Dr. Narendra Dabholkar
Dr. Narendra Dabholkar esakal
संपादकीय

भाष्य : करू या विवेकाची पेरणी

डॉ. हमीद दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या रविवारी (२० ऑगस्ट) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. विवेकवादी विचारांच्या प्रसारासाठी वाहून घेतलेल्या डॉ. दाभोलकर यांना मारण्यात आले; परंतु त्यांच्या विचारांचे महत्त्व उत्तरोत्तर प्रकर्षाने जाणवत आहे. दाभोलकरांची स्मृती जागवणे म्हणजे तो विचार आणि कार्य पुढे नेणे होय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तोच प्रयत्न आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद हा इथल्या समाजजीवनाचा स्थायीभाव व्हावा म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांचे आयुष्य खर्ची घातले. २० ऑगस्ट २०२३ रोजी डॉ. दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. डॉ. दाभोलकर त्यांच्या भाषणात, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील गिओर्दनो ब्रुनो या शास्त्रज्ञाला सोळाव्या शतकात कसे जाळण्यात आले होते आणि चर्चपेक्षा वेगळी भूमिका मांडणाऱ्या गॅलिलिओला कसे कैद करण्यात आले होते, याविषयी मांडणी करत असत.

त्यावेळी आताच्या समाजात असे काही होणे शक्य नाही; या घटना फार पूर्वीच्या कालखंडातील आहेत, असा विचार मनात येत असे. प्रत्यक्षात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे विज्ञान आणि अज्ञान यामधला हा झगडा वेगवेगळी रूपे घेत प्रत्येक कालखंडात आपल्यासमोर येत असतो, हे वास्तव स्वीकारणे आपल्याला भाग आहे.

सध्याच्या काळात भारतातच नाही, तर जगभरात, अज्ञान मिरवण्याची जणू काही एक संस्कृती निर्माण होत आहे की काय, अशी शंका येते. अनेक समाजशास्त्रज्ञ हे सध्याच्या कालखंडाला ‘पोस्टट्रुथ’ म्हणजे ‘सत्योत्तर कालखंड’ म्हणतात. वैज्ञानिक दृष्टिकोन ही सत्याचा शोध घेण्याची मानवाला गवसलेली सगळ्यात प्रभावी पद्धत आहे. त्यामुळे सत्योत्तर कालखंडात पहिला हल्ला हा विज्ञानावर होणार यात काहीही नवल नाही!

थोडे डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितले तर याची अनेक उदाहरणे आपल्या दिसतात. ‘महामृत्युंजय मंत्रा’च्या उच्चारणाने ‘समृद्धी’ मार्गावर अपघात होणार नाही, असा दावा बुलढाण्यात केला जातो, आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री हे ‘कोल्हापूरमध्ये यावर्षी पूर आला नाही, याचे कारण आपण शिर्डीमध्ये होतो’, असे देतात. अशा घटना आपल्या आजूबाजूला इतक्या घडत आहेत की, त्यांची नोंद ठेवणेही अवघड झाले आहे.

सत्योत्तर युगाच्या पाऊलखुणा

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील अशा गोष्टींची वानवा नाही. ‘भाभीजी पापड खाल्याने कोविड होणार नाही’, असे म्हणणारे महोदय आपल्या देशाचे कायदा राज्यमंत्री आहेत आणि ‘यूएफओ’ म्हणजे परकी ग्रहांवरून पृथ्वीवर आक्रमण करणारे जीव ह्या तद्दन भ्रामक कल्पनेविषयी अमेरिकी सिनेटमध्ये सुनावणी होणार आहे! अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि पुढे वॉशिंग्टनपर्यंतदेखील या सत्योत्तर युगाच्या पाऊलखुणा आपल्याला दिसून येतात.

जगाच्या इतिहासात असे आव्हानात्मक कालखंड यापूर्वी अनेकदा आले आहेत आणि अनुभवातून आपल्याला हेदेखील माहीत आहे की, असे कालखंड हे कधीच कायम राहत नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद यांच्याआधारे जीवन जगू इच्छिणाऱ्या या लोकांना या कालखंडाला सामोरे जायचे असेल तर त्यांना विवेकाची पेरणी करणे, हाच आपला रस्ता आहे हे स्वीकारून जगावे लागेल.

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्र ‘अंनिस’चे कार्यकर्ते याच निर्धाराने ही विवेकाची पेरणी समाजात सातत्याने करत आले आहेत. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी आपण योग्य मार्ग सोडला नाही तर समाज हळूहळू का होईना, त्यात सहभागी होऊ लागतो, असा आमचा गेल्या दहा वर्षाचा अनुभव आहे. ‘नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ या ‘अंनिस प्रकाशना’मार्फत राबवलेल्या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद ह्याचे उत्तम उदाहरण आहे.

या उपक्रमात डॉ. दाभोलकर यांच्या बारा छोट्या पुस्तिकांचा एक संच अशा पाच हजार संचांची गेल्या महिन्यात आगाऊ रक्कम देऊन महाराष्ट्रातील जनतेने नोंदणी केली. मराठी पुस्तकांची पहिली आवृत्ती साधारण एक हजार पुस्तकांची काढली जाते. या पार्श्वभूमीवर जवळजवळ साठ हजार पुस्तके महाराष्ट्रातील घरोघरी पोचली म्हणजे लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवाद हे विषय समजून घ्यायचे आहेत, याचा पुरावा आहे.

तीच गोष्ट डॉ. दाभोलकर यांच्या हिंदीतील अनुवादित पुस्तकांची आहे. ‘राजकमल प्रकाशन’मार्फत हिंदीमध्ये उपलब्ध केलेल्या त्यांच्या पंधरा पुस्तकांना हिंदी भाषिक राज्यात चांगली मागणी आहे. त्यामधील अनेक पुस्तकांच्या तिसऱ्या/ चौथ्या आवृत्त्या बाजारात आलेल्या आहेत.

समाजाचा सहभाग मोलाचा

गेल्या पाच वर्षांच्यापासून ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ या संस्थेच्या वतीने वीस ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. याअंतर्गत झारखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, सारख्या दुर्गम राज्यांपासून ते दिल्ली, पंजाब, हरियाना, आंध्रप्रदेश अशा पंधरापेक्षा अधिक राज्यांत डॉ. दाभोलकर यांची आठवण म्हणून अनेक कार्यकर्ते लोकांच्यामध्ये जाऊन मानवी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व काय आहे.

याविषयी जागर करत आहेत.आव्हानांचा विचार करता हेदेखील आपण समजून घेतले पाहिजे की, केवळ ‘अंनिस’चे कार्यकर्ते एकटे-दुकटे हे काम पूर्ण करू शकत नाहीत. या कामात समाजाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय राज्यघटनेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि अंगीकार हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सोपा अर्थ म्हणजे जितका पुरावा तितका विश्वास. आपल्याला जर जबाबदार नागरिक बनायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित ठेवता कामा नये. आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार-विहाराच्या निवडीपासून ते अगदी जोडीदाराच्या निवडीपर्यंत आयुष्याच्या सर्व गोष्टींवर प्रभाव टाकणारी ही गोष्ट आहे.

समाज म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ‘वातावरण बदलां’सारख्या (क्लायमेट चेंज) आव्हानांना सामोरे जायचे असेल तरीदेखील आपल्याला वैज्ञानिक जीवनदृष्टीचीच कास धरणे आवश्यक आहे. तसेच अंधश्रध्दा निर्मूलन आणि विवेकी समाजनिर्मिती हे कुठल्याही देव आणि धर्माच्या विरोधात असलेले काम नाही.

देवाच्या आणि धर्माच्या नावावर लोकांचे जे शोषण केले जाते, त्यामुळे होणाऱ्या शोषणाच्या विरोधात लढण्यासोबत समाजातील सर्व प्रकारच्या अवैज्ञानिक आणि अविवेकी वर्तनाच्या विरोधात आणि भारतीय राज्यघटनेच्या बाजूने उभे राहणारे हे काम आहे.

डॉ. दाभोलकर यांचे संशयित खुनी पकडण्यात शासनाने अक्षम्य दिरंगाई केली; पण ‘अंनिस’ने सातत्याने रस्त्यावर आणि कायदेशीर मार्गाने लढाई चालू ठेवली. त्या प्रयत्नांनंतर हे संशयित पकडले गेले आणि त्यांच्यावर खटलादेखील उभा राहिला आहे. हत्येमागचे सूत्रधार अद्याप पकडले गेले नसले तरी त्यासाठीची लढाई चालू आहे. जेव्हा राज्यसंस्था त्यांचे घटनादत्त कर्तव्य विसरते, त्या वेळेला जबाबदार नागरिक आणि नागरी संघटना हे आपले विचारबीजे पेरण्याचे काम करत राहिल्या, तर आज ना उद्या त्याला सद्वर्तनाचे पीक येते, असा हा अनुभव आहे.

‘जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा,

विजा घेवून येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही...’

या सुरेश भटांच्या ओळीं डॉ. दाभोलकर त्यांच्या भाषणात अनेकवेळा उद्घृत करत असत. त्याच भावनेने ही विवेकाची पेरणी अंनिस कार्यकर्ते करीत आहेत.

(लेखक महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते आहेत.)

hamid.dabholkar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT