‘स्वार्थ’ आणि ‘परमार्थ’ असं दोन्ही साधता येईल. आपल्या चालण्यात एवढी ऊर्जा आहे! माधव ज्युलियन यांच्या एका कवितेत म्हटलंय - ‘धावत्याला येई शक्ती आणि रस्ता सापडे, भ्रांत तुम्हा का पडे?’ याचा आधार घेऊन आपण म्हणू - ‘चालताना येई शक्ती आणि ऊर्जा सापडे’!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT